पाहणी व पंचनामे करून अहवाल देण्याच्या सुचना
गेल्या आठवडयात लातूर जिल्हयामध्ये मुसळधार पाऊस् पडला. यामध्ये लातूर तालुक्यातील हरंगुळ खुर्द येथे शुक्रवार दि. ८ आँक्टोबर २१ रोजी अचानक ढगफुटी सदृश्य मुसळधार पाऊस पडला. या मुसळधार पावसात शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले, शेतकऱ्यांचे सोयाबीन वाहून गेले, गावातील अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरून घरे जलमय झाली, ही माहिती मिळताच राज्याचे वैद्यकीय शिक्षण व सांस्कृतिक कार्यमंत्री तथा लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांनी पक्षाचे पदाधिकारी, अधिकारी यांना तातडीने हरंगुळ खुर्द येथे जाऊन पाहणी करून पंचनामे करावेत आणि तातडीने अहवाल सादर करावेत असे निर्देश दिले.
लातूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. अमित विलासराव देशमुख यांच्या निर्देशावरून उपविभागीय अधिकारी सुनिल यादव, तहसिलदार स्वप्नील पवार, गटविकास अधिकारी गोडभरले व लातूर तालुका काँग्रेस कमिटी तालुकाध्यक्ष सुभाष घोडके यांनी हरंगुळ खुर्द येथे जाऊन चंद्रकांत जाधव, शिवाजी साळुंके, गणेश साळुंके, म्हादाबाई पांचाळ यांच्या पडलेल्या घरांमध्ये ढगफुटी सदृश्य पावसाचे पाणी शिरून संसार उपयोगी साहित्य व धान्य वाहून गेले यांची पाहणी केली. पावसाच्या पाण्याने शेतीत काढून ठेवलेले सोयाबीन वाहून गेले तसेच धनराज पाटील यांच्या घरांची भिंत पडून मोठे नुकसान झाले आहे त्याचीही पाहणी करून माहिती घेतली.
या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले आहेत. यासर्वांना शासकीय मदत मिळवून देण्या संदर्भात शासनकडे अहवाल सादर करून तातडीने मदत मिळवुन देण्यात येणार असल्याचे पालकमंत्री ना. देशमुख यांनी म्हटले आहे.
या नुकसानीची हरंगुळ खुर्द उपसरपंच धनराज पाटील, ग्रामसेवक आशा उत्सुरगे, ज्ञानेश्वर पवार, तानाजी राठोड, रामेश्वर झुंजे, माजी पंचायत समिती सदस्य नीळकंठ गावकरे यांच्याकडून प्रशासनाने माहिती घेतली आहे.