By 👉 Shankar Tadas
नागपूर, ता. १७ – शेतकºयांच्या पिकांना भाव मिळावा व त्यांच्या हक्कासाठी निरपेक्ष भावनेने सातत्याने लढणारा एक सच्चा साथी राम नेवले यांच्या रुपाने गमावला आहे, अशा शब्दात नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शोक संवेदना व्यक्त केली.
शेतकरी संघटनेचे पाईक असलेले राम नेवले यांनी शरद जोशी यांच्या नेतृत्वात तरुणपणी शेतकरी संघटनेच्या आंदोलनात उडी घेतली. त्यानंतर त्यांनी निष्ठेने शरद जोशी यांना सातत्याने साथ दिली. शेतमालांना भाव मिळावे व शेतकºयांच्या इतर हक्कांसाठी सातत्याने त्यांनी लढे उभारले. राम नेवले स्वतंत्र विदर्भ राज्याच्या आंदोलनात सक्रिय राहिले. स्वतंत्र विदर्भ आंदोलनाच्या चळवळीत त्यांनी अखेरपर्यंत योगदान दिले. शेतमालाला भाव द्यावा आणि विदर्भावर राज्य सरकारकडून होत असलेला अन्याय संपवावा, अशी भूमिका राम नेवले यांनी घेतली होती. त्यांच्या निधनाने शेतकरी आंदोलन व स्वतंत्र विदर्भाच्या चळवळीची मोठी हानी झाल्याचे डॉ. राऊत यांनी शोक संदेशात म्हटले आहे.