लोकदर्शन 👉 संकलन व प्रसिद्धी
✍️ ll खडखड-परखड ll ✍️
ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते रणजीतसिंह डिसले गुरुजी यांचे रजा प्रकरण गेल्या पंधरवड्यापासून बरेच गाजत आहे. रजेच्या अर्जातील त्रुटी दूर करण्यासाठी सोलापूर जिल्हा परिषदेच्या विभागाने अर्ज प्रलंबित ठेवल्यावर डिसले गुरुजींनी प्रसारमाध्यमांसमोर हे प्रकरण चुकीच्या पद्धतीने मांडून आपल्यावर अन्याय होत असल्याचा कांगावा केला होता. प्रसारमाध्यमांनीसुद्धा डिसले गुरुजींची बाजू घेऊन धडाकेबाज बातम्यांचा रतीब घातल्यामुळे अखेर शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी हस्तक्षेप करून डिसले गुरुजींना पीएचडी साठी अमेरिकेला जाण्याकरीता हवी असलेली रजा मिळवून दिली. एवढ्यावर हे प्रकरण थांबलेले नाही, तर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी त्यांना नोटीस पाठवून काही खुलासा विचारल्यामुळे या प्रकरणाचा आता दुसरा अध्याय सुरू झाला आहे. त्यातूनच, डिसले गुरुजी यांच्याविरुद्ध प्रशासकीय कारवाई करण्याच्या हालचाली ही सुरू झाल्या आहेत.
रणजीतसिंह डिसले हे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी या तालुक्याचे ठिकाण असलेल्या शहरातील रहिवासी आहेत. 2009 मध्ये ते सोलापूर जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षक म्हणून रुजू झाले होते. काही वर्षांपूर्वी त्यांची नेमणूक माढा तालुक्यातील परितेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाली होती. हे डिसले गुरुजी जिल्हा परिषदेच्या इतर सामान्य शिक्षकांसारखे नव्हते, तरुण संशोधक वृत्तीचे होते . शिक्षण पद्धती अधिक सुलभ करण्याच्या दृष्टीने, क्यू आर कोड या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घेता येईल का? असा विचार त्यांच्या डोक्यात 5 वर्षांपूर्वी आला होता. चार-पाच वर्षांच्या प्रयत्नानंतर या संशोधनात त्यांना यश आले. क्यू आर कोड ( म्हणजे क्विक रिस्पॉन्स कोड, म्हणजेच स्वतंत्र जलद प्रतिसाद संकेत ) या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे विद्यार्थ्यांना श्राव्य किंवा दृक्श्राव्य माध्यमातून पाठ्यपुस्तकातील कोणताही धडा, कविता व अन्य माहिती मिळविणे व समजून घेणे सुलभ झाले आहे . मग त्याबद्दलची प्रश्नपत्रिका ही त्याच पद्धतीने मिळू लागली. या सुलभ शिक्षण तंत्रज्ञानामुळे शिक्षण विद्यार्थ्यांच्या घरांपर्यंत जाऊन पोहोचले. इतकेच नव्हे तर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी तर हे तंत्रज्ञान अधिकच उपयुक्त ठरणारे आहे .
याच संशोधनाबद्दल युनेस्को व लंडन येथील वार्की फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दिला जाणारा ग्लोबल टीचर प्राईज हा जागतिक पातळीवरील मानाचा पुरस्कार दि. 3 डिसेंबर 2020 रोजी रणजीतसिंह डिसले यांना जाहीर झाला. या पुरस्कारासाठी जगभरातून 12 हजार नामांकन आले होते. त्यातून अंतिम 10 नावे निवडण्यात आली होती. त्या अंतिम 10 जणांमधून डिसले गुरुजी यांची निवड झाली.असा पुरस्कार मिळविणारे ते भारतातील पहिले शिक्षक ठरले आहेत. या पुरस्कारामुळे सोलापूर जिल्ह्याला ,सोलापूर जिल्हा परिषदेला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर बहुमान प्राप्त झाला आहे.या पुरस्काराची रक्कम 7 कोटी रुपये इतकी होती.तसेच,गेल्या वर्षी जून 2021मध्ये जागतिक बँकेच्या शिक्षण सल्लागारपदी ही त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. इतकेच नव्हे तर,डिसले गुरुजींना नुकतीच पीएचडी साठी अमेरिकेतील फुलब्राईट संस्थेची स्कॉलरशिपसुद्धा मिळालेली आहे. त्यासाठीच ते दि.1ऑगस्टपासून अमेरिकेला जाणार आहेत.
