लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
चंद्रपूर : जगभरात नवे तंत्रज्ञान, नव्या उद्योगांना चालना मिळत आहे . या बदलांना सामोरे जाताना शासन प्रशासनाचे सहकार्य आवश्यक आहे . शेती, सिंचन, शिक्षण आणि उद्योगांना देशातील जानते नेतृत्व मा . खासदार शरदचंद्रजी पवार यांच्या नेतृत्वात चालना मिळत आहे. अशा दूरदृष्टीच्या नेत्याचे मार्गदर्शन आणि सहकार्य जिल्ह्यातील उद्योजक़ाना मिळावे या साठी ‘संवाद उद्योजका सोबत’ या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार दिनांक १९-११-२१ रोजी सकाळी ८.४५ वाजता एन. डी हॉटेल, नागपूर रोड चंद्रपूर येथे होणार आहे. यावेळी मार्गदर्शक म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अध्यक्ष खासदार शरदचंद्रजी पवार साहेब राहणार आहे, अशी माहिती कार्यक्रमाचे संकल्पक संयोजक खासदार बाळू धानोरकर यांनी दिली.
शरद पवारांचा उद्योग जगताशी जवळून संबंध राहिला आहे. शेतीवर निस्सीम प्रेम असले, तरी शेतीबरोबरच उद्योगाचा विकास झाला, तरच देशाचा विकास होऊ शकतो, असा विचार असलेले नेते शरद पवार आहेत. शेतीवरील भार कमी करताना उद्योगाचे जाळे वाढले पाहिजे आणि त्यासाठी शरद पवारांनी सतत प्रयत्न केल्याचे दिसते. स्थानिक पातळीपासून ते अगदी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्या उद्योजकांना आलेल्या अडचणी किंवा अडचणीचे ठरणारे नियम यातून मार्ग निघावा, म्हणून शरद पवारांनी अगणित वेळा मदत केली आहे, त्यांचे उद्योजकशील विचार पोहोचविण्यासाठी हा संवाद होत आहे, असेही खासदार धानोरकर यांनी सांगितले.
यावेळी विशेष अतिथी म्हणून बहुजन कल्याण मंत्री तथा पालकमंत्री विजय वडेट्टीवार, खासदार प्रफुल पटेल, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे राहणार आहेत. या कार्यक्रमाची संकल्पना खासदार चंद्रपूर – वणी- आर्णी लोकसभा क्षेत्र बाळू धानोरकर यांची आहे. प्रमुख उपस्थिती आमदार सुभाष धोटे, आमदार प्रतिभाताई धानोरकर, आमदार अभिजित वंजारी, चंद्रपूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस निरीक्षक प्रवीण कुंटे पाटील राहणार आहे.
या कार्यक्रमाचे आयोजक एम. आई. डी. सी. इंडस्ट्रीज असोसिएशन चंद्रपूर तर सहयोजक म्हणून फेडरेशन ऑफ ट्रेड कॉमर्स अँड इंडस्ट्री चंद्रपूर, चंद्रपूर चेंबर ऑफ कॉमर्स, रोटरी क्लब ऑफ चंद्रपूर, चांदा को- ऑफ इंडस्ट्री इस्टेट, राइस मिल असोसिएशन मूल, इन्कम टॅक्स बार असोसिएशन, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज असोसिएशन, विदर्भ, डॉक्टर फ्रॅटर्निटी चंद्रपूर, केमिस्ट अँड ड्रगिस्ट फ्रॅटर्निटी चंद्रपूर हे राहणार आहे. तरी जिल्ह्यातील उद्योजकानी या विचारमंथनात सहभागी होऊन या संधीचा लाभ घेण्याची विनंती आयोजकांनी केली आहे.