🎂धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांची भेट
लोकदर्शन 👉 शंकर तडस
नागपूर, ता. १४ – उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे नामांतर आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर अतिविशेषोपचार. वैद्यकीय शिक्षण व संशोधन संस्था असे करण्याचा शासन निर्णय जारी झाला. ६५ व्या धम्मचक्रप्रवर्तन दिनाच्या पूर्वी राज्य सरकारने हा शासन निर्णय निर्गमित करून नागपूरकरांना मोठी भेट दिली आहे. यामुळे नागपूरच्या वैद्यकीय सुविधांमध्ये वाढ होण्यास मदत होणार आहे.
२०१४ पासून सातत्याने उत्तर नागपुरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे श्रेणीवर्धन करण्याचे प्रयत्न पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांच्याकडून सातत्याने सुरू होते. या रुग्णालयातील पदांच्या निर्मितीला सुद्धा मंजुरी मिळाली होती. परंतु काही अडचणींमुळे रुग्णालयाच्या श्रेणीवर्धनाचा प्रश्न प्रलंबित होता. पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी पुढाकार घेतल्यामुळे उत्तर नागपुरात आता अतिविशेषोपचार रुग्णालय व पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रम सुरू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. श्रेणीवर्धन करताना राज्य सरकारने या रुग्णालय व अनुसंधान केंद्राचे नाव डॉ. बाबासाहेब आंबेडकर अतिविशेषोपचार, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संस्था असे केले आहे.
यात ६१५ खाटा उपलब्ध राहणार असून १७ पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणाचे अभ्यासक्रम राहणार आहेत. या संशोधन संस्थेच्या श्रेणीवर्धनासाठी ११६५ कोटी रुपये सरकारने मंजूर केले असून पुढील पाच वर्षांसाठी अनावर्ती खर्च अनुसूचित जाती उपयोजनेतून केला जाणार आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग व वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग यांनी अनुक्रमे ७५:२५ या प्रमाणात स्वीकारण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे.