जैन समुदायातील लोकं कांदा लसूण खात नाहीत यामागील कारण तुम्हाला ठाऊक नसेल.

 

लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.

भारत हा वेगवेगळ्या प्रदेशांनी नटलेला जसा आहे तसाच तो निरनिराळ्या समुदायांचा सुद्धा देश आहे. भारतात अनेक धर्माचे लोक एकत्र राहतात. प्रत्येकाच्याच काही रूढी परंपरा आहेत.

विशेष म्हणजे प्रत्येकालाच आपल्या राज्यघटनेने आपल्या धर्माप्रमाणे राहण्याचा अधिकार दिला आहे.

परंतु संपूर्ण भारतात “अहिंसा परमो धर्म” हा मंत्र जपलेला दिसतो. भारतातले अनेक धर्म, पंथ, समुदाय हे शाकाहारी आहेत.

त्यातलाच एक समुदाय म्हणजे जैन समुदाय. हे लोक शाकाहारी तर आहेतच परंतु त्याच सोबत त्यांच्या जेवणाची एक खासियत आहे. ते आपल्या जेवणात कांदा-लसूण, आलं घालत नाहीत.

परंतु संपूर्ण जगभरात त्यांचं हे जेवण मिळतं. अनेकदा आपण पाहतो की अनेक शाकाहारी हॉटेल्समध्ये देखील जैन पदार्थ मिळतील असं लिहिलेलं असतं.

आजकाल तर अगदी इंटरनॅशनल फ्लाइट्स मध्येदेखील जैन खाणं मिळतं.

एकवेळ मांसाहार न करणं समजू शकतं. हिंदू धर्मातही चातुर्मास पाळला जातो. ज्यामध्ये श्रावण ते कार्तिक या चार महिन्यांमध्ये मांसाहार, कांदा आणि लसूण वर्ज्य असतो.

अर्थातच यामागचं कारण आहे ते म्हणजे श्रावण चालू होताना पावसाला सुरुवात झालेली असते, त्यामुळेच हवेत विविध प्रकारच्या बॅक्टेरिया, विषाणू यांचे प्रमाण वाढलेले असते.

तसेच कांदा आणि लसूण हे पदार्थ तामसी समजले जातात. त्यामुळे पावसाळ्यात अपचन, अजीर्ण आणि कफ यासारखे विकार वाढत असतात.

परंतु कांदा, लसूण, आले, गाजर, बटाटा, फ्लॉवर मोड आलेली कडधान्य न घेता स्वयंपाक करायचा म्हणजे खरंतर किती कठीण काम!

आणि जैन समुदायातील काहीजण आयुष्यभर या गोष्टी खात नाहीत. अर्थातच या सगळ्यामागे एक विशेष कारण आहे. आणि ते म्हणजे जैन धर्मीयांना कुठल्याही प्रकारची हिंसा मान्य नाही.

मुळातच अध्यात्म आणि अहिंसा या तत्त्वावरच या धर्माची स्थापना झाली आहे. अहिंसा हे तत्व असल्यामुळे जैन समुदायात मांसाहार करण्याचा प्रश्नच येत नाही.

जैन मंदिरांमध्ये देखील ‘अहिंसा परमो धर्म’ हे ब्रीद वाक्य लिहीलेलं असतं. म्हणूनच अहिंसा ही त्यांच्या जेवणात देखील दिसून येते.

या अहिंसेचे पालन ते खुपच जाणीवपूर्वक आणि मनापासून करतात. अगदी जैन मुनि ही तोंडावर पांढरं फडकं लावून फिरताना आपण पाहतो. याचं कारण आहे तेच आहे की सूक्ष्मजीव जंतू तोंडात जाऊ नयेत.

एखादा सूक्ष्मजीव जंतू देखील मारला जाऊ नये याची ते काळजी घेतात. म्हणूनच जमिनीच्या खाली येणारे कांदा-लसूण, आलं ,गाजर ,मुळा अशा गोष्टी ते खात नाहीत.

याचं कारण पण ते जमिनीतून बाहेर काढताना त्या वरती असणारे सूक्ष्मजीव किडे, मुंग्या मरून जातात. तिथला तो छोट्या जीवांचा अधिवास नष्ट होतो असं ते मानतात.

म्हणूनच जैनधर्मीय स्ट्रीक्टली या गोष्टी खात नाहीत. तसेच कांदा आणि लसूण या तामसिक गोष्टी आहेत. तमस म्हणजे अंधार. म्हणजेच या गोष्टी खाल्ल्याने कामवासना जागृत होते आणि अध्यात्मावर लक्ष केंद्रित करता येत नाही, असं ते मानतात.

आता तर काही जण व्हेगन डायटचा पुरस्कार करत आहेत. ज्यामध्ये दुग्धजन्य पदार्थही खाल्ले जाणार नाहीत याची काळजी घेतली जाते.

याचं कारण दूध देणाऱ्या गाई आणि म्हशी यांच्यावर आता जबरदस्तीने दूध घेण्यासाठी इंजेक्शन दिली जातात, त्यांच्यावर अन्याय केला जातो म्हणून हे पदार्थ आता टाळले जात आहेत.

खरं सांगायचं तर पूर्वीच्या काळापासूनच जैन लोक पाणीदेखील गाळुन पितात. याचं कारण पाण्यातलेही इतर काही जीवजंतू असतील तर ते मारले जाऊ नयेत.

