लोकदर्शन 👉 मोहन भारती
राजुरा :– राज्यातील अकृषी विद्यापीठे व शासकीय अनुदानित महाविद्यालयाचे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या महत्त्वाच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात सुरू असलेल्या आंदोलनाला गोंडवाना विद्यापीठ यंग टीचर असोसिएशन ने पाठिंबा दिला असून आज गोंडवाना विद्यापीठा समोर सुरू असलेल्या विद्यापीठ स्तरीय अधिकारी व कर्मचारी यांच्या आंदोलनाला संघटनेच्या शिष्टमंडळाने घटनास्थळी भेट दिली आहे. या शिष्टमंडळात गोंडवाना यंग टीचर्स असोसिएशनचे सचिव डॉ.विवेक गोरलावार,उपाध्यक्ष डॉ. नंदाजी सातपुते,सहसचिव डॉ. प्रमोद बोधाने यांनी पाठिंब्याचे पत्र आंदोलकर्ते प्रतिनिधींना दिले आहे.
मागील तीन वर्षापासून अकृषी विद्यापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या शासन स्तरावर अनेक मागण्या प्रलंबित असून याकडे शासनाचे दुर्लक्ष होत आहे. त्यांच्या प्रमुख मागण्यामध्ये सातवा वेतन आयोग लागू करणे ,सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना लागू करणे, पाच दिवसाचा आठवडा लागू करणे तदर्थ पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांना पदोन्नती पदाचे निवृत्ती वेतन देणे, गोंडवाना विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना नक्षलग्रस्त भागात कार्यरत असलेल्या शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे एकस्तर पदोन्नती योजना लागू करणे,2005 नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे या मागण्या सह इतर मागण्यांचा समावेश आहे. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी शिक्षकेतर कर्मचारी विविध संघटनेकडून काळी फीत लावून काम करणे,लाक्षणिक संप, उपोषण व आंदोलन इत्यादी साधनांचा टप्प्याटप्प्याने मार्ग वापरून शासनाचे लक्ष वेधनाच्या प्रयत्न करीत आहे या पार्श्वभूमीवर गोंडवाना विद्यापीठ टीचर्स असोसिएशन ने विद्यापीठस्तरीय व अशासकीय महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला व मागण्यांच्या पूर्ततेसाठी जाहीर पाठिंबा दिला आहे.