अफगाणिस्तानम ताब्यात घेतल्यानंतर तालिबान्यांच्या क्रूरतेचे किस्से सातत्याने समोर येत आहेत. काबुलमध्ये शुक्रवारी रात्री तालिबान्यांनी गोळीबार केल्यामुळे लहान मुलांसह अनेक लोक ठार आणि जखमी झाल्याची माहिती स्थानिक अफगाण वृत्तसंस्थेने दिली होती. दरम्यान, तालिबान्यांच्या अत्याचाराची आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. अफगाणिस्तानमध्ये पोलीस खात्यात सेवा बजावलेल्या महिलेने तिच्यासोबत झालेल्या अत्याचाराची आपबीती सांगितली आहे. खातेरा हाशिमा, असे त्या महिलेचे नाव आहे.
अफगाणिस्तानच्या महिला पोलिसात सेवा दिलेल्या खातेरा हाशिमा यांनी सांगितले की, “तालिबान अजिबात बदलला नाही, अगदी २० वर्षांपूर्वी होता तसाच आहे. मी गर्भवती असताना देखील तालिबान्यांनी माझे अपहरण केले होते. त्यानंतर अत्याच्यार करत, माझ्या डोक्यात गोळ्या झाडल्या गेल्या आणि माझे डोळे बाहेर काढण्यात आले.”
महिलेचे घराबाहेर पडणे तालिबानच्या नजरेत पाप
खातेरा हाशिमा यांच्या मते, अफगाणिस्तानमध्ये कोणत्याही महिलेचे घराबाहेर पडणे तालिबानच्या नजरेत पाप आहे. जे खातेरा यांच्यासोबत घडले ते तिथल्या अनेक महिलांसोबत घडत आहे. त्या महिला बाहेर येऊ शकत नाहीत, कोणाला काही सांगू शकत नाहीत, असे खातेरा हाशिमा यांनी सांगितले. खातेरा सध्या भारतात आहेत पण अफगाणिस्तानात झालेल्या अत्याचाराबाबत सांगतांना त्यांचा अंगावर काटा उभा राहिला. त्या म्हणाल्या, इस्लामच्या नावाखाली तालिबान अफगाण लोकांना धमकावत आहे. खातेरा हाशिमा इंडिया टुडेला दिलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.