लोकदर्शन : मोहन भारती
दिनांक : 10-Jan-2022
मुंबई – उत्तरेकडील पश्चिमी चक्रावात, अरबी समुद्रातून होत असलेला बाष्प पुरवठा त्याचबरोबर बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे, यांच्या प्रभावामुळे पुढील चार दिवस मध्य आणि वायव्य भारतात पावसाची शक्यता आहे. यामुळे राज्यातही पावसासाठी पोषक हवामान निर्माण झाले असून पुढील दोन दिवस विदर्भ आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पाऊस तर काही भागात गारा पडण्याची शक्यता आहे. राज्याच्या विविध भागांमध्ये गेल्या दोन दिवसात पावसाने हजेरी लावली तर विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट झाली दरम्यान, सोमवारी मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह गारा पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे, उत्तरेकडील पश्चिम चक्रावात आणि अरबी समुद्रातून येणारी आर्द्रता यासह पुढील ४,५ दिवस अरबी व बंगालच्या उपसागरातून एकत्र येणारे वारे यामुळे पावसाची शक्यता आहे. 9 ते 13 जानेवारी या कालावधीत मध्य पूर्वेकडील राज्यांसह व मध्य भारतात हलका-मध्यम पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे, महाराष्ट्रातही १० आणि ११ तारखेला मराठवाडा, विदर्भात पावसाची शक्यता आहे.
⭕उत्तर भारताला थंडीचा आणि पावसाचा दणका : देशातील अनेक भागात सध्या वातावरणात मोठ्या प्रमाणावर बदल झाल्याचं दिसून येत आहे. उत्तर भारतात थंडीची लाट असून मध्य आणि पूर्व भारतात अनेक ठिकाणी पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. हवामान विभागाने भारताच्या पूर्वेकडील राज्यांमध्ये पावसाचा अंदाज वर्तवला असून यलो आणि ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. हवामान विभागाचे आर के जेनामनी यांनी एएनआयशी बोलताना सांगितलं की, उत्तरेकडील पश्चिम चक्रावाताच्या वाढत्या प्रभावामुळे मध्य भारत आणि पूर्वेकडील भागामध्ये मुसळधार पाऊस होईल. यामध्ये ओडिशा, झारखंड, बंगाल, बिहारचा समावेश आहे. ११ ते १३ जानेवारी या कालावधीत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पश्चिमी चक्रावातामुळे ११ जानेवारीपासून पूर्वेकडील भागात प्रभाव दिसण्याची शक्यता आहे.
⭕चार राज्यांमध्ये पावसाची शक्यता : जेनामनी यांनी सांगितले की, ओडिशात ११ ते १२ जानेवारी या कालावधीत यलो अलर्ट आहे तर ११ जानेवारीला छत्तीसगढ, झारखंड, ओडिशात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तेलंगना, आंध्रप्रदेशातसुद्धा वीजांच्या कडकडाटासह पाऊस होईल. याशिवाय उत्तर भारतात थंडीची लाट पसरेल असा इशारा दिला आहे तर राजस्थान, हरयाणात दाट धुक्याची शक्यता वर्तवली आहे, देशाच्या उत्तर भागातील पावसाबाबत हवामान विभागाने म्हटलं की, पश्चिम हिमालयाच्या भागासह आजुबाजुच्या प्रदेशात, राजस्थान, हरयाणा, पंबाजमध्ये १० तारखेपासून पावसाचे प्रमाण कमी होईल. शनिवारी पावसापासुन थोडा दिलासा मिळाला होता, मात्र पंजाबमध्ये पाऊस सुरुच होता.