संकलन – संध्या सुर्यवंशी. पुणे 9028261973.
*दिनविशेष निमित्ताने – १९ फेब्रुवारी २०२२. – शिवजयंती –
छत्रपती शिवाजी महाराजांचे हे पुतळे ज्याच्यावर आधारलेले आहेत किंवा ज्या पुतळ्याला रोल मॉडेल मानून उभारण्यात आलेत तो शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे उभारण्यात आला माहितेय?
हातात तलवार घेऊन घोड्यावर स्वार झालेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आज महाराष्ट्रातील गावागावात पाहायला मिळतो. देशाच्या आणि जागाच्याही कानाकोपऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांची हीच प्रतिमा पुतळ्याच्या स्वरूपात साकारण्यात आलीय. शिवाजी महाराजांचे हे पुतळे ज्याच्यावर आधारलेले आहेत किंवा ज्या पुतळ्याला रोल मॉडेल मानून उभारण्यात आलेत तो शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा कुठे उभारण्यात आला माहितेय? छत्रपती शाहू महाराजांच्या पुढाकाराने शिवाजी महाराजांचा जगातील पहिला पुतळा उभारण्यात आला पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीमध्ये. 1917 साली हा पुतळा उभारण्याचा निर्णय झाला आणि तब्बल अकरा वर्षांच्या मेहनतीनंतर अनेक संकटांना पार करत हा पुतळा प्रत्यक्षात साकार झाला. शिवजयंतीच्या निमित्तीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या पुतळ्याच्या निर्मितीची कहाणी.
अन् युवराज प्रिन्स एडवर्डने स्मारकाच्या भूमिपूजनाला यायचं आमंत्रण स्वीकारलं …
इंग्रजांच्या सत्तेबरोबरच युरोपियन शिल्पकलाही विसाव्या शतकात भारतात दाखल झाली. कोलकाता, मुंबई , पुणे यासारख्या शहरांमध्ये काही शिल्पं आणि पुतळे उभेही राहिले होते . पण तोपर्यंत महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कुठेही नव्हता. त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीमध्ये छत्रपती शाहू महाराजांना याची गरज वाटली. दुसरीकडे पहिल्या महायुद्धात इंग्रजांकडून लढणाऱ्या मराठी सैनिकांच्या पराक्रमाची गरज आणि ओळख इंग्रजांना नव्याने पटली होती. त्यामुळे इंग्रजांच्या युवराजाने पुतळ्याच्या भूमिपूजनाला यायचं मान्य केलं. ज्या इंग्रजांनी शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास लिहिला होता त्याच इंग्रजांचा युवराज आता छत्रपती शिवाजी महाराजांपुढे नतमस्तक होणार होता .
छत्रपती शाहू महाराजांनी 1917 साली पुण्यात शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारण्याचा विचार मांडला. त्यावेळच्या इतर संस्थानिकांनी देखील ही कल्पना उचलून धरली. त्यावेळच्या इंग्रज सरकारने देखील याला पाठिंबा दिला. एवढंच नाही तर पहिल्या महायुद्धात मराठ्यांनी दाखवलेल्या पराक्रमाने प्रभावित झालेल्या इंग्रजांचा युवराज प्रिन्स एडवर्डने शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाला यायचं आमंत्रण स्वीकारलं.
शिवाजी महाराजांचं स्मारक असावं अशी चर्चा त्याकाळी सुरु झाली . त्या काळात लोकमान्य टिळक काँग्रेसचं नेतृत्व करत होते तर शाहू महाराज ब्राम्हणेतर चळवळ चालवत होते . त्याच काळात पहिल्या महायुद्धात इंग्रजांना मराठ्यांची खूप मदत झाली . त्यामुळे शिवाजी महाराजचं महत्व इंग्रजांना मान्य करावं लागलं . त्यांना हे कळालं की लढणाऱ्या या लोकांची मूळ प्रेरणा ही आहे . त्यातून स्मारकाची ही कल्पना पुढे आली . अर्थात त्यामध्ये शाहू महाराज प्रमुख होते .
