By : Mohan Bharti
गोंडवाना यंग टीचर्स आक्रमक! दिला आंदोलनाचा इशारा
राजुरा- गोंडवाना विद्यापीठातील संलग्न महाविद्यालयातील प्राध्यापकांचे गेल्या तीन ते चार वर्षापासून चे परीक्षा संबंधी कार्य केल्याचे मानधन रखडले असून गोंडवाना यंग टीचर्सअसोसिएशनने वारंवार निवेदने देऊन सुद्धा विद्यापीठाने आडमुठे धोरण स्वीकारले आहे. यामुळे प्राध्यापक वर्गात असंतोषाचे वातावरण पसरले असून या पार्श्वभूमीवर गोंडवाना यंग टीचर्स संघटनेने आज पुनश्च निवेदन देऊन सदर मानधन त्वरित न दिल्यास आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत हिवाळी आणि उन्हाळी विविध परीक्षांकरिता प्रश्नीक, परीक्षक, नियामक,निर्देशी, केंद्रसंचालक यांची नियुक्ती केली जाते. विद्यार्थी हित लक्षात घेऊन प्राध्यापकां वर्गाकडून सदर विविध जबाबदारी पूर्णपणे पार पाडली जाते त्यामुळेच विद्यापीठाच्या परीक्षा यशस्वी होण्यास मदत होते . या सदर कार्यासाठी विद्यापीठाच्या नियमानुसार प्राध्यापकांना परीक्षा संबंधी विविध कार्याचे मानधन दिले जाते. मात्र विद्यापीठाकडून 3 ते 4 वर्षापासून सदर कार्याचे मानधन आज पर्यंत प्राप्त झालेली नाही.त्यामुळे गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशन ने यासंबंधीचे निवेदन माननीय कुलगुरू व कुलसचिव यांना दिले आहे. सोबतच संशोधन कार्य सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने संशोधन केंद्रावरील मार्गदर्शक व विद्यार्थ्यांची संख्या वाढवणे तसेच पेट परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांची प्रथम नोंदणी करून नंतर कोर्स वर्ग आयोजित करणे हा जुना प्रचलित नियम कायम करणे यासंबंधीचे संशोधन कार्याशी निगडित महत्त्वाचे प्रश्न तातडीने सोडविण्याबाबत संघटनेच्यावतीने मागणी करण्यात आलीआहे. समाजकार्य महाविद्यालयाला 7वा वेतन आयोग लागुन 3 महिने झाले असून विद्यापीठा द्वारे 7 व्या वेतन आयोगाचे फीक्सेशन प्रक्रिया जलद गतीने करण्याबाबत मा.कूलसचिव डॉ. अनिल चिताडे सर यांच्या सोबत चर्चा करण्यात आली असता संबंधित विभागाला तात्काळ विचारणा करून पुढील आठवड्यात समाज कार्य महाविद्यालयातील प्राध्यापकाचे 7व्या वेतन आयोगा फिक्सेशन करण्याबाबत निर्देश दिले आहे. याप्रसंगी गोंडवाना यंग टीचर्स चे सचिव डॉ. विवेक गोर्लावार, उपाध्यक्ष डॉ. नंदाजी सातपुते,उपाध्यक्ष डॉ. राजू किरमिरे इत्यादी मान्यवरांच्या शिष्टमंडळाने सदर निवेदन देऊन उपरोक्त वरील सर्व प्रश्न व समस्या त्वरित निकाली काढण्याची मागणी केलेली आहे.