पीएचडी साठी अमेरिकेला जाण्याकरीता डिसले गुरुजींनी दीड महिन्यांपूर्वी मुख्याध्यापकांमार्फत तालुका पंचायत समितीच्या गट शिक्षणाधिकार्यांकडे रजेचा अर्ज दिला होता. तो रजेचा अर्ज तालुका गटशिक्षणाधिकारी यांनी प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडे पाठवून दिला होता. जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाने रजेच्या अर्जावर निर्णय न घेतल्यामुळे अखेर डिसले गुरुजी यांनी गुरुवार दिनांक 20 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेत जाऊन सीईओ दिलीप स्वामी यांची भेट घेतली. त्यावर स्वामी यांनी त्यांना प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची भेट घेण्यास सांगितले होते. प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांची भेट घेतल्यावर त्यांनी डिसले गुरुजींना, तुमच्या संशोधनाचा परितेवाडी जि.प. शाळेला काय फायदा झाला?जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचे नाव उंचावण्यासाठी तुम्ही काय केले? तुमच्या गैरहजेरीत शाळेत शिकवणार कोण? अशी विचारणा केली. तसेच, रजेच्या अर्जातील त्रुटी निदर्शनात आणून देऊन, विहीत नमुन्यात रजेचा अर्ज करण्यास सांगितले. त्यानंतर हताश होऊन डिसले गुरुजी तेथून बाहेर पडल्यानंतर त्यांची काही पत्रकारांशी गाठ पडली. तेव्हा डिसले यांनी पत्रकारांसमोर आपली व्यथा मांडली. पीएचडीसाठी अमेरिकेला जाण्याकरीता मी दीड महिन्यांपूर्वी रजेचा अर्ज दिला होता, तो अर्ज अद्याप मंजूर केला नाही, शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांनी मला त्रास दिला,अर्जाच्या मंजुरीसाठी मला पैशांची मागणी ही करण्यात आली म्हणून मी दोन ते तीन दिवसात नोकरीचा राजीनामा देणार आहे, असे डिसले यांनी डोळ्यांतून अश्रू काढत पत्रकारांना सांगितले.
रणजीतसिंह डिसले सारख्या जागतिक कीर्तीच्या शिक्षकावर घोर अन्याय झाल्याचा साक्षात्कार पत्रकारांना झाला. त्यांच्या डोळ्यातील अश्रू पाहून पत्रकारांचे हृदय कळवळले. वृत्तपत्रे व वृत्तवाहिन्या जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय अधिकाऱ्यांवर तुटून पडले. ” ग्लोबल टीचरची ;लोकल कुचंबणा ” अशा मथळ्याखाली बातम्यांचा रतीब घालणे सुरू झाले . वास्तविक, डिसले गुरुजी भेटल्यानंतर पत्रकार, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनाही भेटले होते. तेंव्हा, रणजीतसिंह डिसले हे तीन वर्षे पूर्व परवानगी शिवाय गैरहजर होते, त्यांनी त्यांच्या संशोधनातून जिल्हा परिषद शिक्षण विभागाचे नाव उंचावण्यासाठी नेमके काय केले? त्यांनी परितेवाडी येथील शाळेसाठी काय केले? याचा शोध घेण्यासाठी त्यांच्या कामाची फाईल सादर करण्यास संबंधित गटशिक्षणाधिकाऱ्यांना सांगितले आहे, अशी माहिती लोहार यांनी पत्रकारांना सांगितली होती. डिसले यांना ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाला आहे अभिमानास्पद आहे, पण त्याचा परितेवाडी शाळेला काय उपयोग झाला? हेही तपासावे लागणार असल्याचे लोहार यांनी स्पष्ट केले होते. परंतु,ती बाजू लक्षात न घेता म्हणजे डिसले गुरुजी यांची दुसरी बाजू तपासून न पाहता, सरकारी बाबू त्यांच्यावर अन्याय करीत आहेत, अशा स्वरूपाच्या बातम्या बहुतेक वृत्तपत्रांनी व वृत्तवाहिन्यांनी दिल्या. त्यामुळे समाज माध्यमांमधूनसुद्धा डिसले गुरुजींची बाजू घेत, सोलापूर जिल्हा परिषदेवर, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांवर तसेच महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण खात्यावर टीकेची झोड उठली . प्रसारमाध्यमं व समाजमाध्यमं यांच्या दबावापुढे राज्याच्या शिक्षण मंत्रालयाला झुकावे लागले. विरोधी पक्षांना या निमित्ताने सरकारविरोधात टीका करण्याची संधी मिळू नये म्हणून शिक्षण मंत्री श्रीमती वर्षा गायकवाड यांनी या प्रकरणात हस्तक्षेप केला व अर्जातील त्रुटी तातडीने पूर्ण करून डिसले यांची रजा मंजूर करावी,असा आदेश त्यांनी सोलापूर जि.प.चे सी.ई.ओ.दिलीप स्वामी यांना दिला. त्यामुळे दिनांक 22 व 23 जानेवारी रोजी शनिवार व रविवार सुट्टीचे दिवस असतानासुद्धा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकारी कार्यालयातील अधिकारी कामावर आले व त्यांनी डिसले गुरुजींकडून आवश्यक ती कागदपत्रे मिळवून, अर्जातील त्रुटींची पूर्तता करून घेतली. त्यानुसार रविवारी सायंकाळपर्यंत डिसले गुरुजी यांना काही अटींसह, दि. 1 ऑगस्ट 2022 ते 31 डिसेंबर 2022 पर्यंत रजा मंजूर करण्यात आली. त्यामुळे या प्रकरणातून मीडियातून व सोशल मीडियातून उठलेले वादळ शांत झाले.