छत्रपती शाहू महाराजांचा पुढाकार…
मात्र याच काळात महात्मा गांधीजींची असहकार चळवळ पुण्यासह संपूर्ण भारतात जोमात सुरु होती . अखेर बऱ्याच घडामोडींनंतर 19 नोव्हेंबर 1921 ला प्रिन्स एडवर्ड पुण्यात आला आणि शिवाजी महाराजांच्या प्रतिमेसमोर नतमस्तक झाला . प्रिन्स एडवर्डच्या या कार्यक्रमाला त्यावेळी पुण्यात विरोधही झाला . पण छत्रपती शाहू महाराजांनी मोठ्या समारंभपूर्वक या स्मारकाची पायाभरणी केली . ब्रिटिशांच्या युवराजच्या हस्ते या स्मारकाचं भूमिपूजन करवून शाहू महाराजांनी एक मोठा उद्देश साध्य केला होता .
*इंग्रज शिवाजी महाराजांना राष्ट्रपुरुष मानायलाच तयार नव्हते . त्यांनी शिवाजी महाराजांची लुटारू ही प्रतिमा तयार केली होती. मात्र प्रिन्स ऑफ वेल्स इथे आला आणि त्याला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल माहिती मिळाली तेव्हा त्यानं म्हटलं की शिवाजी महाराज नॉट ओन्ली बिल्ड एम्पायर बट ही बिल्ड द नेशन…*
शिवरायांच्या स्मारकासाठी महाराष्ट्रातील प्रमुख राजकीय घराणी पुढं आली . पण त्यावेळची राजकीय आणि सामाजिक परिस्थितीच अशी होती की या स्मारकामध्ये अनेक अडथळे उभे ठाकले. 1917 ला या स्मारकाचा विचार सुरु झाला पण त्याच भूमिपूजन व्हायला 1921 चा नोव्हेंबर महिना उजाडावा लागला.
जगभरामध्ये युरोपियन प्रदेशांमध्ये असे पुतळे उभे राहत होते. इथेही शिवाजी महाराजांचा असा पुतळा असावा असा संस्थानिकांमध्ये विचार सुरु झाला. त्यामध्ये राजर्षी शाहू महाराज, बडोद्याचे गायकवाड, इंदोरचे होळकर, दिवसाचे पवार आणि ग्वाल्हेरचे शिंदे यांनी इतर संस्थानिकांना बरोबर घेऊन शिवाजीनगरच्या भांबुर्ड्यात हे स्मारक उभा केलं .
राजाराम महाराजांकडून स्मारकासाठी दोन शिल्पकारांची निवड…
स्मारकाची पायाभरणी झाली खरी पण त्यानंतर काहीच दिवसांमध्ये 6 मे 1922 ला छत्रपती शाहू महाराजांचं निधन झालं . शाहू महाराजांच्या निधनानंतर या स्मारकाची जबाबदारी ग्वाल्हेरच्या अलीबहाद्दर महादेवराव शिंदेंकडे आली . पण ज्या प्रकराचा भव्य – दिव्य पुतळा आणि सुंदर स्मारक उभारण्याचं शाहू महाराजांचं स्वप्न होतं तसा पुतळा तयार करणारी कंपनी भेटत नव्हती . कारण तोपर्यंत एवढा भव्य पुतळा तयारच करण्यात आला नव्हता. ही शोधाशोध सुरु असतानाच ग्वाल्हेरच्या अलिबहाद्दर माधवराव शिंदेंचं निधन झालं . त्यानंतर या स्मारकाची जबाबदारी कोल्हापूरचे तिसरे राजाराम महाराज यांच्यावर आली. राजाराम महाराजांनी स्मारकासाठी दोन शिल्पकारांची निवड केली. स्मारकातील शिल्प बनवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली नानासाहेब करमरकर यांच्याकडे तर पुतळा तयार करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली राव बहाद्दर म्हात्रे यांच्याकडे.
