पोंभुर्णा नगर पंचायतचा विकास बुलेट ट्रेनच्‍या वेगाने करू – आ. सुधीर मुनगंटीवार

By : Shivaji Selokar

नगर पंचायतीच्‍या निवडणूकीच्‍या पार्श्‍वभूमीवर पोंभुर्णा येथे जाहीर सभा संपन्‍न

जनतेचा सुड घेण्‍याचा एककलमी कार्यक्रम सुरू करीत, बेईमानी करून सरकार स्‍थापन करणा-या महाविकास आघाडीने सरकारने महिला, कामगार, शेतकरी, शेतमजूर व सामान्‍य जनतेचं शोषण करण्‍याचं कार्य सुरू ठेवलं आहे. मात्र पोंभुर्णा नगर पंचायतीतील नागरिकांच्‍या आशिर्वादाच्‍या बळावर या नगर पंचायत क्षेत्राचा अभूतपूर्व असा विकास भारतीय जनता पार्टीच्‍या माध्‍यमातुन आपण केला आहे. त्‍यामुळे होणा-या २१ डिसेंबर २०२१ च्‍या पोंभुर्णा नगर पंचायत निवडणूकीमध्‍ये भारतीय जनता पार्टीच्‍या १७ च्‍या १७ ही उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्‍याचे आवाहन यावेळी विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख व माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

दिनांक १९ डिसेंबर २०२१ रोजी पोंभुर्णा नगर पंचायत निवडणूकीनिमीत्‍त पोंभुर्णा शहरातील आयोजित सभेत आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपा चंद्रपूर जिल्‍हाध्‍यक्ष देवराव भोंगळे, जिल्‍हा परिषदेच्‍या अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, महिला आघाडीच्‍या जिल्‍हाध्‍यक्षा कु. अलका आत्राम, मुलच्‍या नगराध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर, भाजपा नेते अजय दुबे, भाजयुमो जिल्‍हाध्‍यक्ष आशिष देवतळे, जि.प. सदस्‍य राहूल संतोषवार, अॅड. हरीश गेडाम, पिपल्‍स रिपब्‍लीकन पार्टीचे जिल्‍हा सरचिटणीस तेजराज मानकर, रिपब्‍लीकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) राजू भगत, जयप्रकाश कांबळे व पोंभुणा नगर पंचायतीच्‍या निवडणूकीत उभे असलेले सर्व १७ उमेदारांची प्रामुख्‍याने उपस्थिती होती.

यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, पोंभुर्णा नगर पंचायतीच्‍या अभूतपूर्व विकासाच्‍या पार्श्‍वभूमीवर होवू घातलेल्‍या निवडणूकीत भारतीय जनता पार्टीच्‍या सर्व उमेदवारांना निवडून एक हाती सत्‍ता दिल्‍यास विकासाची बुलेट ट्रेन भरधाव वेगाने अशीच सुरू राहील. पोंभुर्णा नगर पंचायत व पोंभुर्णा तालुक्‍यामध्‍ये आजपावेतो अमेरीकेच्‍या व्‍हाईट हाऊसची प्रतिकृती असलेली पोंभुर्णा नगर पंचायतीची देखण्‍या इमारतीचे बांधकाम करण्‍यात आले आहे. तसेच पोंभुर्णा शहरात पंचायत समिती, तहसिलदार कार्यालयाच्‍या इमारतीचे बांधकाम, ग्रामीण रूग्‍णालयाची निर्मीती, टूथपिक उत्‍पादन केंद्र, बांबु हॅन्‍डीक्राफ्ट अॅन्‍ड आर्ट युनिट, आदिवासी मुलामुलींसाठी शासकीय वसतीगृहाचे बांधकाम, वनविश्रामगृहाचे बांधकाम, भारतरत्‍न अटलबिहारी वाजपेयी इको पार्क, पाणी स्‍वच्‍छता पार्कचे बांधकाम, महिलांसाठी अगरबत्‍ती उत्‍पादन केंद्र, अत्‍याधुनिक स्‍टेडियमचे बांधकाम, रस्‍त्‍याच्‍या लगत विद्युत खांबावर एलईडी पथदिवे, डॉ श्‍यामाप्रसाद मुखर्जी सार्वजनिक वाचनालयाचे बांधकाम, श्री राजराजेश्‍वर मंदीर परिसराचे सौंदर्यीकरण, मुख्‍य रस्‍त्‍याचे सिमेंटीकरण, दुभाजकाचे बांधकाम व पथदिवे बसविण्‍याचे काम, बस स्‍थानकाच्‍या बांधकाम, सार्वजनिक बांधकाम उपविभागीय कार्यालयाची निर्मीती, औद्योगिक प्रशिक्षण संस्‍थेचे नुतनीकरण, पाणी पुरवठा योजना, तलावाचे सौंदर्यीकरण, संताजी जगनाडे महाराज सभागृहाच्‍या बांधकामाला मंजूरी, वीर शहीद बाबुराव शेडमाके सभागृहाच्‍या बांधकामाला मंजूरी, खुल्‍या नाटयगृहाच्‍या बांधकामाला मंजूरी, पिण्‍याचे शुध्‍द पाणीसाठी आरो प्‍लॉट, अंगणवाडी व शाळा नुतनीकरण, ई-लर्निंगची सोय, रोजगाराच्‍या संधी उपलब्‍ध करण्‍याच्‍या दृष्‍टीने विविध उपक्रम, आदिवासी भगिनींची राज्‍यातील पहिली कुक्‍कुटपालन संस्‍था पोंभुर्णा येथे अस्तित्‍वात आणली. मधुमक्षिका पालनाचा यशस्‍वी प्रयोग आम्‍ही राबविला. पोंभुर्णासाठी स्‍वतंत्र एमआयडीसी स्‍थापना करून महिलांसाठी सुक्ष्‍म उद्योग उभरण्‍यासाठी आम्‍ही प्रयत्‍नशील आहोत. महिला आर्थीक विकास महामंडळाच्‍या माध्‍यमातुन कारपेट तयार करण्‍याचे केंद्र, आठवडी बाजारासाठी बांधकामे करण्‍यात आलेली आहे.

 

यानंतर आ. मुनगंटीवार म्‍हणाले, गेली अनेक वर्षे कॉंग्रेसच्‍या हाती सत्‍ता होती. परंतु त्‍यांच्‍या पंजावर तुमच्‍या भाग्‍याची रेषा नाही. राष्‍ट्रवादीचे घडयाळ १० वाजून १० मिनीटांच्‍या पुढे जात नाही आणि शिवसेनेने बेईमानी करून राज्‍यात सरकार आणले हे सरकार गोरगरीबांची पिळवणूक करणारी सरकार आहे. महागाईवर आरडाओरड करीत असताना पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी पेट्रोल-डिझेलवरील कर कमी केला मात्र महाराष्‍ट्र सरकार पेट्रोल डिझेलवरचा कर कमी करीत नाही त्‍याचवेळी दारूवरचा कर मात्र कमी करते ही शोकांतिका आहे.

 

राज्‍यातील विधवा, परित्‍यक्‍ता, निराधार स्‍त्रीयांसाठी निराधार योजनेचे मानधन ६०० रू. हून १२०० रू. करण्‍यात आले. यापुढे या महिलांसाठी मार्गदर्शन केंद्र उभारणार असल्‍याचे सांगत चंद्रपूरमध्‍ये गोरगरीबांसाठी आरोग्‍य विषयक माहिती देण्‍यासाठी वैद्यकिय कक्षाची सुरूवात केली आहे, असेही ते म्‍हणाले. नगर पंचायत पोंभुर्णा निवडणूक जिंकताच पोंभुर्णामध्‍ये वैद्यकिय कक्ष उभारू, पोंभुर्णातील जे १०-१५ टक्‍के कामे शिल्‍लक आहेत ते ही येणा-या काळात पूर्णत्‍वास नेऊ. होणा-या निवडणूकीत स्‍पष्‍ट बहुमताने भारतीय जनता पार्टीच्‍या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन यावेळी आ. मुनगंटीवार यांनी पोंभुर्णा येथील जनतेला केले. यावेळी सभेला नागरिकांची मोठया संख्‍येने उपस्थिती होती.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *