लोकदर्शन👉 मोहन भारती।
आज भारताने एका दिवसात २ कोटी लसीकरणाचा टप्पा पार करताना जागतिक विक्रम तर केलाच आहे. पण त्या पलीकडे सरकारी पातळीवर असं अभियान राबवलं जाऊ शकते हे जगाला दाखवून दिलं आहे. आजच्या लसीकरण अभियानात १ लाखापेक्षा जास्ती सेंटर सरकारी पातळीवर सुरु केले होते तर ३५०० हे प्रायवेट आहेत. यावरून अंदाज लावू शकतो की जास्तीत जास्त लोकांना मोफत कोरोना लस मिळालेली आहे.
ही एक क्रांती आहे असं म्हंटल्यास वावगं ठरणार नाही. २ कोटी लस उपलब्ध करणे, त्यांना देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणे, लसीकरण करण्याची यंत्रणा निर्माण करणे आणि त्याचवेळी त्याची नोंद घेणं हे सगळं नक्कीच अभूतपूर्व आहे.
आजचा रेकॉर्ड बनवण्यासाठी औचित्य कोणतंही असलं तरी गळ्यात १०- १० किलोचे हार आणि मोठा मोठाले केक कापून ते साजरं करण्यापेक्षा अश्या पद्धतीचं निर्धारित केलेलं लक्ष्य गाठणं हे नक्कीच अभिनंदनास पात्र आहे.
आजचा जागतिक विक्रम ज्यांच्यामुळे शक्य झाला त्या सर्व कोविड योद्धांना माझा कडक सॅल्यूट. सर्व सरकारी यंत्रणा, डॉक्टर, नर्सेस, स्वयंसेवी संस्था, लसी बनवणाऱ्या कंपन्या, त्यांचे कर्मचारी आणि ते देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवणारी यंत्रणा आणि अनेक अव्यक्त पडद्यामागील चेहरे सर्वांना माझा नमस्कार