लोकदर्शन 👉मोहन भारती
⭕चिकित्सक अभ्यासातून विद्यार्थ्यांनी अपेक्षित यश गाठावे.
— आमदार सुभाष धोटे.
⭕न. प. राजुरा अंतर्गत सरदार पटेल अभ्यासिका आणि भारत पार्कचे लोकार्पण.
राजुरा :– नगर परिषद राजुरा अंतर्गत तयार करण्यात आलेल्या सरदार पटेल अभ्यासिका व भारत पार्क या शहरातील नागरिकांसाठी अनेक अर्थाने उपयुक्त अशा विकास कामांचे लोकार्पण दिनांक ४ डिसेंबर २०२१ रोजी सायंकाळी ५ वाजता लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर यांच्या हस्ते पार पडले.
या प्रसंगी उद्घाटक म्हणून मार्गदर्शन करताना खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी सांगितले की, कोणत्याही शहराचा विकास होण्यासाठी तेथे कार्यरत लोकप्रतिनिधी विकासाभिमुख आणि कार्यतत्पर असायला हवेत. नगराध्यक्ष अरुण धोटे हे अशाच बाण्याने काम करणारे लोकप्रतिनिधी आहेत. त्यामुळेच शहरात अनेक लोकहिताच्या विकास कामांना गती मिळाली आहे. अर्थातच त्यांच्या पाठीशी थोरले बंधू आमदार सुभाष धोटे आणि व्यापक जनाधार सदैव सावलीसारखे उभे आहेत. त्यांचे नगर विकासाचे कार्य भुषणावह आहे. तर अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आमदार सुभाष धोटे म्हणाले की, राजुरा शहराच्या विकासासाठी नगराध्यक्ष अरुण धोटे यांच्या नेतृत्वात नगर परिषदेने आमदार निधीतून अतिशय लोकोपयोगी विकासकामे पूर्ण केली आहेत. नागरिकांचे आरोग्य सुदृढ रहावे, विरंगुळा मिळावा यासाठी भारत पार्क तर विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी अत्याधुनिक सुविधा संपन्न सरदार पटेल अभ्यासिका ची निर्मीती केली आहे. माणसाला प्रगती साधण्यासाठी, परिपूर्ण जीवन जगण्यासाठी, जगाची ओळख करून घेण्यासाठी अभ्यासाची नितांत गरज आहे. चिकित्सक अभ्यासातून विद्यार्थ्यांना अपेक्षित यश गाठता येते. त्यामुळे अधिकाधिक विद्यार्थी व नागरिकांनी या सर्व सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.
या प्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक खासदार बाळुभाऊ धानोरकर, अध्यक्ष आमदार सुभाष धोटे, विशेष उपस्थिती माजी आमदार ॲड. संजय धोटे, प्रमुख अतिथी म्हणून नगराध्यक्ष अरूण धोटे, उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे, बांधकाम सभापती हरजीत सिंग संधू, शिक्षण सभापती राधेश्याम अडानिया, स्वच्छता व सार्वजनिक आरोग्य सभापती आनंद दासरी, शिक्षण व बालकल्याण सभापती वज्रमाला बतकामवर, गटनेते रमेश नळे, माजी नगराध्यक्ष स्वामी येरोलवार, नगरसेविका संध्या चांदेकर, साधना भाके, दीपा करमणकर, उज्वला जयपूरक, प्रिती रेक्कलवार, माजी नगरसेवक प्रभाकर येरने यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नगराध्यक्ष अरुण धोटे यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. डॉ. संजय गोरे यांनी तर आभार प्रदर्शन उपनगराध्यक्ष सुनील देशपांडे यांनी केले. कार्यक्रमाला सर्व नगरसेवक, नगरसेविका, पत्रकार, शिक्षक, विद्यार्थी व स्थानिक नागरिक उपस्थीत होते.