लोकदर्शन 👉संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.
साभार – चारुशिला जुईकर.
‘तो आला… तो धावला… तो जिंकला…! – हे त्याच्या बाबतीत नेहमीचंच झालं आहे. कारण, गेली अनेक वर्षं तो जिंकतोच आहे… आणि तेसुद्धा आतापर्यंतचा जगातील सर्वांत वेगवान मानव या बिरूदानिशी… या वेगवान मानवाचं नाव आहे – युसेन बोल्ट… ज्यानं आपलं नाव गेल्या दोन्ही ऑलिंपिक क्रिडास्पर्धांतील शंभर मीटर आणि दोनशे मीटर अंतरांच्या शर्यतींतील सुवर्णपदकांवर कोरलं आहे… जो गेल्या तीन जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धांत शंभर मीटर अंतराच्या शर्यतीत दोन वेळा, तर दोनशे मीटर शर्यतीत तीन वेळा विजेता ठरला आहे… ज्याच्या नावावर शंभर मीटर आणि दोनशे मीटर या दोन्ही अंतरांच्या शर्यतींतले विश्वविक्रम नोंदले गेले आहेत… वेस्ट इंडिजमधील जमैका या देशाचा युसेन बोल्ट छोट्या पल्ल्यांच्या धावण्याच्या शर्यतींतला आजचा सम्राट ठरला आहे!
ऑलिपिंक स्पर्धेसारख्या जागतिक दर्जाच्या स्पर्धांतल्या शंभर मीटर अंतराच्या शर्यतीला आगळंवेगळं महत्त्व असतं. कारण, या शर्यतीतला विजेता हा जगातील सर्वांत वेगवान मानव ठरणार असतो. या शर्यतीत धावणाऱ्याचा अनेक बाबतींत कस लागतो. त्याचं धावणं हे वेगवान असायला तर लागतंच, पण धावपटूनं आपल्या धावण्याच्या क्षमतेचा कोणत्या टप्प्यात कसा वापर करायचा, हेही महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर धावणं सुरू करताना आणि संपवताना दाखवावी लागणारी चपळाईसुद्धा तितकीच महत्त्वाची ठरते. दहा सेकंदांहूनही कमी वेळात संपणाऱ्या या शर्यतीत चुकीला वाव नसतो. किंचितशा ढिलाईमुळं वा चुकीमुळंही संभाव्य विजेत्याच्या पदरी अपयश पडू शकतं. धावपटूंची अनेक दृष्टीनं परीक्षा पाहणाऱ्या अशा शर्यतीतल्या विजेत्याची पद्धत ही इतर खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक, क्रीडा-विश्लेषक, अशा सर्वांच्या दृष्टीनं एक उत्सुकतेचा विषय असते. आजचा सर्वांत वेगवान मानव ठरलेल्या युसेन बोल्टनं तर आपल्या वैशिष्ट्यपूर्ण धावण्यामुळे क्रीडाक्षेत्रातीलच नव्हे, तर विज्ञानातील जैवगतिशास्त्रासारख्या शाखांतील तज्ज्ञांचंही लक्ष वेधून घेतलं आहे.
विश्वविक्रमी युसेन बोल्टची धावण्याची शैली असामान्य आहे. तो अतिशय जलद गतीनं तर धावतोच; पण ही जलद गती तो ज्याप्रकारे राखतो, ते आश्चर्यकारकच आहे. बोल्टच्या धावण्याच्या या शैलीचं गतिशास्त्रावर आधारलेलं विश्लेषण करण्याचा प्रयत्न एरिकसन, हेलेन यांसारख्या संशोधकांनी पूर्वीच केला आहे. अलीकडे नॅशनल ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी ऑफ मेक्सिको या विद्यापीठातील जे.जे.गोमेझ यानंही आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीनं, युसेन बोल्टच्या धावण्याच्या पद्धतीला गणिती सूत्रात बसवून, त्यावरून महत्त्वाचे निष्कर्ष काढले आहेत. गतिशास्त्रावर आधारलेले हे निष्कर्ष निश्चितच अभ्यासण्यासारखे आहेत.
