लोकदर्शन 👉
🌿असं म्हणतात की वैचारिक क्रांती ही साहित्यातून होत असते,चांगल्या साहित्यातून चांगल्या माणसाची निर्मिती होत असते,चांगले साहित्य आणि चांगली माणसे निर्माण होण्याच्या काळाचा आज वर्तमानात ऱ्हास व्हायला लागला आहे. प्रस्थापित व्यवस्थेवर लिहिणारे लेखक ,कवी फार तर बोटावर मोजण्याइतके मिळतील,आपलं व्यवस्थित चाललय ना,मग कशाला उडती काटी अंगाला लावून घ्यायची अन उगीचच कशाला कोणासोबत संबंध खराब करून घ्यायचे असे म्हणून अन्याय,अत्याचारावर समाजातल्या वाईट घटनांवर नावाजलेले,समाजात प्रसिद्ध असणारे लेखक लिहिण्याचे टाळू लागलेले आहेत.एक अनामिक भीतीने अशा लेखकांना ग्रासलेलं आहे.काहींचे काही ठिकाणी हितसंबंध गुंतलेले असतात म्हणून तर काही प्रस्थापित लोकांकडून त्रास होऊ नये म्हणून समाजातल्या वाईट घटनांवर भाष्य टाळू लागलेले आहेत.
🌿आत्ताची साहित्यिक जमात म्हणजे एक नंबर डरपोक आणि संधीसाधू जमात वाटते,ही जमात केवळ हार,तुरे,पुरस्कार एवढ्यापुरतीच कार्यरत असताना आपणास दिसते,यांच्या लिहिण्यात आणि वर्तनात दुरदूरपर्यंत संबंध नसतो की यांची कृती सुद्धा समाजाभिमुख नसते.जसा साहित्यिक लिहितो तसे त्याचे वर्तन नसते,तशी त्याची कृती नसते आणि म्हणूनच की काय समाजातील सामान्य वर्ग जो वाचक आहे तो अशांना काडीचीही किंमत देत नाही,हं तो लेखक काय! माहीत आहे, शान बादशहाची दुकान फुटाण्याचं असा साधारण माणूस सुद्धा टोला मारताना दिसतो,लिहिणे तसे वागणे असा साहित्यिक क्वचित बघायला मिळतो आणि टीनपाट,खंडणीखोर साहित्यिकांच्या दुनियेत तो एकटा पडतो.
#एक_उदाहरण
1.समजा मी एक प्रसिद्ध साहित्यिक आहे(फक्त समजून घ्या,मी साहित्यिक वैगेरे नाही,प्रसिद्ध तर नाहीच नाही) मी खूप छान लिहितो,धार्मिक प्रसंगावर भाष्य करतो,धार्मिक लेख,कविता लिहितो,निसर्गावर भरभरून लिहितो,कोणाच्याही भावना दुखावणार नाही याची काळजी घेतो(कारण सोबत तशी माणसं असतात,मित्र असतात)धर्माच्या रूढी परंपरांवर गोल गोल लिहितो.
2.समजा मी एक प्रसिद्ध साहित्यिक आहे(फक्त समजून घ्या,मी साहित्यिक वैगेरे नाही,प्रसिद्ध तर नाहीच नाही)मी परखड लिहितो,समाजातल्या अनिष्ट रूढी,परंपरेवर आघात करतो,समाजातल्या प्रस्थापितांद्वारे होणाऱ्या अन्याय,अत्याचाराविरोधात आवाज उठवतो,वाईट रुढींवर कोणाची मने दुखावतील याची तमा न बाळगता लिहितो.जो नेहमी सत्य समाजासमोर येईल असे लिहितो.
🌿आता आपल्याला माझा हा प्रश्न राहील की पुरस्कार,हार,तुरे हे कोणाच्या वाट्याला जाईल!
अर्थातच पहिल्या साहित्यिकास जाईल ज्या साहित्यिकाने समाजातील एकाही वाईट गोष्टीवर भाष्य केलेले नसेल! आहे की नाही कमाल!! आणि हीच कमाल साहित्यिकास व्यवस्थेचा गुलाम बनवते,प्रस्थापित व्यवस्थेचा दास बनवते.साहजिक एक साधा विचार करून बघा,समाजातील एखादा मात्तबर नेता आहे आणि त्याच्या हातून तुम्ही एखादा नावाजलेला पुरस्कार स्वीकारला असेल आणि दुसऱ्याच क्षणी त्या नेत्याच्या काळ्या कृत्याबद्दल माहीत झाले तर तुम्ही साहित्यिक म्हणून त्याच्या विरोधात लिहू शकाल? अर्थातच तुमच्या लेखणीत ती विरोध करण्याची ताकदच उरलेली नसेल,आधीच गुलामी स्वीकारलेल्या लेखणीत तो दमच उरलेला नसतो आणि तो उसनाही कुठून आणू शकणार नसता.
🌿हे एकदम साधे उदाहरण झाले जे एका साहित्यिकांचे व्यवस्थेसमोर हतबल होण्याचे.आता मी पुन्हा एक छोटेसे उदाहरण देऊ इच्छितो जे साहित्यिकामधील खरा चेहरा समोर आणणारे वाटते.
🌿बरेचसे साहित्यिक दिसतात तसे नसतात,आपल्या लेखनात अतिशय प्रखरतेने आणि आशयपूर्ण भूमिका मांडणारे आपल्या वैयक्तिक आयुष्यात मात्र पुरते नालायक असतात.जगासमोर महिलांवर,स्त्रियांवर कसा अन्याय होतो,स्त्रियांना मानाची वागणूक द्यावी म्हणून बोंबलणारे आपल्या घरात मात्र तसे वागत नाही.आई,वडील म्हातारे आहेत म्हणून कुठेतरी कोपऱ्यात सोडून देणारे,बायकोला कायम दुय्यम वागणूक देणारे,परस्त्रीवर नजर ठेवणारे असेच बरेच प्रसिद्ध महाभाग साहित्यिक आपल्या आजूबाजूला भेटतील.
🌿आपणास कित्येकदा पाहायला मिळतं की एखाद्या गरजवंतास मदतीची गरज पडली की काही साहित्यिक आपला लांब लेख लिहून समाजाकडे मदतीसाठी याचना करतात पण गंमत अशी असते की अशा साहित्यिकांवर समाजातील सामान्य लोकं विश्वास ठेवायला तयार नसतात,याला कारणही तसच असतं अशी साहित्यिक मंडळी कधीच कुणाच्या सुखदुःखात सहभागी झालेली नसतात,ते लिहितात खूप पण समाजाशी त्यांची नाळ कधी जुळलेली नसते,अशी मंडळी आत्मकेंद्रित असतात,ते केवळ आपल्या साहित्याला प्रसिद्धी कशी मिळेल आणि आपले नाव प्रकाशात कसे ठेवता येईल यावरच जोर देत राहतात,प्रसिद्धीच्या लालसेत सामान्य माणसाला ते अत्यंत खालच्या दर्जाचे मानत असतात,यांच्या लेखनात आणि कृतीत तफावत असते आणि मदत करण्याची वेळ आली की ऐन वेळेला सर्वात आधी मैदान सोडून पळणारे हेच असतात.चांगली कमाई असतानाही कित्येक साहित्यिक आपल्या खिशातली एक दमडी सुद्धा समाजातील दुर्बल घटकांसाठी खर्ची घालत नाही.
🌿अशाच साहित्यिकांमुळे बोटावर मोजण्या इतके जे चांगले साहित्यिक आहेत,त्यांच्यावरही समाजाचा विश्वास उडायला लागलेला आहे,या प्रांतात झुंडशाही तर आहेच पण लहान,मोठे,उच्च,प्रसिद्ध,तज्ञ,विचारवंत नावाचे वैगेरे गट,तट आहेत,आपले साहित्य आणि आपण यापलीकडे ते विचार देखील करत नाही,आत्मस्तुती यांच्या मुळापर्यंत गेलेली आहे, मले पहा न फुले वहा अशी स्थिती आहे जी येणाऱ्या भविष्यातील सामाजिक ऐक्याला भोकं पाडणारी असेल.
✍️उमेश पारखी
यांची फेसबुक पोस्ट