By : Mohan Bharti
▪️प्रक्रिया केलेले पाणी शासकीय व खासगी बांधकामासाठी वापर करण्याचे आवाहन
▪️नागपूरच्या धर्तीवर चंद्रपुरात रेड टँकर संकल्पना
चंद्रपूर । शहर महापालिकेच्या माध्यमातून नागरी भागात पाण्याचा नियोजनबद्ध वापर करणे तसेच जलप्रदूषण रोखण्यासाठी “माझी वसुंधरा अभियाना”अंतर्गत सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यात येत आहे. पाण्याचा पुनर्वापर करण्यासाठी नागपूरच्या धर्तीवर चंद्रपुरात रेड टँकर ही अभिनव योजना राबविण्यात येणार आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया केलेले पाणी शासकीय व खासगी बांधकामासाठी वापर करण्याचे आवाहन आयुक्त विपीन पालीवाल यांनी केले आहे.
मनपामार्फत पठाणपुरा, रहमतनगर आणि आझाद बगीचा येथे प्रक्रिया केंद्र चालविण्यात येत असून, हे पाणी मनपाच्या टँकरद्वारे ४०० रुपये प्रति टँकर, तर संबंधितांच्या टँकरला १५० रुपये प्रति टँकर देण्यात येणार आहे. शहरीकरणामुळे सांडपाण्याचा प्रश्न निर्माण होतो. घरात तसेच सार्वजनिक ठिकाणी निर्माण झालेले सांडपाणी थेट गटार, नाल्यात सोडले जाते.
त्यामुळे आरोग्याचा प्रश्नदेखील निर्माण होतो. याचा विचार करून चंद्रपूर शहर महानगरपालिकेने सांडपाणी प्रक्रियेसाठी मागील काही वर्षांत भूमिगत मलनिस्सारण योजना राबविली. या योजनेतंर्गत रहमतनगर परिसरात २५ एमएलडी क्षमतेचे तर पठाणपुरा परिसरात ४५ एमएलडी, तर आझाद बगीचा येथे ५ एमएलडी क्षमतेचे जलशुध्दीकरण केंद्र निर्माण करण्यात आले. या माध्यमातून दररोज ७० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया केली जाणार आहे. प्रक्रिया केलेल्या या पाण्याचा पुनर्वापर शक्य आहे. हे पाणी झाडांसाठी, बांधकाम, चौक सौंदर्यीकरण, शौचालय, कारखाने आदी ठिकाणी वापरता येऊ शकते. त्यामुळे शहरातील पाणी प्रश्न देखील काही अंशी सुटण्यास मदत होईल. घरगुती व खासगी इमारत बांधकाम आणि अन्य कामासाठी प्रक्रिया केलेल्या सांडपाण्याचा वापर करुन, भूगर्भातील पाण्याचे जतन करण्यासाठी हातभार लावण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन मनपा प्रशासनाने केले आहे.
▪️पाणी टँकर दर
मनपाच्या टँकरद्वारे पाणी : ४०० रुपये प्रति टँकर
संबंधितांच्या टँकरला पाणी : १५० रुपये प्रति टँकर
▪️संपर्क : ०७१७२- २७२८४० । ९०११०१८६५२