सलग तीन वर्षे गैरहजर
किरण लोहार यांच्या आधी संजय राठोड हे प्राथमिक जिल्हा शिक्षणाधिकारी होते. त्या काळातच डिसले गुरुजी यांच्या गैरहजेरीबाबत जिल्हा परिषदेच्या परितेवाडी येथील शाळेचे मुख्याध्यापक यांचा तसेच, जिल्हा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे प्राचार्य यांचा अहवाल, गैरहजर असतानाही पगार घेतल्याचा अहवाल असे सर्व अहवाल एकत्र करून तालुका गटशिक्षणाधिकार्यांनी त्यावर आपला अहवाल तयार केला होता. या अहवालाची फाईल त्यांनी तत्कालीन शिक्षणाधिकारी राठोड यांच्याकडे पाठवून दिली होती . त्या अहवालात डिसले गुरुजी यांच्या विरोधातील अनेक धक्कादायक बाबी उघड करण्यात आलेल्या आहेत. डिसले गुरुजी यांना दिनांक 1 ऑक्टोबर 2017 ते दिनांक 31 सप्टेंबर 2018 या एक वर्षाच्या कालावधीसाठी सोलापूर जिल्हा शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्थेच्या वेळापूर ( ता. माळशिरस ) येथील केंद्रात प्रतिनियुक्तीवर पाठविले होते. तेथे त्यांनी माहिती-तंत्रज्ञान ( आयटी ) विषयातील ‘ विषय सहाय्यक ‘ म्हणून काम करणे अपेक्षित होते. परंतु, ते वेळापूर केंद्रात रुजू झालेच नाहीत. डिसले गुरुजींनी वेळापूर केंद्रात कोणाला प्रशिक्षण दिले?याची जिल्हा प्रशिक्षण संस्थेकडे किंवा जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालयाकडे कसलीही नोंद नाही. सोलापूर जिल्हा शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांच्या अहवालानुसार, तीन वर्षात डिसले गुरुजी एकही दिवस केंद्रात उपस्थित नव्हते, असे त्या अहवालातून स्पष्ट झाले होते. परंतु,
‘ यावर चर्चा करा ‘ असा साचेबंद शेरा फाईलीवर मारून शिक्षणाधिकारी राठोड यांनी तो अहवाल दडपून ठेवला. किरण लोहार हे शिक्षणाधिकारी म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी या फाईली वरील धूळ झटकली.
विशेष म्हणजे, दिनांक 1 ऑक्टोंबर 2017 पासून जुलै 2020 पर्यंत प्रतिनियुक्तीच्या कालावधीत रजेवर असतानाही डिसले यांनी पगार घेतला होता. ते न सांगता गैरहजर असल्याचे उशीरा लक्षात आल्यावर 1 ऑगस्ट 2020 पासून त्यांना पगार देणे बंद झाले. म्हणजे 2 वर्षे 8 महिने रजेवर असतानाही त्या कालावधीतील पगार घेणे दिसले सारख्या शिक्षकांना मुळीच शोभनीय नाही. हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा आहे. जिल्हा शिक्षणाधिकारी याप्रकरणी त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करू शकतात. परंतु, ग्लोबल टीचर विजेत्या डिसले गुरुजीं विरुद्ध गुन्हा दाखल करायला राज्याचे शिक्षण मंत्रालय परवानगी देण्याचे धाडस दाखविणार का?हा खरा प्रश्न आहे.