गोमेझ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी केलेली ही गणितं युसेन बोल्टच्या, २००९ साली बर्लिन येथे झालेल्या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेतील अंतिम फेरीतील विश्वविक्रमी कामगिरीवर आधारलेली आहेत. बोल्टनं अवघ्या ९.५८ सेकंदात जिंकलेल्या या शर्यतीत दर ०.१ सेकंदानंतरच्या निरीक्षणांचा वापर ही गणितं मांडताना केला गेला आहे. ही गणितं करताना गोमेझ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी, या शर्यतीच्या वेळचं बर्लिनमधलं तापमान, बर्लिनची समुद्रसपाटीपासूनची उंची, स्पर्धेच्या वेळी वाहणारा वारा, असे अनेक घटक लक्षात घेतले आहेत.
युसेन बोल्टची उंची भरपूर आहे – १.९५ मीटर (म्हणजे सुमारे साडेसहा फूट!). या उंचीचा फायदा बोल्टला नक्कीच मिळतो. त्याच्या दोन पावलांतलं अंतर मोठं असतं. मात्र, भरपूर उंची लाभलेल्या ९४ किलोग्रॅम वजनाच्या बोल्टची अंगकाठीही भरदार आहे. अशी मोठी अंगकाठी असलेल्या धावपटूच्या बाबतीत, धावताना त्याच्या शरीरावर समोरून निर्माण होणारा हवेचा दाबही मोठा असतो. त्यामुळं वेगात धावण्यासाठी अशा धावपटूला पायांची हालचाल तर जोरात करावी लागतेच; पण त्याबरोबर त्याला या हवेच्या दाबामुळं निर्माण होणाऱ्या अडथळ्यालाही सामोरं जावं लागतं. धावताना बोल्टच्या शरीरावर आदळणाऱ्या हवेचं क्षेत्रफळ हे ०.८ चौरस मीटर इतकं भरतं. हवेचा हा मोठा अडथळा पार करण्यासाठी त्याला प्रचंड प्रमाणात ऊर्जा वापरावी लागते. बोल्टनं बर्लिन येथील शंभर मीटरच्या अंतिम शर्यतीत धावताना एकूण जितकी ऊर्जा खर्च केली, त्यापैकी ९२ टक्के ऊर्जा त्याला हवेचा अडथळा पार करण्यासाठी वापरावी लागली. प्रत्यक्ष धावण्यासाठी फक्त ८ टक्के ऊर्जा वापरली गेली.
या शर्यतीत बोल्टची खर्च झालेली ऊर्जा ही, ८.३ टनांचं वजन एक मीटर वर उचलण्यासाठी जितकी ऊर्जा लागेल, तितकी होती. ही ऊर्जा त्याने ९.५८ सेकंदात खर्च केली. सोप्या भाषेत सांगायचं, तर बोल्टनं सुमारे आठ टन वजनाची वस्तू प्रत्येक सेकंदाला सरासरी सुमारे दहा सेंटिमीटर, अशा पद्धतीनं उचलत नेली. पण ही झाली ऊर्जेच्या वापराची सरासरी. धावपटूचा वेग समान नसतो. त्याच्या धावण्याची सुरुवात शून्य वेगापासून होते. नंतर त्याचा वेग वाढत जाऊन तो जवळपास स्थिर होतो. अर्थात, शर्यत संपण्याच्या सुमारास त्यात थोडासा फरक पडू शकतो. पण मग धावपटूला ऊर्जेची जास्तीतजास्त गरज केव्हा भासते? शर्यत सुरू करताना, शर्यत संपताना की शर्यतीदरम्यान मध्येच केव्हा तरी?
