लोकदर्शन👉शिवाजी सेलोकर
चंद्रपूर, ता. १२ : चंद्रपूर शहर महानगरपालिकेच्या वतीने “पर्यावरणस्नेही बाप्पा” साजरा होत आहे. शहरात विविध ठिकाणी मनपातर्फे लावलेल्या विसर्जन कुंडात शनिवारी दीड दिवसांच्या श्रींचे विसर्जन पार पडले. रामाळा तलाव येथे महापौर राखी संजय कंचर्लावार व स्थायी समिती सभापती रवि आसवानी यांच्या हस्ते पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांना जास्वंद रोपटे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
चंद्रपूर शहर महानगरपालिकेतर्फे यंदा पर्यावरणपूरक गणेश उत्सवावर भर देण्यात आला आहे. मनपा प्रशासनातर्फे झोननिहाय विविध चौकात आणि महत्वाच्या ठिकाणी कृत्रिम विसर्जन कुंड व निर्माल्य कलश ठेवण्यात आले आहेत. पर्यावरणपूरक उत्सव साजरा करून कृत्रिम विसर्जन कुंड विसर्जन करणाऱ्या गणेशभक्ताना महापौर राखी संजय कंचर्लावार यांच्या संकल्पनेतून मनपाच्या उद्यान विभागाच्या वतीने जास्वदांचे रोपटे भेट दिले जात आहे. शनिवारी सायंकाळी दीड दिवसांच्या श्रींचे विसर्जन झाले. रामाळा तलाव काठावर छोटेखानी कार्यक्रमात पर्यावरणपूरक उत्सव साजरा करणाऱ्या गणेशभक्तांना महापौर राखी संजय कंचर्लावार व स्थायी समिती सभापती रवि आसवानी यांच्या हस्ते जास्वंद रोपटे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. यावेळी स्वच्छता विभागाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल शेळके, उद्यान निरीक्षक अनुप ताटेवार, स्वच्छता निरीक्षक संतोष गर्गेलवार, स्वच्छता निरीक्षक भूपेश गोठे, स्वच्छता निरीक्षक विवेक पोतनुरवार यांची उपस्थिती होती. दरम्यान, मनपाच्या हद्दीतील सर्व कृत्रिम कुंडात मूर्ती विसर्जित करणाऱ्यांना भाविकांना जास्वंद रोपटे व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.