लोकदर्शन 👉 गडचांदूर :-
कोरपना तालुक्यात गडचांदूर येथे असलेल्या माणिकगड सिमेंट कंपनीच्या वायू प्रदूषणामुळे गडचांदूर शहरासह पंचकोषीतील 4,5 गावांमध्ये शेतातील उभे पिक नष्ट होत असून पिकांच्या उत्पादनावर याचा मोठ्याप्रमाणात परिणाम जाणवत आहे.तसेच मुख्यतः नागरिकांना विविध आजाराने ग्रासले असून दुषित पाण्यामुळे पशुधन ही नष्ट होत आहे.अशाप्रकारच्या घटना याठिकाणी घडत असल्याने याकडे लक्ष देऊन समस्या मार्गी लावण्याची विनंती अनेकदा येथील नागरिकांनी जिल्हा प्रदुषण विभागाकडे निवेदनाद्वारे केली.मात्र याविषयी आजतागायत कोणत्याही प्रकारची समाधानकारक उपाययोजना करण्यात आल्याचे दिसत नाही.याठिकाणी नागरिकांच्या जीवाशी खेळ सुरू असताना संबंधित विभागाची भूमिका संशयास्पद बनली आहे.जल,वायू,ध्वनी प्रदूषणाच्या या जीवघेण्या समस्यामुळे नागरिक अक्षरशः वैतागले असून प्रदुषण नियंत्रण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करून याठिकाणी होत असलेल्या प्रदुषण नियंत्रण करण्याबाबतचा योग्य ती कार्यवाही करावी अशी विनंती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सैय्यद आबीद अली यांनी राज्याचे पर्यावरण मंत्री ना.आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सदर कंपनीने पर्यावरणाच्या दृष्टीने प्रदुषण नियंत्रण मंडळाच्या नियमांचे उल्लंघन करत याविषयी कोणतीही प्रभावी उपाययोजना केलेली नाही.ध्वनी व वायू प्रदूषणामुळे कंपनी लगतच्या शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या शिक्षण व आरोग्यवर विपरीत परिणाम होत आहे.विषारी जल प्रदुषण व वाहणाऱ्या पाण्यामुळे भूतलावरील नाल्या,ओढ्याने वाहून जाणारे दूषित पाणी पिल्यामुळे पशुधन दगावली आहे.याबाबत कंपनीकडून जलसंचयन करून त्याचा पुनर्वापर कंपनीने केला नसल्याने नाल्याने वाहुन जाणारे पाणी पशुधनासाठी हानीकारक ठरत आहे.सामाजिक दायित्व म्हणून कंपनीने पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी वृक्ष लागवड सारखे जनहिताचे उपक्रम राबविले नाही.उलट धुळ प्रदूषणामुळे परिसरातील अस्तित्वात असलेली झाडे नष्ट होऊन वाळवंटा सारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.मौजा कुसुंबी खदानी परिसरातील वनविभागाच्या मालकीच्या जागेवर वेस्ट मटेरिअल टाकून वनाची ऱ्हास अविरत सुरू आहे.तसेच कंपनीला देण्यात आलेल्या जमिनीपेक्षा अधिक जमिनीवर कंपनीचा ताबा असून वन अधिनियमांची सर्रासपणे पायमल्ली होत आहे.मोठ्याप्राणात विस्फोटक द्रव्यचा वापर होत असल्याने खदानीतील पाणी अमलनाला जलाशयात जात असल्याने येथील पाणी साठा दुषित होत असून याचा वापर जनावरे,पशुपक्षी व पिण्याच्या पाण्यासाठी होत असल्याने भविष्यात आरोग्याला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.तसेच सुरक्षेच्या दृष्टीने खदानीत आवश्यक उपाययोजना करण्यात आलेली नाही.यामुळे यापुर्वी खदानीत पडून बिबट्या,हरीण,साभर इतर वन्यप्राणी मृत्युमुखी पडले आहे.खदानी परिसरात मोठ्याप्रमाणात वन्यप्राण्यांचा वावर असून कंपनीकडून जमिनीवर अनाधिकृत झालेले अतिक्रमण,मान्यतेपेक्षा जमिनीवर झालेल विस्तार व उपाययोजनांचा अभाव यामुळे वन्यप्राणी व पाळीव प्राण्यांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. खदान परिसरातील प्रदूषणामुळे वनवृक्षांची ऱ्हास व आदिवासी शेतकऱ्यांचे शेतातील पीक उद्ध्वस्त होत आहे.अशाप्रकारची समस्या अली यांनी निवेदनात नमूद करत यावर योग्य ती कार्यवाही करून दिलासा देण्याची मागणी राकाँचे जिल्हा उपाध्यक्ष आबीद अली यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.