लोकदर्शन 👉 दि 30/10/2021
(लेखिका)
जीवन हा असा रंगमंच आहे की त्यावर रोज एक नवा खेळ असतो. उद्या काय घडणार ते आज नाही कळणार. पण तरीही त्या रंगमंचावर तुम्हाला तुमच्या भूमिकेसह तयार असावे लागते. कोणाची भूमिका कोणती आहे यापेक्षा जसं नाटकामध्ये एखाद्या कलाकारांनी भूमिका किती चांगली वठवली त्यावर त्या भूमिकेचं यश अवलंबून असतं. तसचं तुमची भूमिका तुम्ही किती चांगल्या पद्धतीने साकार कराल त्यावर तुमच्या जीवनाचा आकार आहे.
आज विज्ञान युग. प्रत्येक गोष्ट आपण विज्ञानाच्या कसोटीवर पडताळून पाहण्याचा प्रयत्न करतो. पण तरीही आपल्या जीवनात उद्या येणारे संकट, उद्या येणारे अपयश, आव्हान, सुख- दु:ख आपल्याला माहीत नसतात. तरी आपण प्रयत्न करत असतो आणि हाच प्रयत्न या रंगमंचाला आकार देत असतो.कोणी शिक्षक, कोणी डॉक्टर कोणी अभियंता किंवा कोणी शिपाई पण तरीही तुम्ही केलेले प्रत्येक चांगले कार्य तुमच्या या भूमिकेला एक नवा साज चढवत असतो.ती भूमिका प्रत्येकाच्या मनात मग ठासून भरली जाते. कोरोना काळात ज्या डॉक्टरांनी, ज्या सिस्टरांनी आपल्या जीवाची काळजी न करता केवळ कामाला महत्त्व दिले. त्यांनी खरंच आपल्या भूमिकेला आपले तन-मन-धन अर्पण केले.आपल्या भूमिकेला न्याय दिला. त्यांच्या या अथक प्रयत्नांतूनच आज अनेकांचे जीव वाचले आणि आपण म्हणू शकतो की त्यांनी खरोखरच जीवन दान केले.
जीवनात पदोपदी काही बदल घडत असतात.कधी तुम्हाला अधिक पैसा मिळेल, कधी पद मिळेल, कधी तुम्ही शिक्षणात पुढे जाल, तर कधी समाजसेवेसाठी तुमचे नाव होईल म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला तुमच्या भूमिकेला महत्त्व द्यायचे आहे. तुम्ही तुमची भूमिका किती चांगल्या पद्धतीने साकार केली त्यावर तुमचा सत्कार आहे.आपण केलेले काम केवळ खुशामतीसाठी करणारे दिसतील.तरी आपल्या इमानाला जर अबाधित ठेवायचे तर ते काम खुशामत म्हणून न करता खूश होऊन करा.
आज ना उद्या तुम्हाला सगळे विसरतील. पण तुमच्या भूमिकेला नक्कीच विसरणार नाहीत. तुमच्या निस्वार्थ कृतीतून, कामाप्रती तन्मयतेतून संपर्कातील प्रत्येकाने आपल्या मनाच्या कोपर्यात तुम्हाला जागा दिलेली आहे.ती जागा मात्र कोणीही घेऊ शकणार नाही. तुम्ही काम कोणतेही करा पण त्या कामाप्रती तुमची त्याग बुद्धी, तुमची आत्मीयता, तुमची समर्पण वृत्ती ही प्रत्येकाच्या मनात दडून बसलेली असते. या त्यागातूनच तुम्ही जीवनात आनंदाचे पुष्प कमल फुलवत असता. बाग कितीही सुंदर असली पण त्या बागेत फुलं नसली तर ती बाग निरस वाटते. तसेच तुम्ही जीवन जगत असताना केवळ काम करायचे, पैसे कमावयाचे या भावनेतून तुमच्या भूमिकेला वठवले तर ती ही तुम्हाला तसेच आयुष्य पदरात देईल.
भूमिका काय त्यापेक्षा त्या भूमिकेशी तुम्ही किती समरस झाला, त्यावर तुमचे यशापयश अवलंबून असते.
प्रत्येक ज्युनिअर एक दिवस सिनिअर होतो.मग तो ही आपल्या ज्युनिअरला त्रास देतो. या प्रक्रियेत तो आपल्या भूमिकेला मात्र विसरुन जातो.तर काही सिनिअर त्यांना त्रास झाला, तो त्रास इतरांना होऊ नये यासाठी जीवाचे रान करतात.त्यांना आपसुकच आदर, प्रेम, सद्भावना, सहकार्य मिळते.ते केवळ स्वतः: चा जीवन दर्जा उंचावत नाहीत तर सगळ्यांच्या नजरेत त्यांची प्रतिमा कायमची स्थापित करतात.
प्रत्येकाची भूमिका कर्माने वेगळी असली तरी उद्देश हा परमार्थ ठेवला.तर प्रयत्न आपोआप सार्थ होतो.जे तुम्हाला हवे ते न मागता पदरात येते.या रंगमंचावरील खेळ कोणताही असू द्या.तुम्ही सदैव तयारी करा.खेळ तुम्हीच जिंकणार आहात.ही भूमी तुमचा सरकता रंगमंच आहे.त्यात तुम्ही नीत नवीन रंग भरा.त्यातून तुमची स्वप्ने साकार होतील.
डॉ. सौ. शुभांगी गादेगावकर
मीरा रोड, जिल्हा-ठाणे
मो. ९६१९५३६४४१