लोकदर्शन👉 राजेंद्र मर्दाने
*वरोरा* : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, ओशनिक बहुउद्देशीय संस्था व आनंदवन मित्र मंडळ, वरोरा यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांची संयुक्त जयंती श्रीनगर सिटी, बोर्डा येथील ओशनिक बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यालयात उत्साहात साजरी करण्यात आली. समारंभाच्या अध्यक्षस्थानी आनंदम् फाउंडेशनचे महाराष्ट्र समन्वयक डॉ. वाय. एस. जाधव होते.
यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष बाळू भोयर, माजी सचिव प्रवीण गंधारे, ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष तथा पत्रकार राजेंद्र मर्दाने, ओशनिक बहुउद्देशीय संस्थेचे उपाध्यक्ष व रोटरी क्लब वरोरा अध्यक्ष बंडूभाऊ देऊळकर, आनंदवन मित्र मंडळाचे पदाधिकारी संजय गांधी, टायगर ग्रूपचे वरोरा शहर अध्यक्ष रिषभ रट्टे इ. प्रामुख्याने उपस्थित होते.
अध्यक्षीय भाषणात डॉ. जाधव म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्रातल्याच नाही तर अखिल भारतातल्या प्रत्येकाचे स्फूर्तीदायी दैवत आहे. बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले की, आचार्य जांभेकर हे महाराष्ट्रातल्या पहिल्या पिढीतील समाज सुधारक होते. ६ जानेवारी १८३२ रोजी बाळशास्त्री जांभेकरांनी ‘ दर्पण ‘ हे वृत्तपत्र सुरू करुन मराठीतील आद्य संपादक होण्याचा बहुमान मिळवला.
बाळू भोयर म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपले जीवन देश आणि धर्म यासाठी वेचले. त्यांनी पारतंत्र्यातून स्वातंत्र्याकडे जाण्यासाठी प्रेरणा मिळावी असे आपले चरित्र घडविले. तर बाळशास्त्री जांभेकरांनी वैज्ञानिक दृष्टीकोनातून सामाजिक परिवर्तनासाठी लेखणी झिजवली, अशी दोघांच्या कार्याचे साम्य दर्शवणारी मांडणी त्यांनी केली.
राजेंद्र मर्दाने म्हणाले की, छत्रपतींच्या राज्यकारभाराची दखल जागतिक पातळीवर घेतल्या गेली असून अशा संवेदनशील रयतेच्या राजाचे स्मरण फक्त भाषणापूरते न करता सत्ताधाऱ्यांनी त्यांना अभिप्रेत संकल्पना कृतीत उतरविल्यास देशाची भरभराट होईल. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्याबद्दल अधिक माहिती देताना ते म्हणाले की, त्यांचा जन्म दि. २० फेब्रुवारी १८१२ रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या देवगड तालुक्यातील पोंभूर्ले येथे झाला. केवळ लोककल्याण आणि लोकशिक्षण असाच उदात्त हेतू नजरेसमोर ठेवून ‘ दर्पण ‘ या आंग्लभाषीय वृत्तपत्राची सुरुवात मुंबई येथे करून मराठी वृत्तपत्र इतिहासाची ज्योत पेटवली. मराठीतील पहिल्या ‘ दिग्दर्शन ‘ या मासिकाचेही ते संस्थापक संपादक होते. भारतातील पहिले प्राध्यापक होण्याचा बहुमान त्यांना मिळाला. ते विविध भाषांवर प्रभुत्व असणारे एक थोर व्यक्तिमत्त्व तसेच ज्ञानाच्या विविध क्षेत्रात संचार करणारे तपस्वी होते.
सुरूवातीला डॉ. जाधव, बाळू भोयर, राजेंद्र मर्दाने व प्रमुख मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराज व आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून विनम्र अभिवादन केले व दीप प्रज्वलन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बंडू देऊळकर यांनी केले तर आभार संजय गांधी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाहीद अख्तर, शाम ठेंगडी, मनोज श्रीवास्तव, मनीष भुसारी, डॉ. प्रवीण मुधोळकर, प्रदीप कोहपरे, आलेख रट्टे, हरीश केशवाणी, शरद नन्नावरे, प्रा. बळवंतराव शेलवटकर, राहुल देवडे, ओंकेश्वर टिपले, यश राठोड , तुषार मर्दाने इ. नी परिश्रम घेतले.