लोकदर्शन 👉 मोहन भारती
चंद्रपूर :-
चंद्रपूर जिल्हा ही संतांची,क्रांतिकारक,क्रांतिवीर स्वातंत्र्य सैनिक,भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांची भूमी आहे.त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याकरिता प्राणांची आहुती दिली.स्वातंत्र्य समरात आपल्या घरावर तुळशीपत्र ठेवून आपले सर्वस्व अर्पण केले.त्या सर्व हुतात्म्यांना, त्यांच्या कार्याला नतमस्तक होणे आपली सामाजिक जबाबदारी आहे.समाजातील सर्व वर्गात सामाजिक समरसता राखणे आज कळीचा मुद्दा आहे.तेव्हा गावाची,वस्त्यांची,रस्त्यांची,वाड्यांची व स्थळांची नावे बदलवून त्या त्या समाजातील थोर संत,महात्मे,क्रांतिकारक,क्रांतिवीर, स्वातंत्र्य सैनिक,भूमिगत स्वतंत्र सैनिकांची नावे देण्यात यावे.असे निवेदन श्री.मनोहर गव्हाड , निवासी जिल्हाधिकारी चंद्रपूर यांना देण्यात आले.शिष्टमंडळात जिल्हा संयोजक सामाजिक समरसता मंच डॉ.नंदकिशोर मैंदळकर, ,सुदर्शन नैताम, मोहन जीवतोडे,ऍड.धीरज ठवसे,सचिन बरबटकर,उदय जाधव,गंगाधर गुरनुले इत्यादी उपस्थित होते.
सामाजिक समरसता म्हणजे समाजातील सर्व वर्गातील, स्तरातील जनसामान्यांमध्ये आपुलकीची प्रेमाची व एकजुटीची भावना जागृत राहणे होय. कोणत्याही देशाच्या विकासासाठी सामाजिक समरसता आधारभूत घटक आहे मुळ भारतीय समाजात हा भाव प्रामुख्याने जागृत होता,म्हणून तो काळ भारताचा सुवर्णकाळ होता भारतभूमीवर झालेल्या अनेक आक्रमणामुळे व आठशे वर्षाच्या गुलामगिरीमुळे भारतीय समाजात न्यूनगंडाची निर्मिती झाली. आक्रमकांनी भारतीय समाजाला आपल्या अधिपत्याखाली ठेवण्यासाठी आपल्या समाजव्यवस्थेच्या विविध घटकांमध्ये वैमनस्य व विषमता निर्माण करून फुट पाडली व आपला स्वार्थ साध्य केला.
तथापि भारतीय समाजाला जागृत ठेवून एकजूट करण्याचे कार्य अनेक संत महात्मे यांनी केलेले आहे. ते सर्व संत-महात्मे भारतीय वेगवेगळ्या पंथातील जातीधर्मातील होतेच. प्राचीन भारतीय संत परंपरा ते अर्वाचीन समाजसुधारकांनी आपल्या कृतीने समाजातील भेदभाव अस्पृश्यता दूर करण्यासाठी आपले जीवन खर्ची घातले आहे. या थोर संत महात्म्यांचे आणि समाजसुधारकांचे कार्य आपल्याला प्रेरणादायी आहेच. तेव्हा गावाची,वस्त्यांची,रस्त्यांची,वाड्यांची व स्थळांची नावे बदलवून त्या त्या समाजातील थोर संत,महात्मे,क्रांतिकारक,क्रांतिवीर,स्वातंत्र्य सैनिक,भूमिगत स्वातंत्र्य सैनिकांची नावे देऊन थोरांचा संदेश कृतीत उतरवण्याची गरज आज भासत आहे.या संदर्भात शासन निर्णय ही निघालेला आहे.म्हणून सामाजिक समरसतेच्या पार्ध्वभूमीवर समाजात कुठेलेही तेढ,वैमनस्य ,विषमता निर्माण न होता जातीवाचक नावे बदलून समाजातील थोर संत महात्मे,क्रांतिवीर,समाज सुधारक,स्वतंत्र सैनिक स्वातंत्र्यवीर यांची नावे देऊन सामाजिक समरसता साधण्यात यावी ?