बारा वर्षांपासून ज्या अरुंद रस्त्यावर
मी जाणं येणं करायचो
त्याच रस्त्यावर एका ठिकाणी
रस्त्याच्या कडेला
मुंग्याचं भलं मोठं वारूळ
मला नेहमी दिसायचं
अचानक दोन वर्षांपूर्वी
ते वारुळ हळदी कुंकवाने रंगून दिसलं
थांबून विचारलं
भौ हे का हाये न गर्दी कायची हो गा
तो उतरला
भौ तुले माहितस नाई का
काल राती आमच्या सदूमामाले
सपनात नागोबा आला आन
ह्या ठिकाणी तो यिउन माह्य मंदिर बांध
मनुंन सांगून गेला मने….
बरं बावा बांदा मंग मंदिर
अन् घ्या मंग दर्शन….
मी त रोजस येईन ह्या रस्त्यानं
मले त हररोजस होईन दर्शन मंग….
रोज पुजारी बसू लागला
गर्दी वाढत गेली,नवसं फिटत गेली
भक्त भक्तीणींमधली दरी मिटत गेली
आज
त्याठिकानाहून हायवे गेला,
नवसाला पावणारे देव सपाट झाले
पुजाऱ्याने कमावले,भक्त मोकाट झाले
कामापुरता देव होता,बसविणाऱ्याने बसवला
चुंबळी भरून स्वतःची,समाजाला नासवला
श्रद्धेच्या ढुंगणावर बसलेल्या लाथा
का कुणाला खुपल्याच नाही
उठसुठ चवथाळनाऱ्यांच्या भावना
इथल्या देवासाठी मात्र दुखल्याच नाही….