गोमेझ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी बोल्टच्या धावण्याचं जे विश्लेषण केलं आहे, त्यानुसार बोल्टच्या बाबतीत जास्तीतजास्त ऊर्जा खर्च केली गेली ती शर्यतीच्या सुरुवातीला नव्हे, तसंच शेवटीही नव्हे… ही ऊर्जा प्रामुख्यानं खर्च झाली आहे, ती शर्यत सुरू झाल्यानंतर ०.८९ सेकंदांनी. या वेळी बोल्टचा वेग होता सेकंदाला ६.२४ मीटर (ताशी २२.५ किलोमीटर) इतका. या शर्यतीतील त्याच्या कमाल वेगाच्या फक्त निम्मा! या काळात त्याचा वेग वाढत असताना, त्याला हवेच्या अडथळ्यालाही तोंड द्यायचं होतं. परिणामी, या वेळी बोल्ट वापरत असलेल्या शक्तीचं प्रमाण हे या शर्यतीत त्यानं वापरलेल्या सरासरी शक्तीच्या चौपट इतकं झालं होतं. बोल्ट जसा आपल्या अपेक्षित वेगाच्या जवळ पोहोचू लागला, तसा तो वापरत असलेल्या शक्तीचं प्रमाण कमी होत गेलं. शर्यतीच्या अखेरच्या टप्प्यात तर हा वापर अत्यल्प झाला.
शर्यतीला सुरुवात करण्याचा संदेश मिळाल्यानंतर, धावपटूनं प्रत्यक्ष धावायला सुरुवात करेपर्यंत किंचितसा वेळ जातो. बोल्टच्या बाबतीत हा काळ ०.१५ सेकंद इतका होता. एकदा धावायला सुरुवात केल्यानंतर, दोन सेकंदांत त्यानं बारा मीटरचं अंतर पार केलं. या दोन सेकंदांत त्यानं आपला वेग वाढवत सेकंदाला नऊ मीटरपर्यंत नेला होता. निम्मं अंतर पार होण्याच्या सुमारास (म्हणजे शर्यत सुरू झाल्यापासून सुमारे साडेपाच सेकंदांनी) त्याचा वेग हा सेकंदाला बारा मीटरच्या आसपास पोहोचला. उर्वरित निम्मं अंतर पार करताना एखाददुसऱ्या टक्क्याचा फरक वगळता त्याचा वेग जवळपास स्थिर होता. या काळात त्याच्या वेगाची सरासरी सेकंदाला १२.१५ इतकी भरत होती. दर एक-दशांश सेकंदानं केलेल्या या निरीक्षणानुसार बोल्टनं आपला जास्तीतजास्त वेग हा सत्तर मीटरचं अंतर पार करताना गाठला होता. अत्यल्प वेळेपुरता टिकलेला हा अत्युच्च वेग सेकंदाला १२.३५ मीटर (ताशी सुमारे ४४ किलोमीटर) इतका होता. शर्यत संपताना त्याचा कोणताही प्रतिस्पर्धी जवळपास नसल्यानं शेवटच्या पाच-सहा मीटरमध्ये मात्र त्याचा वेग किंचितसा कमी झाला.
शर्यतीच्या उत्तरार्धात स्थिर राहिलेल्या बोल्टच्या वेगावरून गोमेझ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी काही निष्कर्ष काढले आहेत. या निष्कर्षांनुसार धावपटू हा आपापल्या क्षमतेनुसार एका ठरावीक बलाचाच वापर करत असतो. शर्यतीच्या सुरुवातीच्या टप्प्यात, जेव्हा धावपटू आपला वेग वाढवीत असतो, तेव्हा त्याच्या वेगात मोठ्या प्रमाणात वाढ होत असते. या वाढत्या वेगाबरोबरच त्याला होणारा हवेचा विरोधही वाढत जातो. परिणामी, धावपटूच्या वेगातील वाढही कमी होत जाते. अखेर धावपटूचा वेग आणि त्याला होणारा हवेचा अडथळा यांत एक प्रकारचं संतुलन साधलं जाऊन त्याच्या वेगातली वाढ थांबते. या स्थितीनंतर धावपटू एका ‘अंतिम’ वेगानं धावू लागतो. (आकाशातून पडणाऱ्या पावसाच्या थेंबाच्या बाबतीतही अशीच परिस्थिती घडून येते.) मात्र, या अंतिम वेगानं एखादा धावपटू किती वेळ धावू शकेल, हे त्या-त्या धावपटूच्या क्षमतेवर अवलंबून असतं.
