लोकदर्शन : 👉 मोहन भारती
दिनांक : २८/१२/२०२१ मंगळवार
पुणे : राज्यात पावसाला पोषक हवामान होत असल्याने आजपासून (ता. २८) विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तसेच विदर्भात काही जिल्ह्यात गारपिटीचा (ऑरेंज अलर्ट) आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा (यलो अलर्ट) हवामान विभागाने दिला आहे.
पश्चिमी चक्रावातामुळे पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड या राज्यांमध्ये पावासाची शक्यता आहे. या राज्यांमध्ये तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज आहे. यातच राजस्थानपासून विदर्भापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय असल्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात मेघगर्जना, विजांसह पावसाचा अंदाज आहे. आज (ता. २८) विदर्भ आणि मराठवाड्यात तर उद्या (ता. २९) विदर्भात तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा इशारा देण्यात आला आहे.
राज्यात बहुतांशी भागात गारठा कमी झाला असला तरी सोमवारी (ता.२७) निफाड येथे नीचांकी ८.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मालेगाव आणि जळगाव येथे १२ अंशांपेक्षा कमी तापमानाची नोंद झाली. उर्वरीत राज्यात किमान तापमानात वाढ झाली असून, तापमानाचा पारा १३ अंशांच्या पुढे गेला आहे. किमान तापमानातील वाढ दोन-तीन दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.