मुंबई, 25सप्टेंबर: राज्यात (Maharashtra) पुन्हा एकदा पाऊस (Rain Updates) सक्रिय झाला आहे. येत्या पाच दिवसाच पुन्हा एकदा राज्यातील विविध क्षेत्रात पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात विजांच्या कडकडाटासह जोरदार (Heavy Rainfall) पावसाची शक्यता हवामान खात्याकडून (IMD) वर्तवण्यात आली आहे. मध्य महाराष्ट्रात सरासरीहून 12 टक्के पाऊस अधिक आहे. त्यात मराठवाड्यात 32 टक्के अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. विदर्भातील काही जिल्हे आणि उत्तर महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सरासरी पाऊस झाला आहे.
मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याला तर पावसानं झोडपून काढलं आहे. त्यामुळे औरंगाबादसह परभणी, हिंगोली, नांदेड, बीड आणि लातूरातील अनेक धरणं दुथडी भरून वाहत आहेत. काही ठिकाणी अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. मध्य महाराष्ट्रात अहमदनगर, धुळे आणि सातारा येथे मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, परभणी येथे अतिरिक्त तर जालना येथे तीव्र अतिरिक्त पावसाची नोंद करण्यात आली आहे.
कोकण विभागात रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि मुंबई उपनगरे येथे अतिरिक्त पावसाची नोंद झाली आहे. भारतीय हवामान खात्याने आज मध्य महाराष्ट्र, पश्चिम विदर्भ, मराठवाडा, कोकण आणि घाट परिसरात जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. येथील बहुतांशी जिल्ह्यांना IMD ने येलो अलर्ट (Yellow Alert) जारी केला आहे. संबंधित जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.सर्वाधिक पाऊस जालना येथे सरासरीपेक्षा 69 टक्के अधिक आहे. सर्वात कमी पाऊस नंदुरबार येथे सरासरीहून 19 टक्क्यांनी कमी झाला नंदूरबारमध्ये सप्टेंबरच्या सुरुवातीला ही तूट 43 टक्क्यांपर्यंत कमी होती. कोकणामध्ये एकाही जिल्ह्यामध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस नोंदला गेलेला नाही. मध्य महाराष्ट्रात सांगली जिल्ह्यात सरासरीहून सात टक्के कमी पाऊस नोंदला गेला आहे. मराठवाड्यातही सर्व जिल्ह्यांमध्ये सरासरीहून अधिक पाऊस नोंदला गेला आहे.
आजपासून पुढील चार दिवस विदर्भात हळुहळू पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तर मध्य महाराष्ट्र, कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा या विभागात पावसाचा जोर वाढणार आहे. रायगड, रत्नागिरीमध्ये सोमवारपर्यंत तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज आहे. सिंधुदुर्गात रविवारी आणि सोमवारी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पालघर, ठाणे, मुंबई येथेही सोमवारी पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तोपर्यंत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे.