By : shivaji Selokar
आ. मुनगंटीवार यांनी घेतला कॅन्सर हॉस्पीटलचा आढावा
टाटा ट्रस्टच्या सहकार्याने चंद्रपूर येथे उभारण्यात येणारे कॅन्सर हॉस्पीटल एप्रिल २०२२ पर्यंत सुरू करण्यात यावे व त्यादृष्टीने योग्य नियोजन करून आवश्यक बाबींची पुर्तता करावी असे निर्देश विधीमंडळ लोकलेखा समितीचे प्रमुख आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.
दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी विधानभवन मुंबई येथे चंद्रपूरच्या कॅन्सर हॉस्पीटल संदर्भात आढावा बैठक घेतली. या बैठकीला वैद्यकिय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, वैद्यकिय शिक्षण विभागाचे सहसंचालक श्री. चंदनवाले, टाटा कॅन्सर हॉस्पीटलचे अधिष्ठाता डॉ. कैलाश शर्मा, चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. नितनवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्री. भास्करवार, कॅन्सर केअर फाऊंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक श्री. वैभव गजभिये, वित्त अधिकारी श्री. मयुर नंदा यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी कॅन्सर हॉस्पीटल संदर्भात विस्तृत आढावा घेतला. चंद्रपूर येथील शासकीय वैद्यकिय महाविद्यालय व रूग्णालय परिसरात वैद्यकिय शिक्षण विभाग, जिल्हा खनिज प्रतिष्ठान आणि टाटा ट्रस्ट यांच्या माध्यमातुन १०० खाटांचे कर्करोग रूग्णालय उभारण्याचा निर्णय आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या अर्थमंत्री पदाच्या कार्यकाळात राज्य सरकारने घेतला. या कर्करोग रूग्णालयाच्या उभारणीसाठी व त्याचे संचलन करण्यासाठी कॅन्सर केअर प्रतिष्ठान नावाची संस्था स्थापन करण्यात आली असून त्या माध्यमातुन कॅन्सर रूग्णालयाच्या उभारणीचे काम प्रगतीपथावर आहे.
आज झालेल्या बैठकीत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी बांधकाम, साहित्य, मानव संसाधन, डॉक्टर्स, अधिपरिचारीका आदींच्या उपलब्धतेच्या अनुषंगाने विस्तृत चर्चा केली व आढावा घेतला. सदर कॅन्सर हॉस्पीटल एप्रिल २०२२ पर्यंत सुरू करण्याचे नियोजन करावे व त्यादृष्टीने गतीने कार्यवाही करावी असे निर्देश आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिले.