गरोदरपणात वाढलं वजन तर काय बिघडलं; काजल अग्रवाल म्हणते गरोदरपणात 8 गोष्टी आवश्यकच.

 

लोकदर्शन👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
14 फेब्रुवारी 2022

 

अभिनेत्री काजल अग्रवालनं इन्स्टाग्रामवर लिहिलेली पोस्ट अवश्य वाचावी आणि गरोदर नसलेल्या महिलांनीही ती आवर्जून वाचावी. तिच्या पोस्टमधून गरोदरपणातला आनंद , अनुभव, अडचण, मदत याकडे बघण्याचा प्रसन्न आणि प्रेमळ दृष्टिकोन मिळतो.

काजल म्हणते गरोदरपणात बदलणाऱ्या शरीरवर कोणी बोचरी कमेण्ट करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. हे का होतं आहे याची कारणं समजून घ्या.
गरोदरपण हा आयुष्यातला असा टप्पा आहे, जो फक्त आनंदानं मनमुराद जगून घ्यायचा असतो, संकोचून, शरमून कुढत घालवायचा नसतो.
गरोदरपणात या अवस्थेविषयी जास्तीत जास्त शिकून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. यामुळे गरोदरपणातल्या नकारत्म बाबींवर नक्कीच नियंत्रण ठेवता येतं.
गरोदरपण म्हणजे बाईच्या आयुष्यात, तिच्या शरीर आणि मनात प्रचंड घडामोड करणारा एक नाजूक टप्पा. या टप्प्यात आनंद, उत्सुकता, अस्वस्थता अ, कुतुहल,प्रेम, माय, चिडचिड अशा अनेक भाव भावनांची सरमिसळ होत असते. विविध भावभावनांच्या सोबत गरोदरपण सरतं.. नंतर पुढच्या आयुष्यात या अवस्थेविषयी केवळ आठव्णी राहातात. ‘किती सुंदर क्षण होते ते, पण आपल्याला नीट जगताच आले नाही’ अशी खंत अनेकींना वाटत राहाते. ती वाटू नये म्हणूनच अभिनेत्री काजल अग्रवाल गरोदर महिलांना देत असलेल्या सल्ल्याकडे लक्ष देणं आवश्यक आहे. काजल स्वत: गरोदर आहे. ती तिच्या आयुष्याचा हा टप्पा आनंदाने जगते आहे. पण सोशल मीडियात तिच्या फोटोवर लोकांनी ‘बाॅडी शेमिंग’ च्या कमेण्टस टाकून या तिच्या आनंदावर विरजण घालण्याचा प्रयत्न केला. पण काजल अग्रवाल ही एक व्यक्ती म्हणून किती सयंमी, समंजस आणि विचारांनी किती प्रगल्भ आहे हे काजलने ट्रोलर्सल्या दिलेल्या प्रतिक्रियेतून दिसून येते.

गरोदरपणातले आनंदी क्षण साजरे करण्याच्या निमित्ताने ती नवऱ्यासोबत ( गौतम किचलू) दुबईला गेली होती. तिथले फोटोत टिपलेले आनंदी क्षण तिने सोशल मीडियावर कौतुकानं शेअर केले. पण काहींना काजल अग्रवालच्या चेहऱ्यावरचा आई होण्याचा आनंद दिसण्यापेक्षा तिच्या बदललेल्या शरीरावर कमेण्टस केल्या. पण यामुळे स्वत:मधला संयम जराही ढळू न देता काजल अग्रवालने ट्रोलर्सला उत्तर दिलेच सोबत गरोदर महिलांना या अवस्थेतील शरीर मनातील बदलांकडे कसं बघायला हवं, या अवस्थेतला आनंद कसा उपभोगायचा, आयुष्यातल्या या नाजूक टप्प्यातील अस्वस्थता कशी हाताळायची याबाबतचा मोलाचा सल्ला देखील दिला. काजल अग्रवालने ट्रोलर्सला दिलेल्या उत्तरातून गरोदरपणात शरीरातील होणाऱ्या बदलांमुळे संकोचून गेलेल्या महिलांना आपल्या शरीराकडे सकारात्मकतेने बघण्याचा दृष्टिकोन मिळतो. गरोदर असलेल्या महिलांनी अभिनेत्री काजल अग्रवालनं इन्स्टाग्रामवर लिहिलेली पोस्ट अवश्य वाचवी आणि गरोदर नसलेल्या महिलांनीही ती आवर्जून वाचावी. तिच्या पोस्टमधून गरोदरपणातला आनंद , अनुभव, अडचण, मदत याकडे बघण्याचा प्रसन्न आणि प्रेमळ दृष्टिकोन मिळतो.