दुसरी गोष्ट म्हणजे, प्रतिनियुक्तीवर गेलेल्या इतर शिक्षकांप्रमाणेच डिसले गुरुजी यांनाही 30 एप्रिल 20 20 रोजी कार्यमुक्त करण्यात आले होते. त्यानंतर तरी लगेच डिसले यांनी परितेवाडी येथील जि. प. शाळेत रुजू होणे आवश्यक होते ,परंतु ते रुजू झालेच नाहीत. दुसरीकडे डिसले गुरुजी म्हणतात की, मला एक वर्षासाठी प्रतिनियुक्तीवर पाठविले होते. माझे काम चांगले होते म्हणूनच आणखी दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली होती. या कालावधीत मी 42 हजार विद्यार्थ्यांना व 1553 शिक्षकांना प्रशिक्षण दिलेले आहे, असा दावाही डिसले यांनी माध्यमांशी बोलताना केलेला आहे. त्यामुळे दिसले यांचा दावा खरा आहे? की, जिल्हा प्रशिक्षण संस्था व जिल्हा शिक्षणाधिकारी कार्यालय यांचा अहवाल खरा आहे? डिसले गुरुजींनी नेमके प्रशिक्षण कोणत्या संस्थेमार्फत व कोणाला दिले? याचा शोध घेण्यासाठी तसेच, डिसले गुरुजींच्या सर्वच बेशिस्त वर्तनाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी करण्यासाठी शिक्षण खात्याच्या सचिवांच्या मार्गदर्शनाखाली आणखी एक चौकशी समिती नेमण्याची गरज आहे. कारण, डिसले यांनी सोलापूर जिल्हा परिषदेच्या शाळेतील एकाही विद्यार्थ्याला प्रशिक्षण दिलेले नाही किंवा जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाचा दर्जा उंचावण्यासाठी त्यांनी काहीही केलेले नाही हे कटूसत्य आहे . म्हणजे ज्या संस्थेचा त्यांनी पगार घेतला पगार त्या संस्थेसाठी त्यांच्या संशोधनाचा काडी इतकाही उपयोग झालेला नाही ही वस्तुस्थिती आहे .
डिसले यांनी सिंहगड इन्स्टिट्यूट या एका खासगी शिक्षण संस्थेमार्फत परदेशातील विद्यार्थ्यांना व शिक्षकांना ऑनलाइन प्रशिक्षण दिले असल्याची माहिती पुढे आली आहे. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना प्रशिक्षण दिल्याचा दावा डिसले गुरुजी करतात त्यातील बहुसंख्य लोक हे परदेशातील आहेत. हे काम डिसले गुरुजी यांनी फुकट गेले नसणार.या कामासाठी त्यांना मोठे मानधन मिळाले असणार. म्हणजे नोकरी एकाची आणि प्रत्यक्ष काम दुसऱ्या संस्थेचे करणे, हे डिसले गुरुजींचे वर्तन निश्चितच अनैतिक आहे. या प्रकरणाचीसुद्धा राज्याच्या शिक्षण मंत्रालयाने सखोल चौकशी करण्याची गरज आहे.
जागतिक पुरस्काराबद्दल संशय
दिनांक 3 डिसेंबर 2020 रोजी ग्लोबल टीचर पुरस्कार मिळाल्यापासून दिसले गुरुजी सतत प्रसिद्धीच्या झोतात वावरत आहेत. पुरस्कार मिळाल्याच्या काही महिन्यानंतर बार्शीतील एका माहिती अधिकार कार्यकर्त्याने व सोलापुरातील एका पत्रकाराने, डिसले गुरुजींना मिळालेल्या पुरस्काराबाबत संशय व्यक्त करून जिल्हा शिक्षण विभागाकडे लेखी तक्रार केली,तसेच माहिती अधिकार कायद्याखाली त्यांनी डिसले गुरुजींना मिळालेल्या पुरस्काराबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले होते. या तक्रारींवरून जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी कुर्डूवाडी पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मारुती फडके, विस्तार अधिकारी उमा साळुंके यांच्यासह पाच जणांची चौकशी समिती नेमली होती. या चौकशी समितीने दिनांक 25 मार्च 2021 रोजी जिल्हा शिक्षणाधिकारी यांना अहवाल सादर केलेला आहे. डिसले गुरुजींनी ग्लोबल टीचर पुरस्कारासाठी नामांकन सादर करण्यापूर्वी जिल्हा शिक्षणाधिकारी यांची पूर्व परवानगी घेतलेली नव्हती. अमेरिकेतील ज्या संस्थेने त्यांना हा पुरस्कार दिला आहे त्या संस्थेशी ई-मेलद्वारे झालेला पत्रव्यवहार, पुरस्कार मिळाल्याचे छायाचित्र व व्हिडीओ क्लिप देण्याची विनंती समितीने डिसले गुरुजींना केली होती. परंतु, डिसले यांनी ते देण्यास नकार दिला,असे ही चौकशी समितीच्या अहवालात नमूद केलेले आहे.चौकशी समितीतील आपल्याच वरिष्ठ अधिकाऱ्यांना, त्यांनी मागितलेले पुरावे देण्यास नकार देणे हा डिसले गुरुजींचा उद्दामपणा नव्हे काय? डिसले गुरुजींच्या या अशा वागण्यामुळेच त्यांच्या पुरस्कारा भोवती संशयाचे धुके निर्माण झाले आहे.