बोल्टनं शर्यतीच्या उत्तरार्धात जवळपास स्थिर राखलेला, सेकंदाला सुमारे १२.१५ मीटर हा वेग गोमेझ आणि त्याच्या सहकाऱ्यांना अपेक्षित असलेला ‘अंतिम’ वेगच आहे. या अंतिम वेगात सातत्य राखण्याची आपल्याकडे उत्तम क्षमता असल्याचं, बोल्टनं या स्पर्धेतील दोनशे मीटर अंतराच्या शर्यतीतील निकालाद्वारे दाखवून दिलं आहे. बर्लिनच्या या जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत त्यानं दोनशे मीटर शर्यतीचं विजेतेपदही विश्वविक्रमासह पटकावलं. बोल्ट ज्या वेगानं शंभर मीटरची शर्यत धावला, जवळपास त्याच वेगानं तो दोनशे मीटरच्या शर्यतीतही धावला. दोनशे मीटर अंतराच्या या शर्यतीतलं अंतर त्यानं १९.१९ सेकंदांत पार केलं. म्हणजे शंभर मीटर आणि दोनशे मीटर या दोन्ही शर्यतींतला त्याचा सरासरी वेग हा जवळपास सारखाच होता – सेकंदाला १०.४ मीटर इतका. आपला अंतिम वेग दोनशे मीटर अंतरापर्यंतही स्थिर राखल्यामुळेच बोल्टला हे शक्य झालं होतं.
प्रत्येक पावलाला धावपटूचा वेग वेगळा असतो. त्यानं हे पाऊल किती जवळ वा लांब टाकलं, पायाची हालचाल किती झटकन केली, या बाबी महत्त्वाच्या असतात. उत्तम धावपटू हा आपली पावलं सहजसुंदर लयीत पुढं टाकीत असताे. तसंच, गरजेनुसार तो आपल्या लयीत बदलही करीत असतो. त्यामुळं धावपटूच्या वेगाचं, वेळेनुसार केलेल्या गणिताबरोबरचं पावलांनुसार केलेलं गणितही मनोरंजक ठरतं. बोल्टनं शंभर मीटर अंतराच्या शर्यतीतलं संपूर्ण अंतर पार करताना एकूण ४१ पावलं टाकली. या शर्यतीतलं त्याचं पावलांतलं सरासरी अंतर २.४४ मीटर इतकं होतं.
यापैकी पूर्वार्धातलं निम्मं अंतर पार करायला बोल्टला सुमारे तेवीस पावलं टाकायला लागली. उरलेलं पन्नास मीटरचं अंतर त्यानं १८ पावलांतच पार केलं. सत्तरावा मीटर पार करताना त्यानं जेव्हा काही क्षणांपुरता कमाल वेग गाठला होता, तेव्हा तो आपलं तिसावं पाऊल टाकीत होता. त्याच्या पावलांतलं अंतर या वेळी २.७२ मीटर इतकं होतं. मात्र हे त्याच्या दोन पावलांतलं जास्तीत जास्त अंतर नव्हतं; दोन पावलांतलं त्याचं जास्तीतजास्त अंतर हे शर्यत संपतानाचं होतं. हे अंतर होतं ३.०१ मीटर इतकं. या वेळी त्याचा वेग शर्यतीच्या उत्तरार्धातील त्याच्या वेगापेक्षा तीन-चार टक्क्यांनी कमी झाला असला तरी, त्याच्या पावलांतलं अंतर मात्र त्या काळातल्या सरासरी अंतरापेक्षा सुमारे आठ टक्क्यांनी वाढलं होतं.
युसेन बोल्टनं याअगोदर २००८ सालच्या बिजिंगच्या ऑलिंपिक स्पर्धेत १०० मीटर अंतराच्या शर्यतीत आपलाच पूर्वीचा ९.७२ सेकंदांचा जागतिक विक्रम मोडीत काढताना ९.६९ सेकंदांची वेळ दिली होती. ही शर्यत संपायला वीस मीटर बाकी असतानाच बोल्टनं मुसंडी मारली आणि तो सर्वांच्या पुढं गेला. त्याला आपल्या विजयाची इतकी खात्री होती की, सर्वांच्या पुढं जाताच त्यानं आपले हात पसरत, नाच करीतच उरलेली शर्यत पूर्ण केली. ही शर्यत संपवताना बोल्टनं गांभीर्य पाळलं नसलं तरीही त्यानं नोंदवलेली वेळी ही विश्वविक्रमी वेळ ठरली. शेवटच्या वीस मीटरमधलं (दोन सेकंदालं) त्याचं नाचणं-बागडणं पाहून क्रीडाप्रेमींना प्रश्न पडला, की बोल्ट हा जर शेवटचे वीस मीटर व्यवस्थिपणे धावला असता, तर त्यानं किती वेळात ही शर्यत पूर्ण केली असती?
