समर्थ भारत घडविण्‍यासाठी युवकांना व युवतींना सुदृढ होण्‍याची गरज – आ. सुधीर मुनगंटीवार

By 👉Shivaji Selokar


मुल येथे पुरूष व महिलांसाठी जीम च्‍या इमारतीचे लोकार्पण

२०४७ मध्‍ये भारताच्‍या स्‍वातंत्र्याला शंभर वर्षे पूर्ण होतील. त्‍यावेळी भारताची पताका संपूर्ण जगात फडकावी असे आपले सर्वांचे प्रयत्‍न असावे यासाठी शारिरीक व मानसिक दृष्‍टया सक्षम अशा पिढीची निर्मीती आवश्‍यक आहे. त्‍यादृष्‍टीने समर्थ भारत घडविण्‍यासाठी व शारिरीकदृष्‍टया सक्षम होण्‍यासाठी युवक व युवतींसाठी आज पै. खाशाबा जाधव जीमचे उदघाटन करताना मला अतिशय आनंद होत आहे, असे प्रतिपादन लोकलेखा समितीचे प्रमुख तथा माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केले.

याप्रसंगी मंचावर जिल्‍हा परिषद अध्‍यक्षा सौ. संध्‍या गुरनुले, न.प. अध्‍यक्षा सौ. रत्‍नमाला भोयर, न.प. उपाध्‍यक्ष नंदू रणदिवे, पं.स. सभापती चंदू मारगोनवार, मुल शहर भाजपाध्‍यक्ष प्रभाकर भोयर यांची उपस्थिती होती. याप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले, मिशन शक्‍ती अंतर्गत आपल्‍या जिल्‍हयातील खेळाडू ऑलिम्‍पीकपर्यंत पोहचावे व त्‍यांनी विविध खेळांमध्‍ये पदके जिंकावी या उद्देशाने चंद्रपूर जिल्‍हयामध्‍ये चंद्रपूर येथे शहीद बाबुराव शेडमाके यांच्‍या नावाने स्‍टेडियम तयार होत आहे. तसेच चंद्रपूरच्‍या जिल्‍हा स्‍टेडियमसाठी सुध्‍दा भरीव निधी दिला. त्‍या व्‍यतिरिक्‍त बल्‍लारपूर तालुक्‍यात विसापूर येथे आंतरराष्‍ट्रीय दर्जाचे स्‍टेडियम अंदाजे ३० कोटी रू. खर्च करून बांधण्‍यात आले आहे. याठिकाणी आंतरराष्‍ट्रीय दर्जाच्‍या सुविधा सर्व खेळांसाठी उपलब्‍ध आहेत. पोंभुर्णा व मुल येथेही अत्‍याधुनिक स्‍टेडियमची निर्मीती करण्‍यात आली आहे. पोंभुर्णा येथे अत्‍याधुनिक जीमची निर्मीती करण्‍यात आली असून यामुळे त्‍या विभागातील युवक युवतींना त्‍याचा फायदा झाला आहे. त्‍याचप्रमाणे चंद्रपूर पोलिस विभागासाठी एका अत्‍याधुनिक जीमची निर्मीती करण्‍यात आली असून त्‍याचा उपयोग पोलिस विभागाचे अधिकारी व कर्मचारी करीत आहेत. या सर्व ठिकाणी युवक व युवतींचे निरनिराळया खेळांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. ज्‍यामुळे त्‍या त्‍या भागातील युवक युवतींचा उत्‍साह वाढण्‍यास मदत झाली आहे.

याप्रसंगी बोलताना आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले की, आज ज्‍या जीमचे लोकार्पण करीत आहे ती पै. खाशाबा जाधव यांच्‍या नावाने बांधली याचा मला अतिशय आनंद होत आहे. आजपर्यंत ब-याच प्रकल्‍पांना राजकीय नेत्‍यांची नावे दिली जात होती. परंतु या निमीत्‍याने आपल्‍या देशातील खेळाडूंच्‍या सन्‍मान होतो आहे ही आनंदाची गोष्‍ट आहे. दुसरी महत्‍वाची गोष्‍ट अशी की ही जीम एकाचवेळी पुरूष व महिला यांच्‍यासाठी उपयोगात येणार आहे. पंतप्रधान मा. नरेंद्रभाई मोदी यांनी १५ ऑगस्‍ट रोजी लालकिल्‍ल्‍यावरून केलेल्‍या भाषणात घोषणा केली की यापुढे मुलींना सैनिक शाळेमध्‍ये प्रवेश देण्‍यात यावा. माझ्यासाठी अतिशय आनंदाची गोष्‍ट आहे की, चंद्रपूर येथील सैनिक शाळेत मुलींना प्रवेश मिळावा यासाठी तत्‍कालीन संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांना मी भेटलो असता त्‍यांनी ती मागणी तत्‍काळ पूर्ण केली व मागील वर्षीपासून चंद्रपूर येथील सैनिक शाळेमध्‍ये मुलींना प्रवेश देण्‍यास सुरूवात झाली. या निर्णयाकरिता मी मा. पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.

याप्रसंगी आ. मुनगंटीवार पुढे म्‍हणाले की, सहा वर्षापूर्वीचे मुल व आजचे मुल यात प्रचंड फरक झालेला आहे. रस्‍ते, शासकीय इमारती, चौकांचे सौंदर्यीकरण, मोकळया जागांचे सौंदर्यीकरण, बस स्‍टॅन्‍ड, पाणी पुरवठा योजना, विद्युत योजनेचे नविनीकरण या व अशा अनेक योजना कार्यान्‍वीत करण्‍याचा मी प्रयत्‍न केला. याचेच फळ म्‍हणून मुलच्‍या नागरिक बंधू-भगिनींनी मागील नगरपालिका निवडणूकीत १७ पैकी १६ जागांवर भरघोष यश देत या कामाची पावती दिली. तुमच्‍या या आशिर्वादाचे कर्ज मी कधीच फेडू शकत नाही. म्‍हणून व्‍याजरूपाने ही सर्व कामे करतोय असे समजा व असाच मतरूपी आशिर्वाद आपण यापुढेही मुल नगर परिषदेसाठी ठेवाल असा विश्‍वास व्‍यक्‍त करतो.

याप्रसंगी नगरसेवक प्रशांत समर्थ, अनिल साखरकर, महेंद्र करकाडे, शांताबाई मांदाडे, प्रशांत लाडवे, मिलींद खोब्रागडे, सौ. वनमाला कोडापे, सौ. विद्या बोबाटे, सौ. रेखा येरणे, सौ. आशा गुप्‍ता, प्रशांत लाडवे, सौ. संगिता वाळके, सौ. वंदना वाकडे, विनोद सिडाम, सौ. प्रभा चौथाले, सौ. मनिषा गांडलेवार, चंद्रकांत आष्‍टनकर, अजय गोगुलवार,पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, गणमान्‍य नागरिक बंधू, भगिनी उपस्थित होते.

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

लोकदर्शन सकारात्मक लोकजागर

'लोकदर्शन : सकारात्मक लोकजागर ' हे लोकप्रिय न्यूज पोर्टल समाजातील सकारात्मक घटना वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. ज्येष्ठ पत्रकार शंकर तडस आणि मोहन भारती या दोघांनी हे पोर्टल सुरू केले असून त्यांची समान मालकी आहे. इतर सर्व सहकारी त्यांच्या अधीन कार्य करतात.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *