By : Mohan Bharti
सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख
मुंबई, दि. 28: कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षिततेच्या कारणास्तव लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात वेगवेगळया माध्यमांतील चित्रीकरण बंद असल्याने निर्मिती संस्थांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे निर्मिती संस्थांना चित्रीकरण स्थळाच्या आणि दीर्घ मुदतवाढ तत्वावरील संस्थांच्या भाडयात दि. 15 एप्रिल 2021 ते 6 जून 2021 या कालावधीकरीता सवलत देण्यात येणार असून ही सवलत मूळ निर्धारीत भाडयाच्या 40 टक्क्यांपर्यंत असेल अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.
महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 158 वी बैठक ऑनलाईन पध्दतीने आज आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस श्री. सौरभ विजय, सचिव, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे आणि सह व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे तसेच महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.
चित्रनगरीच्या पायाभूत विकासास अनुसरुन दीर्घकालीन उपाययोजना करण्यावर भर देण्यात येत असून यासाठी बृहत आराखडा तयार करण्यात येत आहे. तसेच चित्रनगरीमध्ये चित्रीकरणासाठी पायाभूत सुविधाअंतर्गत कलागारे, चित्रीकरण स्थळे विकासासाठी ईओआय (EOI) (स्वारस्य अभिव्यक्ती) कार्यवाही करण्यात येत आहे. याबरोबरच महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाकडून दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या सुरक्षिततेसाठी करार तत्वावर सुरक्षा व्यवस्था घेण्यात यावी असेही श्री. देशमुख यांनी यावेळी सांगितले.
त्याचप्रमाणे महामंडळाची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न् झाली. सदर सर्वसाधारण सभेमध्ये सन 2020-21 चे लेखे स्वीकृत करण्यात आले तसेच 95.06 लक्ष एवढा भरीव लाभांश घोषित करण्यात आला.