By : राजेंद्र मर्दाने
वरोरा : स्वांतत्र्याचा अमृतमहोत्सव या उपक्रमाअंतर्गत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या निर्देशानुसार कृषी विभाग, पंचायत समिती वरोरा तर्फे माढेळी येथील जि.प. शाळा सभागृहात शेतकऱ्यांसाठी कृषी विषयक मार्गदर्शन कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी माढेळीचे सरपंच देवानंद महाजन हे होते.
मंचावर प्रमुख पाहुणे व मार्गदर्शक म्हणून पंचायत समिती वरोऱ्याचे सहा. गटविकास अधिकारी संजय वानखेडे, वरोरा तालुका कृषी कार्यालय येथील कृषी पर्यवेक्षक विकास चवले, पंचायत समिती वरोरा येथील कृषी अधिकारी जयंत धात्रक , चंद्रकिशोर ठाकरे, उमेदचे तालुका व्यवस्थापक अरूण चौधरी, मनरेगाचे तांत्रिक अधिकारी ताराचंद कुंभारे प्रामुख्याने उपस्थित होते.
आपल्या मनोगतात सहा. गटविकास अधिकारी वानखेडे यांनी पंचायत समिती मार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती दिली. त्यांनी ‘ कोव्हीड १९ ‘ प्रतिबंधक उपाययोजना बाबतही उपयुक्त मार्गदर्शन केले. शासन निर्णयानुसार सर्वांनी लसीकरणाचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.
अध्यक्षीय भाषणात सरपंच महाजन यांनी शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्त उत्पादन घेणाऱ्या पिकांची लागवड करण्याचे आवाहन केले. यावेळी शेतीतील स्वअनुभवही त्यांनी कथन केले.
यावेळी कृषी अधिकारी जयंत धात्रक, विकास चवले, चंद्रशेखर ठाकरे, इ.ची समयोचित भाषणे झाली.
कार्यशाळेत कृषी अधिकारी, कृषी पर्यवेक्षक यांनी शेतकऱ्यांना विविध शासकीय कृषी योजनांची माहिती समजावून सांगितली.व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
सदर सभेला नीजीविडू कंपनीचे प्रतिनिधी लिंगरवार आणि बीएएसएफ कंपनीचे प्रतिनिधी बायस्कर उपस्थित होते.
मार्गदर्शन सभेला डॉ. बाबासाहेब कृषी स्वावलंबन योजनेंतर्गत मंजूर लाभार्थी, शेतकरी गट, कृषी सखी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सूत्रसंचालन कृषी अधिकारी जयंत धात्रक यांनी केले तर आभार कृषी अधिकारी चंद्रकिशोर ठाकरे यांनी केले.