लोकदर्शन 👉 राहुल खरात
*⭕आद्यक्रांतीवीर राजे उमाजी ब्रिगेडची भावपूर्ण श्रद्धांजली*
-मारुती शिरतोडे
जे लोक राजकीय व सामाजिक स्पंदने वेळच्यावेळी जाणून भूमिका घेतात आणि आपल्या निर्णयाप्रत येतात तेच राजकारणात यशस्वी होतात हा आजवरचा अनेकांचा अनुभव आहे. खरंतर राजकारण हा शब्द गेल्या काही वर्षात खुपच बदनाम झालेला दिसतोय. राजकारणातील संधीसाधू सत्तालोलुप तत्त्वशून्य लोकांनी याला मदत केलेली दिसते. परंतु सर्वसामान्यांनी बहुजनांनी सत्तेकडची वाटचाल चालूच नये यासाठीचा हा डाव डोळ्यासमोर ठेवून कशाला राजकारणात पडतोस? अस म्हणूनबहुजनां च्या पोरांना मागे टाकणारी एक साखळी गेली कित्येक वर्षापासून समाजात कार्यरत असल्याचे दिसून येतेय.अशापैकी कुणालाही भिक न घालता राजकारण म्हणजे समाज कसा बदलणार हे ठरवणारे होकायंत्र आहे असं जाणनारा ,राजकारण हाच समाज परिवर्तनाचा मूळ गाभा आहे हे डोळ्यासमोर ठेऊन त्यानुसार गेल्या पन्नास वर्षात राजकारण आणि समाजकारणात सक्रिय राहून केवळ पलूस मधीलच नव्हे तर सांगली जिल्ह्याच्या राजकारणात आपल्या कर्तृत्वाचा उत्तम ठसा उमटवणारा पलुस शहरातील आम जनतेचा पितृतुल्य नेता म्हणून ज्यांची खाती पसरली ते म्हणजे आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक खाशाबा अण्णा दळवी यांची…..
परवा रात्री अण्णांचे दुःखद निधन झाले. अण्णांच्या निधनाने जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक चळवळीवर फार मोठी दुःखाची छाया पसरली.या डोंगराएवढ्या मोठ्या दु:खात आद्यक्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र ही संघटना आण्णांच्या परिवाराच्या दु:खात सहभागी आहे. गेल्या चार दशकांपूर्वी डाव्या चळवळीच्या मुशीत क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी, क्रांती अग्रणी जी डी बापू लाड यांच्या जवळ राहून त्यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आपल्या कार्याची दमदारपणे सुरुवात करणाऱ्या बहुजन समाजातल्या या रामोशी तरुणाने आपल्या कार्यकर्तृत्वाने समाजपरिवर्तनाच्या राजकारणाला एक प्रकारची उत्तम प्रतिष्ठा प्राप्त करून दिली आणि पुढे एक यशस्वी राजकारणी म्हणून जिल्ह्याच्या राजकारणात नावलौकिक मिळवला. हे सगळे त्यांच्या निधनानंतर पलूस शहरातून निघालेली हजारोंची अंत्य यात्रा आणि पूर्ण दिवसभर एकही ऑफिस दुकान टपरी न उघडता आपल्या आवडत्या नेत्याला श्रद्धांजली ली वाहण्यासाठी शंभर टक्के पलूस शहराने उस्फूर्तपणे बंद पाळला यावरून दिसून आले.
स्वर्गीय खाशाबा आण्णा दळवी यांचा जन्म रामोशी समाजातील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबात आई वैजयंता आणि वडील यशवंत यांच्या पोटी 15 जुलै 1951 रोजी झाला. शालेय जीवनापासूनच हुशार आणि हरहुन्नरी असणाऱ्या या पोराने बी.ए. पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं. आणि तत्कालीन राजकारण समाजकारण जाणून घेत तरुणांचे संघटन करण्यास सुरुवात केली. हळूहळू क्रांतीवीर नागनाथ आण्णा नायकवडी, क्रांतीअग्रणी जी डी बापू लाड यांच्या संपर्कात जाऊन बहुजनांच्या परिवर्तनाच्या चळवळीत काम सुरू केलं. बघता बघता आपल्या स्वभावातून,कामातून समाजा मध्ये “अण्णा’ या नावाने लोकप्रिय होण्यास सुरुवात झाली. समाज परिवर्तनाचा ध्यास घेतलेल्या या तरूणाने पुढील चार दशके संपूर्णपणे पलूस शहरावर राजकीय व सामाजिक पकड निर्माण केली.स्व.गंडादाजी गोंदील,स्व.वसंतराव पुदाले दादा व स्व. खाशाबा आण्णा दळवी यांच्या कर्त्रुत्वाचा ठसा पलूसच्या इतिहासात सुवर्ण अक्षरात लिहण्यासारखा आहे ही बाब जनता कधीही विसरु शकणार नाही.परवा आपल्या वयाच्या 71 व्या वर्षी अत्यंत धाडसी आणि राजकारणात धुरंधर पणा टिकवून ठेवणाऱ्या खाशाबा आण्णा दळवी या लोकनेत्यांने अचानक जगाचा निरोप घेतला अन मनाला धक्काच बसला.गेल्या दहा दिवसांपूर्वीच सकाळी सकाळी 11 वाजता भारती सोसायटीमध्ये आण्णांची अन माझी झालेली भेट हीच शेवटची भेट ठरली. 3 फेब्रुवारी आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांच्या स्मृती दिना दिवशी प्रत्येक वर्षाला पलूसच्या मध्यवर्ती चौकातील राजे उमाजी नाईक यांच्या भव्य प्रतिमेला अण्णांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला जातो परंतु यावेळी अण्णा दवाखान्यात आहेत हे समजले अन त्याच दिवशी मन अस्वस्थ झाले. रविवारी संध्याकाळी आम्ही आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेडचे सर्व पदाधिकारी मिरज येथील सिनर्जी हॉस्पिटलमध्ये अण्णांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी गेलो मात्र फार उशीर झाला होता. अण्णांना पुढील उपचारासाठी पुण्याला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले होते. रात्री आम्ही निराश होऊन परत आलो आणि मध्यरात्रीच अण्णाची प्राणज्योत मालवली असा फोन आला. पलूसच्या राजकारणातील एक धुरंधर वादळ संपलं. मनाला धक्का बसला.डोळ्याच्या कडा पानावल्या. डाव्या पुरोगामी चळवळीतून आपल्या कार्यास सुरुवात करणाऱ्या अण्णांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष,राष्ट्रीय काँग्रेस पक्ष या पक्षांच्या माध्यमातून जनतेची शेकडो कामं केलेली आहेत. माजी गृहमंत्री स्वर्गीय आर आर आबा पाटील, माजी मंत्री डॉक्टर पतंगराव कदम साहेब यांच्या अत्यंत जवळचा सहकारी म्हणून अण्णांची खाती होती. आण्णा 2002 ते 2007 या कालावधीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर सांगली जिल्हा परिषदेत निवडून गेले आणि समाज कल्याण सभापती पद सांभाळले.या कालावधीत सांगली जिल्ह्यातील मागासवर्गीय जनतेला मोठ्या प्रमाणात वसंत घरकुले मंजूर करणारा सभापती म्हणून अण्णांचे नाव झळकले.कलाकार मानधन कमिटीचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्यातील खेड्यापाड्यातील शेकडो कलाकारांना कलाकार पेन्शन सुरू केली. राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते म्हणून आपला स्वतंत्र दबदबा जिल्ह्याच्या राजकारणात निर्माण केला. चारित्र्यसंपन्न आणि नैतिक अधिष्ठान असलेल्या नेत्यांच्या यादीत अण्णांचा नेहमी वरचा क्रमांक राहिला.असे पितृतुल्य व्यक्तिमत्व आपल्यातून निघून गेले.पलूस शहराच्या विकासात अत्यंत मोलाचा वाटा असणारे खाशाबा आण्णा दळवी यांनी विविध पदाच्या माध्यमातून आपल्या कर्तुत्वाचा ठसा सांगली जिल्ह्यातून उमटवला आहे.पलूसच्या तंटामुक्त कमिटीचे अध्यक्ष,तासगाव साखर कारखान्याचे संचालक, जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण खात्याचे सभापती, पलूसच्या भारती नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक,भारती विकास सोसायटीचे संस्थापक, कलाकार मानधन कमिटीचे अध्यक्ष,भू विकास बैंकेचे संचालक,अशा विविध पदांवर अण्णांनी सर्वोत्कृष्ट कामगिरी केलेली आहे. अण्णांच्या जाण्याने पलूसच्या,सांगली जिल्ह्याच्या राजकारणात समाजकारणात फार मोठी पोकळी निर्माण झालेली आहे. अण्णांनी सांगितलेल्या सर्वसामान्यांच्या बाजूने होणाऱ्या विकासाच्या पाऊलवाटेवरून आपण चालत राहणं.सर्वसामान्य थरातील बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी झटत राहणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल. अण्णांच्या स्मृतीस आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र कडून भावपूर्ण श्रद्धांजली💐💐💐💐💐🙏
*मारुती बळवंत शिरतोडे*
राज्य निमंत्रक, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक ब्रिगेड महाराष्ट्र