लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*⭕अंतःकरणाच्या पर्यावरणाला शुध्द करणारे अध्यात्म सर्वश्रेष्ठ – आ. सुधीर मुनगंटीवार*
मानवाच्या जीवनात शांतीचे अवतरण होण्यासाठी अध्यात्म हे प्रभावी माध्यम आहे. मनावर संपूर्ण अधिकार मिळविणे तसेच मनात करूणा व संवेदना जागृत होणे हा अध्यात्माचा परमोच्च बिंदू आहे असे प्रतिपादन देव संस्कृती विश्वविद्यालयाचे प्रतिकुलपती डॉ. चिन्मय पंडया यांनी केले. साने गुरूजींनी खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे असे सांगीतले आहे. प्रेम देणे हाच अध्यात्माचा मुळ उद्देश आहे. अध्यात्माच्या आधारावर जगात आनंद पेरणा-या शांतीकुंजला ५० वर्षे पूर्ण झाली ही बाब वैशिष्टयपूर्ण आहे. अंतःकरणाच्या पर्यावरणाला शुध्द करणारे अध्यात्म सर्वश्रेष्ठ असल्याचे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक २५ डिसेंबर रोजी भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमीत्त भाजपा अध्यात्मीक समन्वय प्रकोष्ठ तथा अखिल भारतीय गायत्री परिवाराच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रबुध्द वर्ग सेनिमार आयोजित करण्यात आला. अध्यात्म कल क्या था, आज क्या है और कल क्या रहेगा याविषयावर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. यावेळी मंचावर प्रतिपादन देव संस्कृती विश्वविद्यालयाचे प्रतिकुलपती डॉ. चिन्मय पंडया माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार, भागवताचार्य मनिष महाराज, हरीद्वारचे विश्वप्रकाश त्रीपाठी, रामअवतार पाटीदार, गोपाल शर्मा, सौ. सपनाताई मुनगंटीवार, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. मंगेश गुलवाडे, भाजपा अध्यात्मीक आघाडीच्या विदर्भ सहसंयोजक मिना देशकर, जिल्हाध्यक्ष राजकुमार पाठक, महानगर जिल्हाध्यक्ष डॉ. शैलेंद्र शुक्ला आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. सुधीर मुनगंटीवार पुढे म्हणाले, छोटे मन से कोई बडा नहीं होता अश्या श्रेष्ठ काव्यपंक्ती रचणा-या श्रध्देय अटलजींचे स्मरण आम्ही करीत आहोत. आपल्या देशात श्री हनुमानाची मंदीरे जास्त आहेत व श्री रामाची मंदीरे कमी आहे. स्वामींपेक्षा सेवकांच्या सेवेला श्रेष्ठ मानणारी आपली भारतीय संस्कृती आहे. सेवेला श्रेष्ठ मानणा-या भारतीय संस्कृतीचे बलस्थान अध्यात्म आहे, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. कण कण में है भगवान असे आम्ही पुराणकाळापासून ऐकत आलो आहोत. काही दिवसांपूर्वी अमेरीकन तज्ञांनी रिसर्च नंतर सांगीतले की प्रत्येक गोष्टीत अणुरेणु आहे तसेच गॉड पार्टिकल आहे. मात्र हे सत्य भारतीय संस्कृतीने केव्हाच सांगीतले. कारण याच्या मुळाशी अध्यात्म आहे. कोरोनाने आम्हास ब-याच गोष्टी शिकविल्या. विशेष म्हणजे आम्ही स्वतःला ओळखू लागलो. मृत्युनंतर शरीर निश्चीतच रिकाम्या हाताने जाते. मात्र आत्मा रिकाम्या हाताने जात नाही. संस्कार व कर्म सोबत घेवून जाते, असेही आ. मुनगंटीवार यावेळी बोलताना म्हणाले. कार्यक्रमाचे प्रस्तावीक डॉ. मंगेश गुलवाडे यांनी केले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. शैलेंद्रकुमार शुक्ला यांनी केले तर आभार प्रदर्शन राजकुमार पाठक यांनी केले. कार्यक्रमाला गणमान्य नागरिकांची, भाजपा पदाधिकारी कार्यकर्त्यांची तसेच गायत्री परिवाराच्या सदस्यांची उपस्थिती होती.