लोकदर्शन👉शिवाजी। सेलोकर। ——————————————–
——————————————–
PM Modi Pandharpur पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्ग याचे भूमीपूजन झाले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभंगाचा दाखला देत वारकरी परंपरेचे महत्त्व अधोरेखित केले. या पालखी मार्गामुळे विठ्ठल भक्तांना सुविधा तर उपलब्ध होतील. त्याशिवाय स्थानिक विभागाच्या विकासात हे मार्ग मोलाची भूमिका बजावतील असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला. विठ्ठलानेच आपली भेट घडवली असल्याचे म्हणत पंतप्रधान मोदी यांनी उपस्थित जनसमुदायाला भावनिक साद घातली.
पंढरपूर पालखीमार्गाच्या कामाचे भुमीपूजन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. कार्यक्रमास केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, सोलापूरचे पालकमंत्री दत्तात्रय भरणे, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह केंद्रीय तसेच राज्य मंत्रिमंडळातील मंत्री आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, देश शेकडो वर्षांच्या गुलामीत अडकला होता. नैसर्गिक संकटे आली, अनेक आव्हानात्मक परिस्थिती आली. मात्र, विठ्ठलाच्या भक्तीत खंड पडला नाही. वारी ही जगातील सर्वात जुनी आणि मोठ्या जनयात्रेच्या स्वरुपात आहे. वारी ही जनआंदोलनाच्या स्वरुपात पाहिली जाते असेही पंतप्रधानांनी म्हटले.
पंतप्रधान मोदी यांनी म्हटले की, पालखी यात्रेचे मार्ग वेगवेगळे असले तरी एकाच ठिकाणी त्या दाखल होतात. भारताच्या त्या शाश्वस्त शिक्षणाचे हे प्रतिक असून आपल्या आस्थेला एका ठिकाणी बांधत नाहीत, तर त्यांना मुक्त करतात. आपले मार्ग वेगवेगळे असू शकतात. विचार वेगवेगळे असू असतात. मात्र, त्याचे लक्ष्य एक आहे. शेवटी सर्व पंथ हे ‘भागवत पंथ’ आहेत, असेही त्यांनी म्हटले.