लोकदर्शन 👉 मोहन भारती
मुंबई ÷ दि २५/१२/ २०२१राज्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्याच्या सुरुवातीला पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पुणे : राज्यात उत्तर महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील नऊ जिल्ह्यांमध्ये पुढील आठवड्याच्या सुरुवातीला पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. त्यामुळे दिवाळीपाठोपाठ इंग्रजी नववर्षाच्या स्वागतालाही पाऊस हजेरी लावण्याची शक्यता असून पुन्हा अवकाळी पाऊस कोसळण्याच्या शक्यतेने बळिराजाची धास्ती वाढली आहे.
दिवसभरात कोकणात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली, तर उर्वरित राज्यातील किमान तापमान सरासरीच्या जवळपास होते. राज्यातील थंडीचा जोरही सध्या ओसरला असून, अनेक जिल्ह्यांतील किमान तापमानात एक ते दीड अंशांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, हिवाळ्याच्या या दिवसांत आता पुन्हा पावसाचे मळभ दाटल्याचे दिसत आहे. त्यामुळे बळिराजाची चिंता पुन्हा एकदा वाढली आहे. वायव्य व मध्य भारतातील शीतलहरींच्या स्थितीत घट होत आहे. पुढील दोन दिवसांत उत्तर-पश्चिम व मध्य भारतासह बहुतेक भागात किमान तीन ते पाच अंश सेल्सिअसने तापमान वाढीची शक्यता आहे.