लोकदर्शन 👉 शिवाजी सेलोकर
*भाजपा महिला मोर्चातर्फे भजनी मंडळांचा सत्कार संपन्न*
हरिपाठाच्या माध्यमातुन देवनामाचा केलेला जप व त्या माध्यमातुन निर्माण झालेले भक्तीमय वातावरण यामुळे मला वेगळया विश्वात गेल्याची अनुभूती झाली. भजनी मंडळाच्या महिलांनीश्रोत्यांच्या हॄदयापर्यंत भक्तीभाव पोहचविला. भजनांच्या माध्यमातून भाविकांच्या मनाला समाधान देण्याचे मोलाचे कार्य भजनी मंडळानी केले आहे असे प्रतिपादन विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.
दिनांक ३ ऑक्टोंबर रोजी भाजपा महिला मोर्चा चंद्रपूर जिल्हा महानगर शाखेतर्फे आयोजित भजनी मंडळांचा सत्कार व हरिपाठ कार्यक्रमात आ. सुधीर मुनगंटीवार बोलत होते. यावेळी भाजपाचे ज्येष्ठ नेते प्रमोद कडु, भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, उपमहापौर राहूल पावडे, महानगर महिला मोर्चा अध्यक्षा सौ. अंजली घोटेकर, सुभाष कासनगोट्टूवार, ब्रिजभूषण पाझारे, रविंद्र गुरनुले, नामदेव डाहूले, शिला चौहान, प्रज्ञा बोरगमवार, राजीव गोलीवार, अरूण तिखे, प्रमोद शास्त्रकार, विठ्ठलराव डूकरे आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्हणाले, ज्याप्रमाणे ताप मोजण्यासाठी आपण थर्मामीटर वापरतो तसेच जर हवेतील भक्ती मोजण्यासाठी यंत्र असते तर १०० टक्के भक्तीमय वातावरणाची नोंद आज झाली असती. योगाचे अनेक प्रकार मी अनुभवले. अलीकडे नृत्ययोग बघितला. आज भजन योगाचा साक्षात्कार मला या कार्यक्रमात झाला. भजनी मंडळांनी भक्तीची समृध्द परंपरा निर्माण केली असून भक्तीचे हे अमृत त्यांच्या मुखातुन सदैव पाझरावे व चंद्रपूर जिल्हा आनंदमय व्हावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.
यावेळी भजनी मंडळांच्या सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक भाजपा महिला मोर्चा महानगर जिल्हाध्यक्षा सौ. अंजली घोटेकर यांनी केले. संचालन सौ. शिला चौहान यांनी केले. कार्यक्रमात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व भजनी मंडळांची मोठया संख्येने उपस्थिती होती.