– ♦️*राज्यपाल भगत सिंह कोश्यारी*
By : Rajendra Mardane
वरोरा : शेती करणे हे जगातील सर्वोत्कृष्ट काम असून कृषि पदवी, पदव्युत्तर पदवी प्राप्त विद्यार्थ्यांनी केवळ नोकरीच्या मागे न लागता शेतीच्या माध्यमाद्वारे एक नवी क्रांती आणून देशाला दिशा देत जीवनात, देश – विदेशात नाव कमवावे, स्वउद्योग स्थापून शासकीय योजना कृतीत उतरवत संधींनी भरलेल्या वसुंधरेला धनधान्याने समृद्ध करावे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी दापोली येथील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या ३९ व्या पदवीदान समारंभात दूरदृश्यप्रणालीद्वारे
अध्यक्षीय मार्गदर्शन करताना केले.
व्यासपीठावर भारतीय कृषि अनुसंधान परिषद नवी दिल्लीच्या शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय सावंत, विस्तार शिक्षण संचालक डॉ. संजय भावे, संशोधन संचालक डॉ. पराग हळदणकर, शिक्षण संचालक डॉ. एस.एस. नारखेडे, विद्यापीठ कार्यकारी परिषदेचे सदस्य तसेच विद्या परिषदेचे सदस्य व कुलसचिव डॉ. भरत साळवी, महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरीचे कुलगुरू डॉ.पी.जी. पाटील, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. अशोक धवन, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर व राहुरी कृषि विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. के.पी.विश्वनाथा उपस्थित होते.
राज्यपाल कोश्यारी पुढे म्हणाले की, देशात दुष्काळ पडल्यावर अमेरिकेतून धान्य आयात करण्याची पाळी आलेल्या आपल्या देशाने कृषी उत्पादने निर्यात करणारा देश म्हणून ख्याती मिळवली आहे. वैदिक काळातही आपला देश कृषि व कृषि आधारित उद्योगांमुळे समृद्ध होता. त्यामुळे नवे तंत्रज्ञान, नावीन्यपूर्ण यंत्रे वापरून अन्नधान्याची उत्पादकता वाढविली पाहिजे व आधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचवून त्यांचे जीवनमान उंचावले पाहिजे. कृषिमंत्री दादाजी भुसे एक समर्पित मंत्री असल्याचे गौरवोद्गगार काढीत त्यांच्या भागातील शेतकऱ्यांनी जीआय तंत्रज्ञानाद्वारे चौपट नफा मिळविण्याची यशकथा त्यांनी विदित केली. कीटकनाशके व रासायनिक खतांचा वापर कमी करण्यावर त्यांनी भर दिला. कोकणच्या नैसर्गिक सौंदर्याची मुक्तकंठाने प्रशंसा करीत ‘ उत्तम शेती, मध्यम व्यापार व कनिष्ठ चाकरी ‘ या संकल्पनेचा उहापोह करीत त्यांनी शेतीचे महत्त्व अधोरेखित केले.
दूरदृश्यप्रणालीद्वारे मार्गदर्शन करताना राज्याचे कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे म्हणाले की, कृषि विकासात कृषि विद्यापीठांचे बहुमूल्य योगदान असून शेतकऱ्याला केंद्रबिंदू मानून त्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी तसेच त्याला समाजात प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी प्रयत्नांची गरज आहे. जागतिक तापमानवाढीचे संकट पाहता गुणवत्तापूर्ण उत्पादन मिळविण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. ‘ विकेल ते पिकेल’ ही मुख्यमंत्र्यांची संकल्पना साकारण्यासाठी ज्या वाणांना बाजारात मागणी आहे ती पिकवून गुणवत्तापूर्ण उत्पादन ग्राहकांच्या पसंतीस उतरेल या दृष्टीने संशोधनास चालना दिल्यास शेतकऱ्यांचे जीवनमान वाढू शकेल, असे ते म्हणाले. जागतिक तापमानवाढीचे संकट बघता त्यानुषंगाने कृषि विद्यापीठांनी संशोधनाची दिशा ठरवावी, असे त्यांनी नमूद केले. पदवीप्राप्त सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा दिल्या. अनेक शेतकरी व त्यांची मुले नवनवे प्रयोग करीत आहेत त्याची दखल घेऊन सोशल मीडियाद्वारे संबंधितांची पाठ थोपटल्यास अधिक चांगले संशोधन होऊ शकेल, असे ते म्हणाले.
डॉ. चारूदत्त मायी दीक्षांत भाषणात म्हणाले की, शिकणे ही प्रगतीची गती कायम राखणारी निरंतर प्रक्रिया असल्याने विद्यार्थ्यांनी ती थांबवू नये. सर्व पदवीधरांनी उदयोन्मुख बाजाराच्या गरजांशी जुळवून घ्यायला हवे. बायोटेक्नॉलॉजी, नॅनो टेक्नॉलॉजी, माहिती आणि दळणवळण तंत्रज्ञान, अंतराळ विज्ञान, उच्च तंत्रशुद्ध उत्पादने, आंतरराष्ट्रीय व्यापार आणि बौद्धिक संपदा या संबंधित समस्यांसह विज्ञान आणि तंत्रज्ञानात अलीकडे झालेल्या प्रगतीमध्ये त्यांना स्वतःला सुसज्ज ठेवावे लागेल. गरिबी व उपासमारीची समस्या देशासमोर आवासून उभी आहे. हे असमानतेचे वास्तव शेती आणि शेतकऱ्यांच्या उपेक्षेकडे अंगुलीनिर्देश करते. बदलत्या हवामानाचा अवलंब करू शकणाऱ्या नवीन प्रजातींच्या जलद विकासासाठी आपल्याला आनुवांशिक सुधारणा, कृषीविषयक हाताळणी, एकात्मिक शेतीचा दृष्टिकोन, संतुलित नैसर्गिक संसाधनाचा वापर आणि वेळेवर हस्तक्षेप उपयुक्त ठरू शकतो, असे ते म्हणाले.