काय म्हणते काजल ?
काजल अग्रवाल ऑक्टोबर 2020मध्ये व्यावसायिक असलेल्या गौतम किचलू याच्याशी विवाहबध्द झाली. लग्नानंतर काहीच महिन्यात काजल अग्रवाल गरोदर असल्याच्या अफवा पसरल्या. पण यामुळे चिडून न जाता तिने तेव्हाही शांतपणे उत्तर दिले होते. आई होणं ही खूप सुंदर आणि अवघड गोष्ट आहे. मूल झाल्यानंतर एक आई म्हणून स्त्रीला काय काय करावं लागतं, हे मी माझ्या बहिणीच्या उदाहरणावरुन पाहाते आहे, अनुभवते आहे. पण आपल्या आयुष्यात एका लहान जीवाचा प्रवेश होणार आहे, ही कल्पनाच मला मोहवून टाकते. आणि जेव्हा प्रत्यक्षात माझ्या आयुष्यात असं लहान मूल होईल तेव्हा मला होणारा आनंद नक्कीच यापेक्षाही जास्त असेल!’ तेव्हा काजलनं प्रतिक्रिया देताना आईपणाच्या भावनेकडे लक्ष वेधलं होतं. आता प्रत्यक्ष ती गरोदर आहे. या अवस्थेतील शरीरातल्या बदलांकडे नकारात्मकरित्या पाहाणाऱ्या लोकांच्या प्रतिक्रियांमुळे काजल व्यथित झाली. पण म्हणून संतापून प्रतिक्रिया देण्याऐवजी काजलनं शांतपणे प्रतिक्रिया देण्याची भूमिका घेतली. यातून ट्रोलर्सला तर उत्तर मिळालंच शिवाय गरोदर महिलांनाही तिच्या पोस्टमधील काही सल्ल्यांचा नक्कीच उपयोग होणार आहे.

काजल म्हणते, ‘सध्या मी माझ्या आयुष्यात, शरीरात, माझ्या घरात आणि कामाच्या ठिकाणी होणारे बदल आणि स्थित्यंतरे अनुभवते आहे. अशा परिस्थितीत गरोदरपणात बदलणाऱ्या शरीरावर होणारे कमेण्टस, संदेश, मीम्स खरंतर काहीच आपली मदत करत नाही. अशा परिस्थितीत चिडून जाता शांत आणि प्रेमळ राहावं. आणि हे जमत नसेल तर त्याकडे सरळ दुर्लक्ष करावं. गरोदरपणात आपल्या शरीरात कितीतरी बदल होतात. वजन वाढण्यापासून ते त्वचेत आणि केसांच्या बाबतीतही बदल झालेले दिसतात. कारण शरीरातील हार्मोन्स बदलत असतात. पोटात बाळ वाढत असतं आणि एकीकडे हे हार्मोन्स बदलत असतात. साहजिकच गरोदर बाईच्या पोटाच्या स्तनांच्या आकरात बदल होणारच. पोटसोबत शरीराचं वाढलेलं आकारमान गरोदर बाईला बाळाची काळजी घेण्यासाठी मदत करत असतं. याकाळात त्वचा ताणली जाते. चेहऱ्यावर मुरुम पुटकुळ्या येतात. एरवीपेक्षा खूप थकवा जाणवायला लागते, भावनिक स्थित्यंतरं होत राहिल्याने दिवसभर मूड बदलतात. अशा परिस्थितीत कोणाचं टोचणारं बोलणं मनावर घेतलं तर आपलंच आरोग्य बिघडतं. त्यामुळे गरोदरपणात बदलणाऱ्या शरीरवर कोणी बोचरी कमेण्ट करत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करा. हे का होतं आहे याची कारणं समजून घ्या!’

