लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकार
*⭕मदर डेअरी अधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चा*
चंद्रपूर, ता.१७ ; जिल्ह्यातील अजयपुर, गोवर्धन येथील मदर डेअरी अंतर्गत सुरु असलेले दूध संकलन केंद्र पूर्ववत सुरू व्हावे तसेच दूध उत्पादनात जिल्ह्यांतील शेतकरी सक्षम व्हावा यासाठी लोकलेखा समिती प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आज राष्ट्रीय दुध विकास प्राधिकरण आणि मदर डेअरीच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली.
विदर्भातील शेती आणि शेतकरी संपन्न व्हावा यासाठी दूध उत्पादना सारखे पूरक उद्योग वाढविणे किंवा त्याला प्रोत्साहन देणे अनिवार्य आहे ; म्हणूनच विदर्भात आलेल्या मदर डेरी च्या माध्यमातून शेतकऱ्यांनी दूध उत्पादनासाठी पुढे यायला हवे यासाठी चंद्रपूर जिल्ह्यात पशुधन वंध्यत्व निवारण शिबीर, गोपालन, दुग्धजन्य पदार्थांची निर्मिती आणि बाजारपेठ या विषयी माहिती मिळावी म्हणून तालुका स्तरावर प्रशिक्षण मेळावे आयोजित करता येतील. केंद्र आणि राज्य शासनाच्या योजनांची माहिती देखील या माध्यमातून शेतकऱ्यांना देता येईल अशी संकल्पना श्री सुधीर मुनगंटीवार यांनी या बैठकीत मांडली.
चंद्रपूर जिल्ह्यातील दूध संकलन वाढावे, शेतकऱ्यांचा आत्मविश्र्वास वाढवा यासाठी मदर डेअरी ने आवश्यक पावले उचलावीत अशी सूचना त्यांनी केली.
एन डी बी चे विदर्भ मराठवाडा विभागाचे वरिष्ठ महाव्यवस्थापक डॉ.व्हीं. श्रीधर यांनी चंद्रपूर जिल्ह्यात दूध संकलन सक्रीय करण्यासाठी पुढाकार घेऊ असे आश्वासन या आढावा बैठकीत दिले. आ.सुधीर मुनगंटीवार यांनी डॉ. व्ही.श्रीधर यांना बांबूनिर्मित तिरंगा ध्वज देत त्यांचे स्वागत केले.
यावेळी मदर डेअरी चे डॉ. मुकेशकुमार झा, डॉ समीर मुधुली आदी अधिकारी उपस्थित होते.