ते पाणी भरण्याची देखील एक पद्धत होती. आधीच्या काळी नदी, विहीर, आड या मधून पाणी घ्यावं लागायचं. ते घागरीने किंवा कळशीने घेतलेले पाणी दुसर्‍या भांड्यात ओतताना त्या भांड्यावर कापड ठेवलं जायचं, जेणेकरून पाणी गाळून घेतलं जाईल.

नंतर ते कापड उलट्या बाजूने पाणी घालून विहिरीत किंवा आडात ते पाणी सोडलं जायचं. ज्यामुळे कापडात अडकलेले जीवजंतू आपल्या मूळ ठिकाणात परत जातील.

कुठल्याही वनस्पतीला कोणताही धोका पोहोचू नये यासाठी देखील जैन धर्मीय काळजी घेतात. अगदी मोड आलेली कडधान्य देखील ते खात नाहीत.

याचं कारण पण तेच आहे की मोड येताना नवीन अंकुर फुटतो आणि आपण त्याचं जगणं नष्ट करतो असं ते मानतात.

जैन धर्मीय मधही खाणं टाळतात. कारण त्यामध्ये देखील मधाच्या पोळ्यावरच्या माशा उडवल्या जातात, म्हणजेच माशांचं निवासस्थान नष्ट होतं.

काहीजण फ्लॉवर, वांगी आणि पेरू देखील खात नाहीत. कारण त्यामध्ये ही छोटेसे किडे असतील तर ते चुकून खाल्ले जाण्याची शक्यता असते.

जैनधर्मीय कुठलेही आंबवलेले पदार्थ देखील खाणे वर्ज्य करतात. म्हणजे इडली, डोसा, ढोकळा करताना ते कधीही रात्रभर धान्य भिजवून ठेवून आंबवत नाहीत.

जर सकाळी डाळ आणि तांदूळ भिजवला असेल तर दुपारीच ते वाटून घेऊन संध्याकाळीच त्याची इडली, डोसा, ढोकळा खाल्ला जातो. जर ते रात्रभर आंबवलं तर त्यात बॅक्टेरिया तयार होतात.

रात्री उरलेलं अन्नही ते खात नाहीत. मुळात जैनधर्मीय रात्रीचे जेवण सूर्य मावळायच्या वेळेसच करतात. जे लोक कट्टरपणे या पद्धतीचा अवलंब करतात ते सूर्य मावळल्यावर रात्रीचे जेवण करत नाहीत.

याचं कारण देखील तेच आहे, पूर्वी रात्री लाइट्स नव्हते खूप अंधार असायचा, त्यात दिव्याभोवती किडे जमा व्हायचे आणि काही त्या उष्णतेमुळे मरून जायचे.

जैनधर्मीय कोणत्याही प्रकारचे अल्कोहल, बियर, वाइन घेत नाहीत. याचं कारणही तेच की या गोष्टी खूप दिवस आंबवलेल्या असतात. ज्यामध्ये यीस्ट, बॅक्टेरिया तयार होतात.

जैनधर्मियांमध्ये अनेक उपवास असतात. कधी कधी ते उपवास निर्जल असतात. म्हणजे ते त्यादिवशी पाणीही पीत नाहीत.

त्यांच्या पर्युषण काळात काहीकाही जण अनेक दिवस अन्नपाण्याचा त्याग करूनही राहतात. त्यांच्या पंचांगाप्रमाणे, कॅलेंडरप्रमाणे असेही काही दिवस आहेत की त्यादिवशी ते कोणत्याही प्रकारची हिरवी पालेभाजी खात नाहीत.

अगदी भेंडी देखील खात नाहीत. त्यादिवशी ते ‘गट्टे की सब्जी’, ‘पापड की सब्जी’ असे पदार्थ बनवतात. या दोन्ही डिशेश राजस्थान मधून संपूर्ण भारतभर केल्या जातात.

तसे जैनधर्मीय संपूर्ण भारतात वसलेले आहेत. आणि त्या त्या राज्यांचे एक वैशिष्ट्य त्यांच्या जेवणामध्ये दिसून येतं.

जसं की गुजराती जैन, राजस्थान मधील मारवाडी जैन थाळी, मध्यप्रदेशातील बुंदेलखंडी जैन खाणं, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील अग्रवाल जैन कुझीन.

भारतात अनेक रेस्टॉरंट हे फक्त शाकाहारी जेवणाचे असतात आणि त्या सगळ्याच रेस्टॉरंट्स मधून जैन खाणं मिळतं. पण याशिवाय फक्त जैन खाणं देखील मिळणारी रेस्टॉरंट्स आहेत.

जिथे कांदा-लसूण, गाजर, बटाटा, मुळा याचा अजिबात वापर होत नाही.

जैनधर्मीयांचे या खाण्याशी मिळतंजुळतं खाणं जपान मध्ये देखील पहायला मिळतं. तिथली ‘शोजिन रायोली’ ही डिश देखील कांदा-लसूण विरहीत असते.

एकूणच सात्विक प्रकारचं खाणं हे जैन धर्मियांच्या खाण्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

परंतु मोठ्या उद्योगधंद्यात आणि व्यापारामध्ये जैन लोक पुढे असल्यामुळे त्यांचे जेवण देखील आता भारताबरोबरच इतर देशातही मिळत आहे.

संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *