By : Mohan Bharti
चंद्रपूर / राजुरा :– दिनांक २५ आक्टोबर
राजुरा विधानसभा मतदारसंघातील राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील समस्यांचे तातडीने निराकरण करण्यासाठी जिल्हाधिकारी अजय गुल्हाने यांचे दालनात तालुक्यातील अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात आली. विकास कामाबाबत आमदार सुभाष धोटे यांनी क्षेत्रातील समस्यांवर सविस्तर चर्चा करून क्षेत्रात विकासकामांना गती देण्यासाठी अधिकाऱ्यांनी विशेष लक्ष देवून कामे मार्गी लावावेत अश्या सुचना दिल्या.
बैठकीदरम्यान अनेक महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाली. त्यात गडचांदूर येथील बसस्थानकाच्या जागेचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा. राजुरा येथील तलाव सौंदर्यीकरणाचे काम थंड बस्त्यात पडलेले आहे. याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात येवून तलाव सौंदर्यीकरणाचे काम पूर्ण करून राजुरा शहरातील आबालवृद्ध नागरिकांसाठी सुविधा सुरु करण्यात यावी. राजुरा शहरातील रमाई नगर, चुन्नाभट्टी, इंदिरानगर, तसेच इतर वार्डातील अतिक्रमण करूण अनेक वर्षांपासून वास्तव्य करीत असलेल्या नागरीकांना कायम स्वरूपी पट्टे देणेबाबत तातडीची कार्यवाही करण्यात यावी. राजुरा शहरालगत असलेल्या तालुका क्रीडा संकुल लगत अद्यावत जलतरण तलाव निर्माण करण्यासाठी आराखडा तयार करून युवक व नागरीकांना सुविधा उपलब्ध करुन देणे संबंधी नियोजन करावे. राजुरा, कोरपना, जिवती व गोंडपिपरी तालुक्यातील आदिवासी व गैरआदिवासी अतिक्रमण धारक शेतकऱ्यांना कायम स्वरूपी पट्टे देणेबाबत विशेष मोहीम राबवुन मालकी हक्काचे पट्टे वितरीत करण्यात यावेत. जे शेतकरी सन २००५ च्या पुर्वीपासून अतिक्रमण करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत अशा शेतकऱ्यांना वनहक्काचे पट्टे मंजूर करून त्यांना कायमस्वरूपी पट्टे देण्यात यावे. जिवती तालुक्यातील कोदेपुर, गुडसेला व जिवती या तलावाची कामे सुरू करुन जलसंधारणाची कामे तातडीने मार्गी लावावेत. जिवती तालुक्यामधील नगर पंचायत जिवती येथील प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत मंजूर ६६४ घरकुलांची बांधकामे पूर्ण करण्यासाठी तातडीने कार्यवाही करण्यात यावी. जिल्हा परिषद सर्कल निहाय महिला बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी
महिला बचत भवनाचे बांधकाम करण्यात यावेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरकुल मंजुर असलेल्या ज्या लाभार्थींना जागा उपलब्ध नाही अशा लाभार्थींना ५०० चौ. फूट जागा उपलब्ध करून देणेबाबत तालुका स्तरावरील समितीने जलदगतीने कार्यवाही करुन गोरगरीब जनतेसाठी हक्काची जागा उपलब्ध करून द्यावी. मतदार संघातील आदी महत्त्वाच्या विषयांवर आमदार सुभाष धोटे यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करून या सर्व विकास कामांमध्ये येणाऱ्या अडचणी दूर करून क्षेत्रातील विकास कामांना गती देण्यासाठी मा. जिल्हाधिकारी यांनी विशेष लक्ष घालावे असे सांगितले.
या प्रसंगी राजुराचे उपविभागीय अधिकारी संपत खलाटे, जिल्हा नियोजन अधिकारी ग. रू. वायाळ, नगर पालिका प्रशासन अधिकारी अजित डोके, जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रावण शेंडे, जिल्हा खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम, मध्य चांदा वनविभागाचे सहायक वनसंरक्षक श्रीकांत पवार राजुरा तहसीलदार हरीष गाडे, गोंडपिपरीचे के. डी. मेश्राम, कोरपनाचे एम. यु. वाकलेकर, जिवती चे अतुल गांगुर्डे, राजुरा व गोंडपिपरी मुख्याधिकारी पिदुरकर, गडचांदूर मुख्याधिकारी विशाखा शेळकी, नगररचना विभागाचे सुनील दहिकर, शाखा अभियंता पी. जे. पुल्लावार, पी. एच. आंबोटे, नगर पंचायत जिवतीचे प्रशासन अधिकारी व्हि. एस. थोरात, न प राजुरा चे नगररचना सहाय्यक अभिनंदन काळे यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.