लोकदर्शन 👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
लॅपटॉपवर काम करणं ही आता काळाची गरज झाली आहे.. अभ्यासापासून ते ऑफिसपर्यंत आता सगळं काही ऑनलाईन झाल्याने लॅपटॉपचं कामही वाढलं आहे.. लॉकडाऊननंतर तर डेस्कटॉप ऐवजी बऱ्याच ठिकाणी लॅपटॉप आले आणि काम करण्याचे तासही वाढले.. पण यामुळेच आता आरोग्याच्या अनेक समस्यांना निमंत्रण मिळाले आहे. त्यामुळे तुमचीही लॅपटॉप वापरण्याची पद्धत चुकत तर नाहीये ना, हे एकदा तपासून पहा.
१. योग्य अंतर ठेवा..
लॅपटॉपच्या आसपास इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा प्रभाव खूप जास्त असतो. हे रेडिएशन्स आरोग्यासाठी चांगले नसतात. त्यामुळे मोबाईलचा अतिवापर जसा आरोग्यासाठी हानिकारक असतो, तसाच लॅपटॉपचा अतिवापर किंवा शरीराच्या अगदी जवळ ठेवून केलेला वापर आरोग्यदायी नसतो. त्यामुळे लॅपटॉपची स्क्रिन ते तुमचा हात यांच्यातलं अंतर ३० इंच असावं. यासाठी तुम्ही लॅपटॉपचा किबोर्ड न वापरता दुसरा किबोर्डही त्याला अटॅच करू शकता. लॅपटॉप मांडीवर ठेवून काम करणे टाळा.
२. हातांना सपोर्ट मिळत नाही…
तुम्हाला जर सारखे टायपिंग करावे लागत असेल किंवा किबोर्डचा जास्त वापर करावा लागत असेल, तर तुमच्या हातांना योग्य तो आधार मिळत नाही. हात अवघडलेल्या परिस्थितीत ठेवून अनेक जण लॅपटॉपवर काम करत असतात. यामुळे बोटांपर्यंत व्यवस्थित रक्तप्रवाह न होणं, हाताला वारंवार मुंग्या येणं यासारखा त्रास होऊ शकतो. हा त्रास वाढत गेला आणि वेळीच काळजी घेतली नाही, तर हाताच्या संवेदनाही कमी होऊ शकतात. त्यामुळे संगणकावर काम करताना बोटे आणि हाताचे कोपरे एका समाना रेषेत राहतील याची काळजी घ्या.
३. २०- २०- २० चा नियम पाळा…
लॅपटॉपवर दिर्घकाळ काम करून डोळ्यांना खूपच थकवा येऊन जातो. त्यामुळे नजर तर कमजोर होतेच, पण त्यासोबतच डोळ्यांना खाज येणे, जळजळणे, आत ओढल्यासारखे वाटणे अशा अनेक तक्रारीही वाढतच जातात. त्यामुळे लॅपटॉपवर काम करताना २०- २०- २० चा नियम पाळा. हा नियम असा की २० मिनिटे लॅपटॉपवर काम केल्यानंतर २० सेकंदासाठी तुमच्यापासून २० फुट लांब असणाऱ्या वस्तूंवर नजर स्थिर ठेवा. यामुळे डोळ्यांचा व्यायाम होतो.
४. मान आणि पाठदुखी टाळण्यासाठी…
लॅपटॉपवर काम करताना पाठ आणि मान दुखत असल्याची तक्रार अनेक जण करतात. हा त्रास टाळण्यासाठी लॅपटॉपची स्क्रिन आणि तुमची नजर या दोन्ही गोष्टी एकमेकांना समांतर असाव्या. तुम्हाला मान खूप वर करून किंवा खाली करून लॅपटॉपकडे पाहावे लागत असेल, तर तुमची बसण्याची पद्धत चुकीची होत आहे, हे लक्षात घ्या. यामुळे डोळ्यांनाही त्रास होऊ शकतो. तसेच लॅपटॉपवर काम करताना पाठीचा कणा ताठ ठेवा.
संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.