By : Shivaji Selokar
मुंबई,ता.९: ‘सेवा, संघटन, संवाद, संघर्ष आणि विकास या पंचसूत्री नुसार भारतीय जनता पार्टीची पायाभरणी झाली असून कार्यकर्त्यांनी याचा अवलंब केल्यास राष्ट्रहिताचे आमचे ध्येय निश्चित साध्य होईल. पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या नेतृत्वात त्या दिशेने वाटचाल देखील सुरू झाली आहे, असे प्रतिपादन करून सर्वसामान्य माणसाच्या हक्कासाठी संघर्षाची तयारी ठेवा असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज केले. रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी येथे आयोजित औसा विधानसभा मतदारसंघातील भाजपा कार्यकर्त्यांच्या प्रशिक्षण कार्यशाळेत ते बोलत होते. औसा मतदार संघाचे आमदार अभिमन्यू पवार यावेळी मंचावर उपस्थित होते.
सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले की भारतीय जनता पार्टी चा इतिहास त्याग, बलिदान आणि समर्पणाचा आहे. राष्ट्र सर्वोतोपरी हे ध्येय निश्चित करून सत्ता कारणासाठी राजकारण न करता समाजातल्या शेवटच्या घटकांपर्यंत विकासाचा मार्ग खुला करण्याचे ध्येय भारतीय जनता पार्टीच्या मुशीत घडलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याचे आहे. देशात अडीच हजाराहून अधिक पक्ष आहेत परंतु यामध्ये भाजपा हा एकमेव असा पक्ष आहे जो नेता आणि परिवार यापेक्षा संघटन आणि कार्यकर्ता यांच्या बळावर मोठा झालाय. यातला प्रत्येक कार्यकर्ता निष्ठेने आणि सेवाव्रती भावनेने झपाटल्यागत काम करतो. विशेष म्हणजे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या एकात्म मानव वाद या संकल्पनेतून शेवटच्या माणसाचे कल्याण या उद्दिष्टाने काम करणारा भाजपाचा कार्यकर्ता केवळ निवडणूक नाही तर जनतेची मने जिंकण्याचा प्रयत्न करतो, म्हणूनच विश्व गौरव नरेंद्र मोदी यांच्यासारखा भाजपाचा नेता जगात सर्वात लोकप्रिय झाला आहे.
अनेक आव्हाने सध्या देशासमोर आहेत, समाजासमोर आहेत. त्यावर मात करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांशिवाय पर्याय नाही असा विश्वास देशातील जनतेला झाला आहे. म्हणूनच आपली ही जबाबदारी अधिक वाढली आहे याची जाणीव प्रत्येकाने ठेवायला हवी असे आवाहन देखील त्यांनी केले. केंद्र शासनाने सुरू केलेल्या विविध योजनांची माहिती जनतेपर्यंत पोहोचवून हक्काच्या मागण्यांसाठी संघर्ष करण्याची तयारी ठेवा असे आवाहन देखील सुधीर मुनगंटीवार यांनी यावेळी केले.