लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*⭕चंद्रपूर जिल्हयासाठी १५० नवीन बसेस त्वरित उपलब्ध कराव्या*
*⭕दोन्ही विषयाबाबत बैठक घेवुन सकारात्मक निर्णय घेणार – परिवहन मंत्री अनिल परब*
चंद्रपूर जिल्हयाच्या मुल तालुक्याच्या मुख्यालयी मुल येथे राज्य परिवहन महामंडळाचे स्वतंत्र आगार मंजुर करण्यात यावे अशी मागणी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानसभेत केली. या विषयासंदर्भात लवकरच एक बैठक आयोजित करुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिले.
दि. २४ डिसेंबर रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी वरिल विषयाच्या अनुषंगाने विधानसभेत अर्धा तास चर्चा उपस्थित केली. यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार म्हणाले, मुल तालुका हा मानव विकास निर्देशांकात मोडतो. मुल ही माजी मुख्यमंत्री कर्मवीर मा.सा. कन्नमवार यांची कर्मभूमी आहे. जेव्हा स्व. यशवंतराव चव्हाण हिमालयाच्या मदतीला धावुन गेले तेव्हा कर्मवीर मा.सा. कन्नमवार सहयाद्रीच्या मदतीला धावून गेले. दि. ५ मार्च १९९९ रोजी ३० किलोमीटर परिक्षेत्रामध्ये नवीन बस आगार निर्माण करु नये, असा निर्णय घेण्यात आसलेला आहे. परंतु परिवहन विभागाच्या अधिका-यांनी असे नमुद केले आहे की, मुल येथील प्रवासी वाहतूक ४३.६ किलोमीटर अंतरावर असलेल्या व चंद्रपूर ४२.१ किलोमीटर अंतरावर असलेल्या गडचिरोली बस आगारमार्फत करण्यात येते. म्हणजे एक बस आगार ४२.१ किलोमीटर अंतरावर आहे तर दुसरे बस आगार ४३.६ किलोमीटर अंतरावर आहे. त्यामुळे मुल येथे राज्य परिहवन महामंडळाच्या स्वतंत्र आगाराचा शासन निर्णय लवकर निर्गमीत करावा असेही आ. मुनगंटीवार म्हणाले.
चंद्रपूर जिल्हयासाठी १५० बसेस उपलब्ध करण्याच्या बाबीकडे लक्ष वेधताना आ. मुनगंटीवार म्हणाले, मी अर्थमंत्री असताना राज्य परिवहन महामंडळाला ७०० बसेस उपलब्ध करुन दिल्या आहेत. त्यातील २०० बसेस चंद्रपूर जिल्हयासाठी उपलब्ध करुन देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र त्यापैकी ५० बसेस उपलब्ध करुन नस्तीवर लिहिलेल्या शे-याची अंमलबजावणी झाली नाही. चंद्रपूर जिल्हयासाठी १५० बसेस अध्याप उपलब्ध झालेल्या नाहीत. त्या त्वरित उपलब्ध करुन देण्यात याव्या अशी मागणी देखील त्यांनी यावेळी बोलताना केली.
या दोन्ही विषयासंदर्भात लवकरच एक बैठक घेवुन सकारात्मक निर्णय घेण्यात येईल चर्चेला उत्तर देताना परिवहन मंत्री अनिल परब यांनी सांगीतले.