रविवार दिनांक 23 जानेवारी रोजी सायंकाळपर्यंत डिसले गुरुजी यांची राजा मंजूर केल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी दिनांक 24 जानेवारी रोजी जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी डिसले गुरुजींना नोटीस पाठविली आहे. माढा तालुका गट शिक्षण अधिकाऱ्यांनी सही केलेला रजेचा अर्ज डिसले गुरुजी यांना ‘बाय हॅन्ड’ जिल्हा शिक्षणाधिकारी यांना देण्यासाठी दिला होता. तो अर्ज डिसले गुरुजींनी स्वतःकडेच 8 दिवस ठेवून घेतलेला होता. तो अर्ज त्यांनी दिनांक 31 डिसेंबर रोजी शिक्षणाधिकारी कार्यालयाला दिला . पुढे कार्यालयांना सुट्ट्या असल्यामुळे तो अर्ज दिनांक 4 जानेवारी रोजी आस्थापना विभागाला प्राप्त झाला. दिनांक 5 जानेवारी रोजी अर्जातील त्रुटींच्या व आवश्यक त्या कागदपत्रांच्या पूर्ततेसाठी डिसले यांना ई-मेल वरून व फोन वरून कळविण्यात आले होते. दिनांक 13 जानेवारीपर्यंत आवश्यक ती कागदपत्रे न मिळाल्याने जिल्हा शिक्षण विभागाने डिसले गुरुजींना स्मरणपत्र ही पाठविले होते. तरीसुद्धा, आवश्यक ती कागदपत्रे न देता व रजेच्या अर्जतील त्रुटींची पूर्तता न करता डिसले गुरुजी दिनांक 20 जानेवारी रोजी थेट सीईओ स्वामी यांना रजेसाठी भेटले होते. हा सर्व घटनाक्रम सीईओ दिलीप स्वामी यांनी डिसले गुरुजी यांना पाठविलेल्या नोटिशीत नमूद केला आहे. तसेच, रजेचा अर्ज मंजूर करण्यास प्रशासनाकडून कोठेही विलंब झालेला नसताना, तुमचा अर्ज अडवून ठेवला असे तुम्ही कसे म्हणता ? तुम्हाला त्रास कोणी दिला? रजा मंजूर करण्यासाठी तुम्हाला पैसे कोणी मागितले? याचा खुलासा करावा,असेही त्या नोटिशीत म्हटलेले आहे.
डिसले गुरुजींना ही नोटीस देऊन आज आठ दिवस पूर्ण झाले आहेत, तरीही अद्यापपर्यंत डिसले यांनी या नोटीसवर कसलाही खुलासा दिलेला नाही. डिसले गुरुजी यांनी प्रसारमाध्यमांना खोटी माहिती देऊन सोलापूर जिल्हा परिषदेची व जिल्हा शिक्षण विभागाची नाहक बदनामी केल्याबद्दल त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्याच्या हालचाली चालू झाल्या असल्याचे दिसते. ही कारवाई डिसले गुरुजी अमेरिकेला जाण्यापूर्वी करणार? की अमेरिकेला जाऊन पीएचडी शिक्षण पूर्ण करून आल्यानंतर करणार?हे मात्र लवकरच कळेल. आधीचे गैरहजेरीचे बेशिस्त वर्तन, गैरहजर असताना पगार घेण्याचे फौजदारी स्वरूपाचे कृत्य व रजेच्या अर्जावरुन प्रशासनाची नाहक केलेली जाहीर बदनामी या सर्व गोष्टी ग्लोबल टीचर पुरस्कार विजेते डिसले यांच्या अंगलट येण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्हा शिक्षणाधिकारी महोदय,” स्वामी “तुमच्या पाठीशी आहेतच . तेंव्हा ,
” सौ सोनार की ; एक लोहार की l ” असा घाव आता तुम्ही घालाच !
डी.डी. कुलकर्णी,सोलापूर
( डिसले गुरुजी प्रकरणाची दुसरी बाजू जनतेसमोर येण्यासाठी,ही बातमी अधिकाधिक लोकांना फॉरवर्ड करा )