मनपा पदाधिकाऱ्यांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन
– मनपा देणार आवश्यकतेनुसार जागा
चंद्रपूर, ता. २१ : नेताजी चौक, बाबुपेठ परिसरात प्राणघातक हल्ला झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. येथे पोलीस बीट सुरु करण्यासाठी चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत जागेची व्यवस्था करुन देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने मनपा पदाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांची भेट घेत निवेदन दिले.
शहरातील बाबूपेठ परिसरातील वैष्णवी आंबटकर या युवतीची निर्घृण हत्या झाली. मृत्यु प्रकरणी माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आंबटकर कुटूंबियांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. वैष्णवीच्या हत्येप्रकरणी प्रशासनाप्रती रोष निर्माण झाल्यामुळे भविष्यात अशा घटना घडू नये, याकरीता नागरिकांनी आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे परिसरात एक पोलीस बीट स्थापन करण्याची मागणी केली. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी मनपा कार्यालयातर्फे पोलीस विभागास एक पोलीस बीट स्थापन करण्याकरीत जागेची व्यवस्था करुन देण्याबाबत या कार्यालयास सूचना केल्या. ही परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने व कायदा व सुव्यवस्थेकरीता नेताजी चौक, बाबुपेठ या परिसरात पोलीस बीट उपलब्ध व्हावे, त्याकरीता चंद्रपूर शहर महानगरपालिकेमार्फत जागेची व्यवस्था करुन देण्यात येणार आहे. पोलीस बीट तत्काळ सुरु करण्यात यावे, अशी मागणी महापौर राखी संजय कंचर्लावार, उपमहापौर राहुल पावडे, स्थायी समिती सभापती रवी आसवानी, सभागृह नेता संदीप आवारी, नगरसेवक प्रदीप किरमे यांनी पोलीस अधिक्षक अरविंद साळवे यांच्याकडे केली.