या शर्यतीनंतर लगेचच एरिकसन आणि ओस्लो विद्यापीठातील त्याच्या इतर सहकाऱ्यांनी विविध घटक लक्षात घेऊन बोल्टच्या या विजयाचं गणित मांडलं. या संशोधकांच्या मते, बोल्ट जर सरळ पद्धतीनं धावला असता, तर त्याचे किमान ०.०८ सेकंद वाचले असते आणि तो ही शर्यत ९.६१ सेकंद किंवा त्याहून कमी वेळात पूर्ण करू शकला असता. या आपल्या विश्वविक्रमाद्वारे बोल्टनं तज्ज्ञांना चर्चेसाठी नवा विषय उपलब्ध करून दिला असला, तरी एका वर्षातच त्यानं आपल्या कर्तृत्वाचा आलेख अधिक उंचावला. बर्लिन येथील २००९ सालच्या जागतिक स्पर्धेतील शंभर मीटरच्या शर्यतीत, बोल्टनं अमेरिकेच्या टायसन गे याला ०.१३ सेकंदांनी – तब्बल दीड मीटरनं – मागं टाकलं आणि ही शर्यत अवघ्या ९.५८ सेकंदांच्या नव्या विश्वविक्रमी वेळात जिंकली. गोमेझ आणि त्याच्या सहकाऱ्यांनी अभ्यासलेली शर्यत ती हीच!
बोल्टनं आतापर्यंत शंभर मीटर शर्यतीतले विश्वविक्रम तीनदा मोडले आहेत. प्रथम त्याचाच देशबंधू असणाऱ्या असाफा पॉवेलचा आणि त्यानंतर दोनदा आपला स्वतःचाच. पण बोल्ट यापुढं स्वतःच्याच विश्वविक्रमात आणखी किती सुधारणा करू शकेल? या बाबतीत केंब्रिज विद्यापीठातील जॉन बॅरो यानं व्यक्त केलेल्या मतानुसार बोल्टच्या विश्वविक्रमांत आधिक सुधारणा शक्य आहे. त्यांनी या संदर्भात मांडलेल्या तीन मुद्द्यांपैकी पहिला मुद्दा हा बोल्टच्या स्वतःच्याच तंत्रातल्या सुधारणेची अपेक्षा करतो. शर्यत सुरू होताना पिस्तुलाचा आवाज ऐकल्यानंतर, धावायला सुरुवात करायला बोल्टला इतर धावपटूंपेक्षा काहीसा अधिक वेळ लागतो. बोल्टला लागणारा हा वेळ ०.१५ सेकंदाइतका आहे. बोल्टनं आपल्या तंत्रात थोडीशी सुधारणा केली, तर हा कालावधी ०.०५ सेकंदानं कमी होऊन तो ०.१० सेकंदावर येऊ शकतो. तंत्रातील सुधारणेचा हा मुद्दा जरी पूर्णपणे बोल्टवर अवलंबून असला, तरी जॉन बॅरो यानं मांडलेले इतर दोन मुद्दे हे मात्र बोल्टच्या हातातले नाहीत. ते शर्यतीच्या ठिकाणावर आणि तिथल्या परिस्थितीवर आधारलेले आहेत. या गोष्टींचा फायदा सर्वच स्पर्धकांना मिळत असल्यामुळं एकूण निकालावर या मुद्द्यांचा परिणाम अपेक्षित नाही. मात्र विश्वविक्रमावर त्यांचा परिणाम होऊ शकतो.
शर्यतीचं ठिकाण जर उंचावर असलं, तर तिथली हवा विरळ असते. दूर पल्ल्याच्या शर्यतीतील धावपटूंना जरी ही विरळ हवा दमछाक करणारी ठरत असली, तरी कमी अंतराच्या शर्यतीतील धावपटूंना हवेचा दाब कमी असण्याचा फायदाच होतो. सुमारे सव्वादोन हजार मीटर उंचीवरील मेक्सिको शहरात झालेल्या १९६८ सालच्या ऑलिंपिक स्पर्धांत ही गोष्ट प्रकर्षानं जाणवली होती. याच कारणास्तव, फक्त एक हजार मीटरपर्यंतच्या उंचीवरील स्पर्धांतील वेळा विश्वविक्रमासाठी ग्राह्य धरल्या जातात. बर्लिन शहराची सरासरी उंची समुद्रसपाटीपासून फक्त ३४ मीटर इतकीच आहे; पण जर एखादी स्पर्धा अधिक उंचीवरील (परंतु एक हजार मीटरपेक्षा अधिक उंच नसलेल्या) ठिकाणी झाली, तर तिथल्या विरळ हवेचा फायदा बोल्टला मिळू शकतो. जॉन बॅरो याच्या गणितानुसार बोल्टच्या कामगिरीत स्पर्धेच्या ठिकाणाच्या उंचीनुसार ०.०३ सेकंदापर्यंत सुधारणा होऊ शकते.
जॉन बॅरो याच्या मते बोल्टला वाऱ्याचीही मदत होऊ शकते. धावपटू हा ज्या दिशेने धावत आहे त्याच दिशेने वारा वाहत असला, तर हा वारा त्याला अनुकूल ठरू शकतो. आंतरराष्ट्रीय मानदंडानुसार विश्वविक्रमाला मान्यता मिळण्यासाठी वाऱ्याचा वेग हा सेकंदाला जास्तीतजास्त २.० मीटर इतका असायला हवा. बर्लिनच्या जागतिक स्पर्धेच्या वेळी वाऱ्याचा वेग हा स्पर्धकांच्या धावण्याच्या दिशेनं सेकंदाला ०.९ मीटर इतका होता. बोल्टला या वाऱ्यामुळं मिळालेला फायदा हा सुमारे ०.१ सेकंदाचा होता. (हा फायदा मिळाला नसता तरी, बोल्टनं आपली शर्यत ९.६८ सेकंदांत पूर्ण केली असती व तोही विश्वविक्रमच ठरला असता.) स्पर्धेच्या वेळी वाऱ्याचा वेग हा जर स्पर्धकांच्या धावण्याच्या दिशेनं सेकंदाला २.० मीटर असला, तर बोल्टला शर्यत पूर्ण करायला ०.०५ सेकंद कमी लागतील.
जॉन बॅरो यानं लक्षात घेतलेल्या या तिन्ही मुद्द्यांचा एकत्रित विचार केला तर, बोल्टच्या कामगिरीत ०.१३ सेकंदाची सुधारणा होऊ शकते आणि तो ही शर्यत ९.४५ सेकंदांत पूर्ण करू शकतो. हे गणित जेव्हा प्रत्यक्षात येईल तेव्हा येईल; परंतु बोल्टला भविष्यात स्वतःचाच विक्रम मोडता येईल याची खात्री वाटते. परंतु आज तरी बोल्ट विचार करतो आहे तो दुसऱ्याचा गोष्टीचा. बर्लिनमधल्याच स्पर्धेत त्यानं दोनशे मीटरचं अंतर १९.१९ सेकंदांच्या विश्वविक्रमी वेळात पार केलं. बोल्टला हा आपला दोनशे मीटर शर्यतीतला विक्रम मोडायचा आहे, आणि तोही १९ सेकंदांपेक्षा कमी वेळात! हे सर्व करण्यासाठी त्यानं आपल्यावरच २०१६ सालच्या ब्राझिलमधील ऑलिंपिक स्पर्धांची कालमर्यादा घालून घेतली आहे. आणि बोल्टची आजची कामगिरी पाहता ते शक्यही आहे! नुकत्याच झालेल्या मॉस्को इथल्या जागतिक स्पर्धेत त्यानं शंभर मीटर आणि दोनशे मीटर या दोन्ही अंतरांच्या शर्यतींत सुवर्ण पदकं मिळवली. याच स्पर्धेत ४×१०० मीटर रीले शर्यतीत सुवर्णपदक मिळवणाऱ्या जमैकन संघाचाही तो सदस्य होता. हे त्याचं सोनेरी यश पाहता, आज वयानं सव्वीस वर्षांचा असणाऱ्या बोल्टला अजून तीन-चार वर्षं तरी विविध जागतिक स्पर्धांत जोमानं भाग घेण्यात कसलीच अडचण येऊ नये.
गेली अनेक वर्षं अशी अजोड कामगिरी करणाऱ्या युसेन बोल्टवर काही जणांकडून संशयाची सुईही रोखली गेली आहे. ही सुई आहेत ती अर्थातच क्रीडाविश्वाला काळिमा ठरलेल्या उत्तेजक द्रव्यांच्या सेवनाची. उत्तेजक द्रव्यं घेत असल्याशिवाय अशी कामगिरी शक्य नसल्याची मतं काही जणांकडून व्यक्त केली गेली आहेत. बोल्टवर गेला गेलेला हा अप्रत्यक्ष आरोपच आहे. मात्र बोल्ट हा काही अचानक प्रकाशात आलेला वा ज्याच्या कामगिरीत अचानकपणे अनपेक्षित सुधारणा झाली आहे, असा धावपटू नाही. तो शालेय वयापासूनच चमकदार कामगिरी करीत आहे. त्यामुळं आपण ‘स्वच्छ’ असल्याचं स्पष्ट करताना बोल्ट याच गोष्टीकडे टीकाकारांचं लक्ष वेधतो. बोल्ट म्हणतो – “पंधरा वर्षांचा असतानाच मी, एकोणीस वर्षांच्या खालील खेळाडूंच्या जागतिक ज्यूनिअर स्पर्धेत विजेता ठरलो होतो. त्यानंतर सतरा वर्षांचा असताना मी, एकोणीस वर्षांखालील खेळाडूंच्या गटातल्या दोनशे मीटर अंतराच्या स्पर्धेत जागतिक विक्रम नोंदवला. शर्यतीच्या ज्या-ज्या प्रकारात उतरलो, त्या-त्या शर्यतीतले जागतिक विक्रम मी मोडले आहेत…”.
बोल्टचं हे म्हणणं खरंच आहे. कोणत्याही उत्तेजक द्रव्याच्या चाचणीत दोषी न ठरता युसेन बोल्ट हा गेलं दशकभर ॲथलेटिक्सचं क्रीडांगण गाजवतो आहे. गमतीत सांगायचं तर बोल्ट ज्या स्पर्धेत उतरत नाही, ती स्पर्धा जागतिक स्पर्धा ठरत नाही; आणि बोल्ट ज्या स्पर्धेत उतरतो, ती प्रत्येक स्पर्धा जागतिक स्पर्धा ठरते. बोल्टनं भाग घेतलेल्या अशा एखाद्या स्पर्धेचं वर्णन करणं अगदीच सोपं आहे…
खच्चून भरलेलं स्टेडियम… स्टेडियममध्ये पूर्ण शांतता… शर्यत सुरू व्हायला अवघे काही क्षण बाकी… मैदानातील धावपट्टीवर आठ धावपटू शर्यत सुरू करण्याच्या पवित्र्यात… काही क्षणांतच शर्यत सुरू करण्याची सूचना देणाऱ्या पिस्तुलाचा आवाज येतो आणि शर्यत सुरू होते… पिस्तुलाचा आवाज हवेत विरतो न विरतो तोच धावण्याच्या मार्गावर एक वीज लखलखू लागते… या विजेचा लखलखाट काही सेकंदांचा असतो… ही वीज असते बोल्ट या नावाची… या विजेचा लखलखाट शमताच प्रेक्षकांनी अवघं स्टेडियम डोक्यावर घेतलेलं असतं… संपूर्ण स्टेडियमवर एकाच नावाचा पुकार चालू असतो… युसेन बोल्टच्या नावाचा… कारण बोल्ट ही शर्यतसुद्धा अगदी सहजपणे जिंकलेला असतो…!
(मूळ प्रसिद्धीः मराठी विज्ञान परिषद पत्रिका – ऑक्टोबर २०१३)
प्रतिशब्दः अंतिम वेग – terminal velocity; जैवगतिशास्त्र – biomechanics
लेखाची पुनर्प्रसिद्धी – जानेवारी २०२२
संकलन – साहेबराव माने.
पुणे. 9028261973.