लोकदर्शन 👉शिवाजी सेलोकर
चंद्रपूर : सावित्रीबाई फुलेंनी केलेल्या सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक, संसारिक, वैचारिक, साहित्यिक व मानवतावादी अशा विविध कार्याचा प्रत्येक स्त्रीने अभ्यास आणि विचारमंथन करून आपल्या आणि इतरांच्या जीवनात आमूलाग्र बदल, परिवर्तन घडवून आणण्यासाठी मनोभावे कृतिशील प्रयत्न करणे गजरेचे असल्याचे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते पठाणपुरा येथील क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिकेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्य कार्यक्रमात बोलत होते.
यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती दिनेश चोखारे, अभ्यासिकेचे संस्थापक कुणाल चहारे, श्रीकांत चहारे, सचिन राजूरकर, सोहेल शेख, विजय चहारे, राजू वासेकर, राकेश चहारे, केतन दुरसेलवार, विनोद वाघमारे, प्रतीक मेश्राम, यश सिरसाठ, अमोल डेबीटवार, वैभव खनके, रोहित भदकार, अभिजित वाटगुरे यांची उपस्थिती होती.
पुढे बोलताना खासदार बाळू धानोरकर म्हणाले कि, फुले दाम्पत्याने महिलांना अनेक बंधनातून बाहेर काढले आहे. त्या महिलांनी सामाजिक सुधारणेपासून दूर जाता कामा नये, याची जाणीव ठेवून आजच्या महिलांनी प्रतिगामी विचारांविरुद्ध बंड उभारणे काळाची गरज आहे. जेणेकरून आजची पिढीही मानसिकदृष्ट्या सक्षम कशी बनेल यासाठीही प्रयत्न करणे काळाची गरज निर्माण झाली आहे. महात्मा जोतिराव फुले प्रमाणे सावित्रीबाई फुले ह्या एक शिक्षिका, विचारवंत, समाजसुधारक, तत्त्वचिंतक, समाजचिंतक होत्या. तोच सावित्रीबाई फुलेंचा आदर्श आजच्या स्त्रियांनी आपल्या जीवनात अंगी बाळगायला हवा. असे आवाहन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. यावेळी अन्य मान्यवरांनी देखील आपली मते व्यक्त केली.