लोकदर्शन👉 मोहन भारती
🔶आमदार सुभाष धोटे यांचे मुख्यमंत्री, ऊर्जामंत्री, ग्रामविकासमंत्री यांना निवेदन.
राजुरा :– चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा मतदार संघातील ग्राम पंचायती कडून प्राप्त झालेल्या माहितीनुसार महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाकडून जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या पथदिव्यांच्या थकीत वीज बिलामुळे ग्रामपंचायतींचे कनेक्शन कापण्यासंदर्भात हालचाली सुरू असून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी व अधिकारी ग्रामपंचायतींचे पथदिव्यांचे विद्युत पुरवठा खंडीत करीत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थरावर नागरीकामध्ये असंतोष पसरला असून यावर तातडीने तोडगा काढणे आवश्यक आहे.
ग्रामपंचायतीकडे कोणत्याही प्रकारचे नियमित ठोस असे आर्थिक उत्पन्न नसल्याने राज्यातील अनेक ग्रामपंचायती सदर बिलाची रक्कम भरण्यास अकार्यक्षम आहेत. त्यामुळे सर्व ग्रामपंचायत स्तरावरील स्थापित पथदिव्यांचे विद्युत देयकांची रक्कम यापूर्वी ग्रामविकास विभाग, महाराष्ट्र शासनाद्वारे महावितरण कंपनीकडे भरणा करण्यात येत होता. यापुढेही ग्रामपंचायतीच्या बिलाची रक्कम ग्रामविकास विभागाकडून भरणे गरजेचे आहे. ग्रामीण जनतेला अंधारात ठेवणे हा काही पर्याय नाही. ग्रामपंचायतींचे उत्पन्न सुद्धा नगण्य आहे. त्यामुळे आधीच ग्रामपंचायती आर्थिक संकटात असताना लाखो रुपयांची वीज बिले भरण्यास सक्षम नाही. त्यामुळे शासनस्तरावर ग्राम विकास विभाग व वीजवितरण विभागाने यावर तोडगा काढून सदर थकीत बिलाची रक्कम शासनाने भरणा करणेबाबत तातडीने निर्णय घ्यावा. जो पर्यंत यावर तोडगा निघत नाही तो पर्यंत कोणत्याही ग्रामपंचायतीचे थकीत बिलाविषयी पथदिव्यांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात येऊ नये. याबाबतचे आदेश वीज वितरण विभागाला देण्यात यावेत अशी मागणी आमदार सुभाष धोटे यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, ऊर्जामंत्री नितीन राऊत, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांना निवेदनाद्वारे केली आहे.