लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*⭕ऑल इंडिया बंजारा सेवा संघ चा ६९ वा स्थापना दिवस संपन्न*
⭕*खासदार बाळू धानोरकर यांच्या माध्यमातून साकारणार बंजारा समाजाचे हक्काचे सभागृह*
चंद्रपूर : लोकगीते व लोकनित्यासाठी प्रसिद्ध असलेला बंजारा समाज पुरातन काळापासून घरदार सोडून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी वास्तव्य करीत आहे. मात्र आता या समाजाने शिक्षणासह सर्वागीण विकास साधत मोठमोठी पदे अगदी मंत्रिपदापर्यत टप्पा गाठला आहे. मात्र अजूनही हा समाज काही प्रमाणात विकासापासून वंचित असून या समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या ६९ व्या स्थापना दिवस संपन्न झाला त्यावेळी बोलत होते. याप्रसंगी खासदार बाळू धानोरकर यांनी खासदार निधीतून समाज भवन बांधून देण्याची घोषणा केली. यासह अन्य समस्या लोकसभेत मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरसिंग तिलावंत, ए. आय. बी. एस. एन राष्ट्रीय महासचिव तुकाराम पवार माजी खासदार मधुकर कुकडे, बाबुसिंग नाईक, डॉ. ती. सी. राठोड, अशोक चव्हाण, धनराज राठोड, डॉ. पंकज पवार, शंकर झाडे, विश्वनाथ राठोड यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, बंजारा सेवा महासंघाच्या माध्यमातून या समाजातील सर्व स्तरातून प्रगती होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. महाराष्ट्रातील बंजारा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी काँग्रेस पक्षानेच प्रथम पुढाकार घेतला. बंजारा समाजाच्या समस्या सोडविण्यासाठी काँग्रेस पक्ष कटिबद्ध आहे. राज्यात बंजारा समाज मोठ्या संख्येने असून त्यांच्या शैक्षणिक, आर्थिक, विकासाच्या योजना राबविण्यासाठी नेहमी प्राधान्य देणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपले मत व्यक्त केले.