By 👉 Rahul Kharat Sir
*__________________________*
तपस्वी पत्रकार, जवळ जवळ पाऊण शतकाचा संघर्ष आणि त्यातून तावून सुलाखूण निघालेले अजातशत्रु व्यक्तीमत्व म्हणजे आमच्या सारख्यांचे आण्णा अर्थात बा . द . तथा बापुसाहेब खराडे हे होत . आण्णांच्या जीवनावर प्रकाशझोत टाकणाऱ्या “पत्रकारीतेतील झंझावात ” या पुस्तकाच्या वाचनातून त्यावर सुंदर लिखाण करणाऱ्या , बाल आणि निसर्ग कवी, आमचे मार्गदर्शक, माणदेशी अवलिया सुभाष कवडे सरांच्या लेखातून आण्णा आमुच्यापुढे साक्षात अवतरले .
पांढरा शुभ्र, खादीचा लांबसा सदरा, आणि खादीचीच पॅन्ट आणि गळ्यात शबनम अडकवून सर्वत्र वावरणारे आण्णा मला ८० च्या दशकापासूनच परिचित व प्रेरक आहेत . याच दशकात साधारणतः १९८४ साली मी पत्रकारीतेत आल्या पासून आण्णांना पहात, त्यांच्याशी बोलत, अनेक उपक्रमात वावरत आलो आहे . दिवंगत पत्रकार जप्पीखान यांच्या समवेत आण्णांचे मार्गदर्शक नेतृत्वासारखे – वागणे – बोलणे मला व जिल्ह्यातील सर्वच पत्रकारांना भावत आले आहे . पत्रकारीता कशी करावी, नम्रता म्हणजे काय ? सामान्य स्तरावरून आपण ही समाजासाठी काही तरी करू शकतो, समाजाच्या प्रश्नांसाठी लढू शकतो . हे सप्रमाण सिद्ध करणारे आण्णा. खरोखरच आदर्श अवलिया व्यक्तीमत्वच . सांगलीतून सायंकाळी आटपाडीकडे जाताना तेथील बस स्टॅन्डवर असताना,
“अमक्या तमक्या एकाचा खुन, तमक्या गावात असे अगतिक घडले ! वाचा दैनिक ललकार ! , ५० पैशात ठिगभर बातम्या !
या ललकार विक्रेत्याच्या जोरदार आवाजाने जणू आण्णांचीच मुर्ती समोर आठवायची . आणि अभिमान वाटायचा आण्णांच्या वाटचालीचा . न थकता, न लाजता ,न माजता, आणि सामान्यांशी इमान, श्रद्धा ठेवून निरपेक्षपणे वावरणारे, श्रमणारे आण्णा, खरोखर दिशादर्शकच असायचे .
एखादे साप्ताहिक अथवा पाक्षिक काढणारे अनेक आरंभशुर एक दोन वर्षातच नेस्तनाबूत झाल्याचे मी अनेक ठिकाणी पाहीले आहे . तथापि कसलाही राजाश्रय नसताना आणि फारसे आर्थिक पाठबळ नसताना *ललकार* नावाचा हा हत्ती जवळ जवळ चार दशके सांभाळणे आणि तितक्याच ताठ मानेने कुणापुढेही झुकु न देता या हत्तीला प्रचंड स्पर्धा आणि धावपळीच्या जगात धिरोदात्तपणे सर्व संकटांपासून वाचवून पुढे चालवत राहणे आणि कसलीही तक्रार येवू न देता किंवा कसलीही तक्रार, ओरड न करता हे काम अव्याहतपणे चालु ठेवणे हे खरोखरच मोठी तपस्या आहे आणि हे आण्णां सारख्या तपस्व्यां आणि त्यांच्या सर्व सहकार्यामुळेच साध्य झाले आहे . आण्णां सारख्या तपस्व्यांना आणि दैनिक ललकार सारख्या दैनिकांनाच प्रथम प्राधान्याने राजाश्रय मिळाला पाहीजे . तरच निकोप आणि स्वाभीमानी पत्रकारीतेला मोठे बळ मिळेल . सुभाष कवडे सरांसारख्या अवलियाने अतिशय खडतरपणे, गरीबीतूनच आजचे यश संपादन केले आहे . आणि म्हणूनच बापूसाहेब तथा आण्णांसारख्या नेक माणसांबद्दल ते इतक्या – आत्मीयतेने लिहू शकले . आमच्या आण्णांना ललकारच्या शतकी महोत्सव पाहण्याचे भाग्य विधात्याने द्यावे . ललकार भविष्यात छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहु महाराज, डॉ . बाबासाहेब आंबेडकर यांच्या सारख्या महामानवांच्या विचारधारेचा समर्थक म्हणून संपूर्ण राज्याने ललकार ला डोक्यावर घ्यावे हीच तीर्थस्वरूप आण्णा, दै ललकार आणि परिवार आणि आमच्या कवडे सरांनाही मनोभावे शुभेच्छा .====================================
*सादिक पापामियाँ खाटीक, ज्येष्ट पत्रकार, आटपाडी जि . सांगली .*
* प्रदेश महासचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अल्पसंख्याक विभाग महाराष्ट्र .
* प्रदेश कार्यकारणी सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महाराष्ट्र राज्य .