कुलगुरू डॉ. स़जय सावंत यांनी शिक्षण, संशोधन व विस्तार क्षेत्रात कृषी विद्यापीठाने केलेल्या बहुमूल्य कामगिरीचे नेटके विवेचन केले. ते म्हणाले की, विद्यार्थ्यांनी एक जबाबदार नागरिक या नात्याने आपल्याला अभिमान वाटेल अशा देशाची व समाजाची निर्मिती करणे आपले कर्तव्य आहे, असे समजावे. पदवीदान समारंभ विद्यार्थी जीवनातील एक संक्रमण रेषा ओलांडण्याचा भाग असतो. जनतेचे पोट भरण्या बरोबरच सकस व सुरक्षित अन्न पुरविणे याबाबत अवधान ठेवून विद्यार्थी संक्रमण रेषा यशस्वीपणे ओलांडतील असा विश्वास व्यक्त करीत त्यांनी सर्वांना सुयश चिंतले.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमात विशेष प्रावीण्य प्राप्त विद्यार्थ्यांना सुवर्णपदक देऊन सन्मानित करण्यात आले.
सन २०१८ – १९ या वर्षामध्ये विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमात विशेष प्रावीण्य प्राप्त केलेल्या सुवर्ण विजेत्या विद्यार्थ्यांची यादी खालील प्रमाणे
*डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ सुवर्णपदक ( वर्ष २०१८ – १९ )* कल्लरू सुधामणी, एम.एस्सी. ( कृषि ), खोत समरीन अन्वर अली, एम.टेक. ( कृषि अभियांत्रिकी ), सुर्वे नगमा रफिक, एम. एस्सी (उद्यानविद्या ), विनायक बबनराव पाटील, एम.एस्सी ( जैवतंत्रज्ञान )
संगिता डे, एम. एफ.एस्सी, सुयोग अनंत बागडे, एम. एस्सी. ( वनशास्त्र ), कुणाल उमाकांत यादव एम. एस्सी. ( पी. एच. एम.) *अॅस्पी सुवर्णपदक २०१७ – १८* शैलेश महादेव शिंदे, बी. टेक. ( कृषि अभियांत्रिकी ), *ॲस्पी सुवर्णपदक (२०१८ – १९ )* सायली सुनील पांगम, बी.टेक. ( कृषि अभियांत्रिकी ), *अॅस्पी सुवर्णपदक २०१९ – २०)* राजश्री मदन तनवडे, बी. एस्सी. ( कृषि ), बच्चे प्रथमेश माणिक, बी.टेक. ( कृषि अभियांत्रिकी ),
*सर रॉबर्ट अॅलन सुवर्णपदक ( २०१९ – २० )* प्राजक्ता संजय माष्टीके बी. एस्सी. ( कृषि ), *डॉ. जी. जी. ठाकरे सुवर्णपदक ( २०१८ – १९ )*
स्नेहा एस. मणेरीकर एम.एस्सी. (कृषि) कृषि अर्थशास्त्र, *हेक्झामार सुवर्णपदक ( २०१८ – १९ )* हर्षीता एम, एम.एस्सी ( कृषि ) कृषी कीटकशास्त्र,जोसीया जॉय, एम.एस्सी (कृषि) कृषी वनस्पती रोगशास्त्र, राकेश एम., एम.एस्सी ( कृषि ) कृषीविद्या, कल्लरू सुधामणी, एम. एस्सी (कृषि ) कृषि वनस्पतीशास्त्र, सुर्वे नगमा रफिक एम एस्सी ( कृषि ) उद्यानविद्या, *कै. मंदाकिनी सहस्रबुद्धे सुवर्णपदक ( २०१९ – २०)* उत्कर्षा देशमुख, एम.एस्सी ( कृषि ) मृद व कृषि रसायनशास्त्र, *कै. अरूणभैय्या नायकवाडी सुवर्णपदक ( २०१९ – २० )* मयेकर श्वेता उर्फ चेतना कृष्णा, एम.एस्सी ( कृषि ) विस्तार शिक्षण, *कै. श्रीमती निलिमा श्रीरंग कद्रेकर सुवर्णपदक ( २०१९ – २० )*
किशोर प्रकाश पालकर, एम. एससी (कृषि ) मृद व रसायनशास्त्र विभाग, *डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ सुवर्णपदक ( २०१९ – २० )* प्राजक्ता संजय भारीष्टे, बी.एस्सी ( कृषि ), हेमलता प्रकाश इंगळे, बी.एस्सी ( उद्यानविद्या ), सुजर दामाजी गुडाळे, बी.टेक ( कृषि अभियांत्रिकी ), निमिश देवेंद्र धुरी, बी.एफ. एस्सी, प्रतीक अशोक सरकाळे, बी.टेक ( अन्न तंत्रज्ञान ), वैभव रामकृष्ण पाटील, ए.बी. एम. ( कृषि ), प्राजक्ता मारुति निकम, बी. एस्सी ( कृषि जैवतंत्रज्ञान ), ललितकुमार लेकु प्रसाद मौर्य, बी. एस्सी ( वनशास्त्र ) आदींचा समावेश आहे.
कार्यक्रमाची सुरुवात पसायदान व विद्यापीठ गीताने होऊन राष्ट्रगीताने सांगता झाली.
यावेळी विद्यापीठाच्या विविध महाविद्यालयांचे अधिष्ठाता, सहयोगी अधिष्ठाता, विविध विभागांचे विभाग प्रमुख, प्राध्यापकवृंद, कर्मचारीवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.