By : Shivaji Selokar
शाळा, महाविद्यालयाला सुधीर मुनगंटीवार यांचे नाव!
तसं ते व्यक्तिमत्त्व पुरस्कारांच्या पलीकडचं. विधिमंडळात उत्कृष्ट कामगिरी बजावली म्हणून कित्येकदा त्यांचं कौतुक झालं. उत्कृष्ट संसदपटू पुरस्काराने सन्मान झाला. तब्बल सहावेळा ते लोक निर्वाचित प्रतिनिधि म्हणून विधिमंडळात पोहोचले. तिथे त्यांनी कर्तबगारी सिद्ध केली ती जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी. सुरुवातीला कितीतरी वर्ष विरोधीपक्ष म्हणून सरकार विरुद्ध दंड थोपटण्यातच राजकीय हयात खर्ची घालावी लागली. पण जनतेचे प्रश्न हाच त्यांचा एककलमी अजेंडा राहिला. विधिमंडळ कार्यपद्धतीची जाण, नियमांचा खोलवर अभ्यास, प्रश्न मांडण्याची तडफ, ते सोडवून घेण्यासाठी ची अनुभवातून ध्यानात आलेली रीत, या साऱ्या बाबींचा एकत्रित परिणाम हा, की विरोधी बाकांवर बसणारा हा माणूस तिथून दबाव आणत लोककल्याणकारी काम करू लागला.
आ. सुधीर मुनगंटीवार हे नाव जनसामान्यांच्या तोंडी बसलं. नागपूर विद्यापीठाला राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांचे नाव देण्याचा विषय असो की मग पुण्यात जोतिबा आणि सावित्रीबाई यांच्या पिढीतील विद्यमान सदस्यांची हलाखीची परिस्थिती सरकारच्या ध्यानात आणून देण्याचा मुद्दा असो, हे प्रश्न मार्गी लावण्यासाठी सर्वांना आठवले ते चंद्रपूर जिल्ह्यातले नेतॄत्व असलेले सुधीर भाऊ. सुधीर मुनगंटीवार यांनी मांडला तर समस्या नक्की निकाली निघेल, हा विश्वास त्या लोकांच्या मनात निर्माण झाला तो मुनगंटीवार यांच्या आजवरच्या कार्यशैलीतून. लोकांचा विश्वास जसजसा दॄढ होऊ लागला, तसतशी प्रश्न घेऊन येणाऱ्यांची रीघही वाढू लागली. आणि या नावावर, व्यक्तीमत्वावर प्रेम करणाऱ्यांची संख्याही दिवसागणिक वाढू लागली. कार्यकारिणीची बैठक असो वा मग एखादी जाहीर सभा, एखाद्या प्रकल्पाला भेट असो की प्रवासासाठी विमानतळावरचा वावर, सुधीरभाऊंभोवती चाहत्यांचा गराडा जमला नाही तरच नवल! कधी आरतीने ओवाळून स्वागत, तर कधी तुकडोजी महाराज बसत, त्या गादीवर बसविले जाणे….. कार्यकर्ते आणि चाहत्यांच्या प्रेमात न्हाऊन निघण्याचे भाग्य लाभलेला एक राजकीय नेता म्हणजे सुधीर मुनगंटीवार. अर्थात हे भाग्य त्यांच्या वाट्याला आले ते त्यांच्या स्वतःच्या कर्तृत्वातून. लोकांनी बरसात केलेल्या प्रेमात चिंब भिजण्याचे अजून दोन प्रसंग गेल्या काही दिवसांत घडून आलेत. दोन स्थांनी त्यांच्या शैक्षणिक उपक्रमांना सुधीर मुनगंटीवार यांचे नाव दिले आहे. हिंगोली जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथील एक महाविद्यालय सुधीर मुनगंटीवार यांच्या नामाभिधानाने सुरू झाले आहे. तर सुलतानपूर येथे एका वैद्यकीय महाविद्यालयाला त्यांचे नाव देण्यात आले आहे. आजवर अनेक नागरी सत्कार झालेत, शासकीय कार्यक्रमात इतमामाने गौरव झाले, पुरस्कार पदरी पडलेत, काही वर्षांपूर्वीच्या त्या अपघाताच्या प्रसंगात लोकांचे अलौकिक प्रेम अनुभवता आले होते. पण, कुणी आपले नाव त्यांच्या शाळा – महाविद्यालयाला द्यावे, हे सन्मानाचे अत्युच्च शिखरच. ही उंची त्यांच्या कार्याची, कर्तृत्वाची आहे. शिवाय, राज्याच्या एका टोकापासून राजकीय कारकीर्द आरंभणारे सुधीर मुनगंटीवार नावाच्या व्यक्तीमत्त्वाची स्वीकारार्हता एव्हाना सर्वव्यापी होत असल्याची साक्ष या निमित्ताने सिद्ध झाली आहे.