या स्मारकासाठी करमरकरांनी चार सुंदर शिल्पं तयार केली. पुतळ्याच्या समोरच्या बाजूला संगमरावरामध्ये कोरलेलं भवानी देवी शिवाजी महाराजांना भवानी तलवार देते आहे हे शिल्प संगमरवरमध्ये कोरण्यात आला तर पुतळ्याच्या डाव्या बाजूला शिवाजी महाराजांनी वणी – दिंडोरी इथं दाऊदखानवर मिळवलेल्या विजयाचा प्रसंग चितारण्यात आला तर पुतळ्याच्या पाठीमागे कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला शिवाजी महाराजांनी जी सन्मानाची वागणूक दिली तो प्रसंग ब्रॉन्झमध्ये कोरण्यात आला तर पुतळ्याच्या उजव्या बाजूला शिवराज्याभिषेकाचा प्रसंग ब्रॉन्झ मध्ये चितारण्यात आला . नानासाहेब करमरकरांनी त्यांना दिलेली या शिल्पांची जबाबदारी मुदतीआधी तीन महिनेच पूर्ण केली होती. पण मुख्य पुतळा बनवण्याची जबादारी ज्यांच्यावर होती त्या राव बहाद्दर म्हात्रे यांनी त्यांच्या कामाला अजून सुरुवातच केलेली नव्हती. त्यामुळं पुतळा बनवण्याचं कामही नानासाहेब करमरकर यांनाच देण्याचा निर्णय राजाराम महाराजांनी घेतला.
नानासाहेब करमरकरांनी हे आव्हान पेललं खरं पण तोपर्यंत इतका मोठा पुतळा भारतात कोणीच तयार केला नव्हता. करमरकरांनी त्यासाठी पुतळा बनवणाऱ्या अनेक कंपन्यांकडे विचारणा केली. पण कोणीच हे धाडस करायला तयार झालं नाही. अखेर नानासाहेब करमरकर जहाजे आणि युद्धनौका जिथं तयार केल्या जात होत्या त्या माझगाव डॉकयार्डमध्ये पोहचले . जहाजे तयार करणाऱ्या यंत्रणेचा उपयोग पुतळा उभारण्यासाठी करू दयायला डॉकयार्डमधील एक ब्रिटिश कंपनी तयार झाली . नानासाहेब करमरकरांनी लागलीच या पुतळ्यासाठी मॉडेल बनवायला घेतलं .
नानासाहेब करमरकरांनी आपली कारकीर्दच नव्हे तर आयुष्यभराची कमाई पणाला लावली.
हे शिल्प जागतिक दर्जाचं व्हावं असा शाहू महाराजांचा प्रयत्न होता आणि राजाराम महाराजांनी त्यासाठी आपल्या देशी शिल्पकारांवरच विश्वास दाखवला. पुतळा अगदी जिवंत वाटला पाहिजे यासाठी पुतळ्यातील घोड्यासाठी मॉडेल म्हणून राजाराम महाराजांच्या शाहनवाज या अरबी घोड्याचा वापर करायचं ठरलं. या पुतळ्यासाठी नानासाहेब करमरकरांनी आपली कारकीर्दच नव्हे तर आयुष्यभराची कमाई पणाला लावली होती. अखेर 1 जून 1928 ला माझगाव डॉकयार्डमध्ये 150 कामगार तब्ब्ल सोळा टन वितळवलेलं ब्रॉन्झ साच्यामध्ये ओतायला लागले आणि सर्वांनीचं श्वास रोखून धरले . कारण आजही एकाच साच्यात पुतळा तयार करायला शिल्पकार धजावत नाहीत . त्याऐवजी पुतळ्याचे वेगवेगळे भाग तयार करून ते जोडणं शिल्पकार पसंत करतात. त्याकाळी तर ही अतिशय अवघड गोष्ट होती . पण नानासाहेबांनीं त्यावेळी हे धाडस केलं . पुतळा निर्मितीची ही सगळी प्रक्रिया पुढे त्यांनी एका स्मारकाची जन्मकथा हे पुस्तक लिहून जगासमोर मांडली .
या पुस्तकात नानासाहेब लिहतात, घोड्यावरचा पुतळा एकसंध ओतणं हे अत्यंत अवघड काम आहे आणि तेही शिवाजी महाराजांच्या स्मारकाचे . चुरशीची स्पर्धा , शत्रूचे जाळे , पूर्वी कधी न केलेले काम , काम बिघडले तर , ते वेळेवर झाले नाही तर पैसे परत करणे ही अट . अशा परिस्थितीत साडेसतरा फुटांचा घोड्यावरचा एकसंघ पुतळा ओतण्याचे धाडस इरेला पडून अंगावर घेऊन करणे म्हणजे धंद्याची अब्रू पणाला लावण्यासारखे होते . त्यावेळी ते धैर्य कसे झाले , याचे मला आता आश्चर्य वाटते . शेवटी भट्टी लागली , ब्रॉन्झ धातूचा १६ टन रस ओतला गेला . शुक्रवार १ जून १९२८ चा दिवस आणि रात्र माझ्या जीवनाची भवितव्यता ठरवणारी होती . भवितव्य पाताळात तरी गाडणार किंवा स्वर्गात तरी नेणार , अशा धारेवर उभे होतो . त्या प्रचंड भट्टीच्या ज्वाला पाहुन माझगाव डॉकमध्ये मोठी आग लागली आहे , असे लांबून पाहणाऱ्यांना वाटले . इकडे महामुकादम रॉसमिसन यांच्या हुकुमानुसार 150 कामगार सैनिकांप्रमाणे आपल्या कामावर तुटून पडले . रसाच्या गरम – थंड होण्याचे गणितही बरोबर जुळले .
याच्या दुसऱ्या दिवशी क्रेनने पेट्यांच्या मुशींमधून शिवाजी महाराज वर उचलले . तेव्हा जणू काय चमत्कार झाल्याप्रमाणे नजर लावून सर्व पाहत होते . पुतळा उभा केला , तेव्हा धातू चकचकत होता . वाफेच्या लाटा पुतळ्यातून निघत होत्या . जणू काय शिवाजी महाराज घामाने थबथबत अग्निकुंडातून दिव्य करून वर आले आहेत व घोड्यावरून दौड करू लागले आहेत .
पुतळा नेण्यासाठी कमी उंचीची व्हॅगन तयार केली.
करमरकर यांना जेव्हा हे काम सोपवलं . ते करमरकर हे शिल्पकार तर होतेच पण अभ्यासकही होते . त्यांचं वाचन होतं . त्यांनी शिवाजी महाराजांची चरित्रे वाचली . त्यांनी साडेतीन फुटांचं एक मॉडेल तयार केलं . तो प्रयोग यशस्वी झाला . मात्र त्यावेळच्या वर्तमानपत्रांनी हेडलाईन्स आधीच तयार केल्या होत्या . टाइम्सने कास्टिंग ग्रँड सक्सेस अशी हेडलाईन दिली तर क्रोनिकलने कास्टिंग फेल्युअर असा मथळा दिला . पण जेव्हा पुतळा तयार झाला तेव्हा नजर लावून सगळे पाहत होते .
साड़े तेरा फूट उंच , तेरा फूट लांब आणि साडे तीन फूट रुंदीचा हा सुबक आणि देखणा पुतळा तयार झाला . त्याकाळी शिवजयंती 16 जूनला साजरी होत होती . त्यामुळे हा पुतळा त्या आधी पुण्यात पोहचणं आवश्यक होतं . पण एक मोठीच समस्या उभी ठाकली . कारण त्याकाळी मुंबईहून – पुण्याला हा पुतळा नेण्यासाठी रेल्वे शिवाय दुसरा पर्याय नव्हता आणि रेल्वेच्या व्हॅगनवर हा पुतळा चढवला असता त्याची उंची रेल्वेच्या मार्गातील बोगद्यांपेक्षा जास्त भरायला लागली . मुंबईतून हा पुतळा जहाजाने रत्नागिरीला आणि तिथून रस्त्याने पुण्याला नेता येईल का याचाही विचार झाला . पण ते शक्य नाही हे लक्षात आल्यावर अखेर रेल्वेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून पुतळा नेण्यासाठी कमी उंचीची व्हॅगन तयार करण्यात आली .
शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या पुतळ्याचं अनावरण…
या रुळांपासून व्हॅगनची उंची साधारणपणे तीन फूट असते . पण पुतळ्यासाठी रुळांसपासून फक्त एक फूट उंचीची वेगळी व्हॅगन तयार करण्यात आली . त्यावर हा पुतळा ठेवण्यात आला आणि पुतळ्याचा मुंबईहून पुण्याच्या दिशेने प्रवास सुरु झाला . हा पुतळा घेऊन रेल्वे मंबई ते पुणे दरम्यान लागणाऱ्या पहिल्या बोगद्या पर्यंत पोहचली आणि सर्वांनी श्वास रोखून धरले . कारण कमी उंचीची व्यागन असूनही पुतळ्याची उंची बोगद्याच्या उंचीपेक्षा जास्त भरत होती . मग पुतळ्यासोबत प्रवास करणाऱ्या जवळपास पन्नास कामगारांनी हा भला मोठा पुतळा थोडासा तिरका केला आणि रेल्वेनी हा बोगदा पार केला . मुंबई – पुणे रेल्वे मार्गावरचे असे अनेक बोगदे पार करत अखेर रेल्वे पुण्यात पोहचली आणि एकच जल्लोष झाला.
10 जूनला हा पुतळा पुण्यात पोहचला. पुणे स्टेशनपासून वाजत-गाजत या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली . 16 जूनचा दिवस उजाडला . राजाराम महाराजांसोबत या पुतळ्याच्या अनावरणाला त्यावेळच्या मुंबई प्रांताचा गव्हर्नर लेस्ली विल्सन हजर होता . पुतळ्याच्या उभारणीवरून झालेले आधीचे सगळे वाद बाजूला ठेऊन सगळ्यांना पुतळ्याच्या अनावरणाच्या या कार्यक्रमात सामावून घेण्याय आलं . डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा आयोजित करून शिवाजी महाराजांच्या जगातील पहिल्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं .
काळाच्या ओघात शिल्पकलेचा विस्तार झाला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे एकामागोमाग एक तयार व्हायला लागले . पण शिल्पकलेच्या निकषांमध्ये आजही हा पहिला पुतळा अद्वितीय मानला जातो . कारण आपल्या देशात सिंगल कास्टिंग म्हणजे एकाच साच्यात तयार झालेल्या हाताच्या बोटावर मोजता येतील इतक्या मोजक्या पुतळ्यांमध्ये त्याचा समावेश होतो . आणि म्हणूनच या पुतळ्यातील छत्रपती शिवरायांचं रूप काही औरच दिसतं . त्यामुळे शिल्पकलेच्या विद्यार्थ्यांसाठी आजही हा पुतळा आदर्श मानला जातो . या पुतळ्यात एका हातात तलवार आणि दुसऱ्या हातात घोड्याचा लगाम पकडून स्वारीवर निघालेल्या छत्रपती शिवरायांची प्रतिमाच सर्वांच्या मानत इतकी घट्ट बसली की पुढे छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे, शिल्पं आणि चित्रं याच रूपात आकाराला आली . हा पुतळा महाराष्ट्राच्या मानवार कळत – नकळतपणे असा परिणाम करणारा ठरलाय .
छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की आपल्यासमोर महाराजांची जी प्रतिमा उभी राहते ती या पुतळ्यातून आलीय . आपण ही प्रतिमा तर स्वीकारली पण त्यासोबत हा पुतळा उभा करण्यामागे छत्रपती शाहू महाराजांचा जो विचार होता तो आपण स्वीकारलाय का ? आज छत्रपती शिवरायांबरोबरच इतर महापुरुषांचे पुतळे गावोगावी उभे राहिलेत . हे पुतळे उभारताना त्यांच्यापाठीमागचा विचारही आपण घेतो आहोत का . हे महापुरुष पराक्रमाची जसे ओळखले जातात तसेच सर्वांना सोबत घेऊन जाण्यासाठीही ते ओळखले जातात . हे पुतळे उभारण्यातून हे सामाजिक ऐक्य साधले जातंय का . आज सर्व पुतळ्यांचा आद्य पुतळा असलेला हा पुतळा आपल्या सगळ्यांना हा प्रश्न विचारतोय.
संकलन – संध्या सुर्यवंशी. पुणे.
9028261973.