लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*⭕खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी घेतला प्रशासनाचा आढावा*
चंद्रपूर : काही दिवसापासून बिबट्याच्या हल्यात सि.एस.टी.पी.एस. आणि दुर्गापूर परिसरातील दोघांचा नाहक बळी गेला आहे. असे असतांनाही सि.एस.टी.पी.एस च्या हद्दीत सुरु असलेला वन्यजीव व मानवी संघर्ष टाळण्याबाबत उपाययोजना करण्यासाठी सिटीपीएस, वेकोलि आणि वनविभागाने संयुक्त कृतीदल स्थापन करून हा संघर्ष टाळण्याच्या सूचना जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत खासदार बाळू धानोरकर व आमदार प्रतिभाताई धानोरकर यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, पोलीस अधीक्षक अरविंद साळवे, ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्रसंचालक रामगावकर, महाप्रबंधक महाऔष्णिक विद्युत केंद्र पंकज सपाटे, डीएफओ खाडे, निवासी जिल्हाधिकारी मेश्राम, महाक्षेत्रीय प्रबंधक वेकोलि कावळे, महाक्षेत्रीय प्रबंधक वेकोलि शाबीर, नगराध्यक्ष अनिल धानोरकर, गोपाल अमृतकर यांची उपस्थिती होती.
शहराच्या जवळ असलेल्या सि.एस.टी.पी.एस. आणि दुर्गापूर परिसरात मोठ्या प्रमाणात झुडपांचे प्रमाण आहे. या परिसरात वाघ, बिबट व अस्वल या वन्य स्वपदांचा वावर असल्यास तो सहज दिसून येत नाही. त्यामुळे रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या झुडपांची साफसफाई करण्याची जबाबदारी हि वेकोलि व सि.एस.टी.पी.एस. यांची असून हि जबाबदारी त्यांनी तात्काळ पार पाडावी अशा सूचना यावेळी करण्यात आल्या. विनाकारण जंगलपरिसरात प्रवेश न करणारे फलक रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात यावे. सि.एस.टी.पी.एस. ने ९०० मीटर सुरक्षा भिंतीचे काम तात्काळ करावे. सि.एस.टी.पी.एस. आणि दुर्गापूर परिसरातील वन्यजीवांच्या हालचालीवर लक्ष ठेवण्यासाठी वनविभागाच्या माध्यमातून संयुक्त कृतीदल स्थापन करावा. या परिसरातील ७ वाघ इतरत्र हलविण्यासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव सादर करावा. औद्योगिक व मानवी वसाहतीत फिरणाऱ्या वन्य स्वापदांना पकडण्याचे अधिकार क्षेत्र संचालकांना द्यावे. वेकोलि क्षेत्रात आतील भागात कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी उंच्च मचानी उभारण्याच्या मौलिक सूचना यावेळी करण्यात आल्या.