By : Shivaji Selokar
चंद्रपूर शहरातील परिस्थितीचा घेतला आढावा
मुंबई : ओमिक्रॉन विषाणूमुळे कोविडची साथ पुन्हा डोके वर काढण्याच्या तयारीत आहे. या महासाथीची तिसरी लाट आल्यास लोकांना भीतीयुक्त वातावरणात विलग न करता योग्य त्या वातावरणात उपचार उपलब्ध करून द्यावेत, असे आवाहन महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समितीचे अध्यक्ष आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले. चंद्रपूर शहरातील कोविड परिस्थितीचा आ. मुनगंटीवार यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे आढावा घेतला.
चंद्रपूर महापालिकेने 400 खाटांचे कोविड केअर सेंटर उभारावे असे आवाहन त्यांनी केले. ओमिक्रॉनबद्दलची लोकांच्या मनात असलेली भीती दूर करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. ओमिक्रॉन वेगाने पसरणारा विषाणू असल्याने योग्य ती खबरदारी घेणे गरजेचे आहे. विलगीकरण केंद्र उत्तम सुविधांनी परिपूर्ण असावे. चंद्रपुरात ६७ हाजर कुटुंब आहेत, त्यापैकी ३२ हजार कुटुंब गरीब आहेत. त्यामुळे अशा परिवारांची काळजी घ्यावी, अशी सूचना त्यांनी केली.
लोकप्रतिनिधींनी आपली जबाबदारी ओळखत ओमिक्रॉन कोविड साथीवर मात करण्यासाठी सक्रिय व्हावे. प्रत्येकाने स्वत:ची काळजी घेत प्रत्येक कुटुंबापर्यंत मदत पोहोचवावी. गेल्या लाटेत रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलिंडर, ऑक्सिजन कॉन्स्ट्रेटर देण्यात आले होते. हे सर्व साहित्य सुसज्ज ठेवण्यात यावे. प्रसंगी रुग्णांवर उपचार करण्यासाठी इंडियन मेडिकल असोसिएशनची मदत घ्यावी. ओमिक्रॉनवर मात करण्यासाठी व्यापक प्रचार-प्रसार, जनजागृती करावी. जनतेच्या आशीर्वादाने आपण लोकप्रतिनिधी झालो आहोत, त्यामुळे ओमिक्रॉनच्या लाटेत जनतेसाठी आपला खिसा रिता करावा, असे आवाहनही त्यांनी केले.
ओमिक्रॉनची लागण झालीय का हे तपासण्यासाठी मुळात पुरेशी व्यवस्था सद्य:स्थितीत नाही. त्यामुळे कुणालाही लक्षणे आढळल्यास दुर्लक्ष करू नका, असे ते म्हणाले. कोविडसंदर्भात मदत लागणाऱ्यांना तत्काळ संपर्क साधता यावा म्हणून हेल्पलाईन क्रमांक ठळकपणे नमूद करावे. ओमिक्रॉन विरोधातील लढ्यात जिथे सरकार कमी, तिथे आम्ही अशी भूमिका ठेवा असे ते म्हणाले. कोविडमुळे चंद्रपूर जिल्ह्यातील एकही जीव जाऊ नये असाच प्रयत्न असावा, असे भावनिक आवाहन आ. मुनगंटीवार यांनी केले. औषधांचा, इंजेक्शनचा तुटवाडा भासणार नाही यासाठी प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले. बैठकीचे प्रास्ताविक चंद्रपूर भाजप अध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले.बैठकीला महापौर राखी कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावड़े , स्थायी समिति सभापती संदीप आवारी , मनपा आयुक्त बिपिन मुद्दा पालीवाल , मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ नितनवरे आदिंची उपस्थिति होती.
अशी करा मदत
– कोविडग्रस्तांच्या घरी धान्य, भाजीपाला आदी मदत देता येईल काय, यावर विचार करावा.
– संशयित रुग्णांना तातडीने औषधी व प्रसंगी इंजेक्शन मिळेल यासाठी आग्रही राहा.
– कोविडग्रस्त घाबरून जाणार नाही अशा दृष्टीने समुपदेशन करा.
– चंद्रपुरात शिक्षणाच्या निमित्ताने राहणाऱ्या तरुण-तरुणींच्या मदतीसाठी धाऊन जा.