बाळंतपणानंतर आपलं शरीर पुन्हा पहिल्यासारखं होण्यास वेळ लागू शकतो. किंवा कदाचित गरोदर होण्यापूर्वी जसा आपला शरीराचा आकार होता, तो आकार, तो शेप, ती फिगर पुन्हा मिळतही नाही. पण म्हणून काय एवढं दु:ख करायचं? गरोदरपणात शरीरात होणारे बदल, बाळंतपणानंतरही शरीरात टिकून राहाणारे बदल हे नैसर्गिक आहेत. आपल्या आयुष्यातल्या या बदलांशी जुळवून घ्यायला जमायला हवं. आपल्या शरीरातून एक नवीन शरीर, एक नवा जीव आकार घेतो आहे, याचं समाधान आणि आनंद बाळगून या बदलांकडे बघितल्यास बदलांवर होणाऱ्या टिकेला आपण नक्कीच महत्त्व देणार नाही. गरोदरपणात महत्त्व द्यायचंच असेल तर गरोदरपणातआपल्या मनात उमलणाऱ्या भावभावनांना द्या. गरोदरपण हा आयुष्यातला असा टप्पा आहे, जो फक्त आनंदानं मनमुराद जगून घ्यायचा असतो, संकोचून, शरमून कुढत घालवायचा नसतो!’

गरोदरपण जगताना…
काजल अग्रवाल गरोदरपणात केवळ आनंदी राहाण्याचा सल्ला देते असं नाही तर या काळात निरोगी शरीर , आनंदी मन राखण्यासाठी काय करावं याबाबत स्वत: करत असलेले उपायही सांगते.

1. गरोदर महिलांनी आपल्या शरीराबद्दल नकारात्मक विचार करण्याआधी स्त्री शरीरातच बाळ जन्माला घालण्याची आणि त्याचं पोषण करण्याची चमत्कारिक क्षमता असते , हे समजून घ्यावं. गरोदरपणात शरीरात होणारे काही बदल हे खरोखर अस्वस्थ करणारे असतात. पण हे बदल आपल्या पोटातल्या बाळाच्या योग्य वाढीसाठी होत आहेत हे आधी लक्षात घ्यावं. गरोदरपण् ही काही कायम टिकून राहाणारी अवस्था नव्हे.

2. गरोदर महिलांनी रोज सकारात्मक विचार करावा, सकारात्म्क आणि मनाला आनंद देणाऱ्या कृती कराव्यात. आपलं शरीर पोटातलं बाळ वाढण्यासाठी कसं बदलतंय यावर लक्ष केंद्रित करावं.

3. या काळात मनात येणारे विचार भावना आपल्या जोडीदाराला, कुटुंबातील व्यक्तींना सांगाव्यात. यामुळे मनात जर वाईट भावना/ विचार येत असतील तर ते बाहेर पडतात, मनात साचून राहात नाही.

4. डाॅक्टरांच्या सल्ल्यानुसार रोज पोहोणं, चालणं असा व्यायाम करावा. शारीरिक व्यायामामुळे मन शांत राहतं. आपलं सगळं लक्ष पोटात वाढणाऱ्या बाळाकडे केंद्रित होतं. याचा बाळाची वाढ चांगली होण्यास मदत होते.

5. गरोदर असताना तज्ज्ञ आणि आपल्या डाॅक्टरांच्या सल्ल्याने योगसाधना करावी. योगसाधनेमुळे गरोदरपणात शरीर कसं दिसतं यावरचं लक्ष या आपल्या मनाकडे केंद्रित होतं. शरीर आणि मन यांचा आवश्यक असलेला संवाद गरोदरपणातल्या योगसाधनेमुळे घडून येतो.

6. आपल्या डाॅक्टरांचा सल्ला घेऊन गरोदरपणात मसाज घेतल्यास शरीर आणि मनावरचा ताण निघून जातो. यामुळे गरोदरपणात आनंदी आणि समाधानी राहाता येतं. तसेच या मसाजमुळे त्वचेलाही लाभ होतात.

7. गरोदरपणात या अवस्थेविषयी जास्तीत जास्त शिकून आणि जाणून घेण्याचा प्रयत्न करावा. यामुळे गरोदरपणातल्या नकारत्म बाबींवर नक्कीच नियंत्रण ठेवता येतं.

8. गरोदपणात मानसिक आरोग्य निरोगी ठेवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाचा, समुपदेशकांचा सल्ला घ्यावा. मानसिक पातळीवर मदत लागल्यास ती अवश्य घ्यावी. या मदतीचा स्वत:ला, पोटातल्या बाळाला फायदा होत असतो.

संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
14 फेब्रुवारी 2022

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *