लोकदर्शन 👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
लहान बाळाला आलेले इवलुशे दात बघताना कौतुक वाटतं. बाळ मोठं झाल्यानंतर साधारण सहाव्या ते सातव्या वर्षी हे सगळे दुधाचे दात एक एक करून पडतात आणि त्या जागी नवे बळकट दात येतात. काही लोक आपला एखादा दुधाचा दात कुतूहल म्हणून जपून ठेवतात तर काही लोक घराच्या पत्रावर वगैरे तो फेकून देत.
तर मग आणखी काही वर्षांनंतर येते ती अक्कल दाढ. पण त्या सोबत अक्कल येते का हो??? अक्कल दाढेचा आणि अक्कलेचा काही संबंध असतो का? तर आज आम्ही तुम्हाला ह्या मागे लपलेल्या शास्त्रीय माहिती बद्दल सांगणार आहोत.
अक्कल दाढ साधारणतः खूप उशीरा म्हणजे व्यक्ती पौढ झाल्यानंतर येते. या अक्कल दाढेबद्दल असा समज आहे की, जेव्हा ती येते तेव्हा त्या व्यक्तीची बुद्धिमत्ता आणि विचार करण्याची क्षमता वाढते. असे मानले जाते लोकांना अक्कल दाढ आली हे लोकं हुशार आणि अधिक बुद्धिमान होतात. यावर शास्त्रज्ञांनी संशोधन केले आहे.
संशोधनात अनेक गोष्टी समोर आल्या आहेत ज्यावरून असे दिसून येते की, अक्कल दाढ आल्यामुळे माणूस फार हुशार होत नाही. बुद्धिमत्ता आणि अक्कल दाढ यांचा काहीही संबंध नाही. मग अशी कल्पना का दृढ झाली ?
प्रौढ व्यक्तीला एकूण ३२ दात असतात. यापैकी वरील दोन आणि खाली दोन असे एकूण ४ अक्कल दाढा असतात. ही दाढ तुमच्या तोंडात दातांच्या ओळीत सगळ्यात शेवटी येतात. हे दात साधरण १७ ते २१ वर्षांच्या दरम्यान येतात. परंतु संशोधनाने हे सिद्ध केलं आहे की, त्यांचा बुद्धिमत्तेशी कोणताही संबंध नाही.
ही दाढ खुप उशीरा म्हणजे पौढ वयात येते. तो पर्यंत व्यक्ती कोणताही निर्णय घेण्यासाठी सक्षम असते आणि त्यावेळी व्यक्ती योग्य निर्णय घेऊ शकते. म्हणजेच योग्य आणि अयोग्य यातील फरक समजण्याची अक्कल त्या व्यक्तीला आलेली असते म्हणूनच कदाचित त्या दाढेचा संबंध अक्कलेशी जोडला असावा.
अक्कल दाढे उशिरा का येते???
खरं तर लहान मुलांचा जबडा एवढा लहान असतो की त्यामध्ये अक्कल दाढ बसु शकेल एवढी जागाच नसते. मानवी शरीराची जशी वाढ होते तसा त्याचा जबडा देखील वाढतो त्यामुळेच अक्कल दाढ ही उशिरा म्हणजेच प्रौढ वयात येते.
यामागील आणखी एक कारण म्हणजे त्या वयापर्यंत त्याची गरज सुद्धा नसते. आदिमकाळातील लोक कच्चे मांस, कंदमुळे किंवा कठीण फळे खाताना दात गमावतील तेंव्हा बॅक अप प्लॅन म्हणून ही अक्कल दाढेतील दातांची योजना होती. काही कारणांमुळे दात गमावलेल्या व्यक्तींसाठी ही दाढ वरदान ठरते.
अक्कल दाढ काढून का टाकतात ?
अक्कल दाढ काढून टाकणे आजकाल फारच सामान्य झाले आहे. कारण आधुनिक मानवी जबडे हे दात मावतील एवढे लांब वाढत नाही. प्राचीन मानव कठोर काजू, न शिजवलेल्या भाज्या, मांस आणि इतर कठीण पदार्थांनी भरलेला आहार खात. लहानपणी हा आहार घेतल्याने त्यांचा जबडा जास्त लांब होत असे. परंतु आधुनिक काळात लोक मऊ, नीट शिजवलेले , प्रोसेसिंग केलेले अन्न खाण्याकडे वळले आहेत. त्यामुळे जबडा वाढण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे अर्धवट आलेले हे दात अधिक त्रास देतात. तसेच अक्कल दाढ येताना आपल्याला त्याचा प्रचंड त्रास होतो. या अक्कल दाढींमुळे अनेक समस्या उद्भवतात.
यामध्ये पोकळीची समस्या, इन्फेक्शन, दातांच्या सभोवतालचे नुकसान आणि हाडांमुळे आजूबाजूचा भाग खराब होणे यासारख्या समस्यांचा समावेश आहे. अक्कल दाढ काढल्यानंतर पहिल्या दिवशी रक्तस्त्राव होऊ शकतो किंवा काही काळ सूज देखील जाणवू शकते असे डॉक्टर सांगतात. अशा परिस्थितीत काही काळ ब्रश न वापरण्याचा सल्ला देखील दिला जातो.
संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.